गणेशचतुर्थी जवळ आली, की "येथे पेणच्या सर्वांगसुंदर मूर्ती मिळतील' असे बोर्ड सगळीकडे दिसू लागतात. पेणच्या कलाकारांच्या हातातील माती ते घरी विराजमान होणारी मूर्ती असा बाप्पांच्या मूर्तीचा प्रवास रंजक आहे. बाप्पांच्या मूल्यसाखळीचा आढावा घेत या क्षेत्रातील अर्थकारणाकडे पाहण्याचा हा प्रयत्न.
गणेशचतुर्थी जवळ आली, की "येथे पेणच्या सर्वांगसुंदर मूर्ती मिळतील' असे बोर्ड सगळीकडे दिसू लागतात. घराण्यातच मूर्तिकला असलेल्या राजाभाऊ देवधरांनी पेणच्या प्रसिद्ध मूर्ती मुंबई-पुण्यातील बाजारपेठांमध्ये नेऊन उद्योगाचा विस्तार केला. पेणमध्ये शाडूची मूर्ती बनवताना अभ्रकाची पूड त्यात घासायची पद्धत होती. त्यामुळे पेणच्या मूर्तींना एक प्रकारची मोहक चमक असायची. पुढे "प्लॅस्टर ऑफ पॅरिस'(पीओपी)मध्ये ही चमक आपोआपच असल्यामुळे पेणमध्ये शाडूऐवजी "पीओपी' वापरण्याची पद्धत रुजली. आताच्या काळात फक्त दहा टक्के कारखाने असे आहेत, जे शाडूच्याच मूर्ती करतात. बाकी 90 टक्के कारखान्यांमध्ये 80 टक्के "पीओपी', तर वीसच टक्के शाडूच्या मूर्ती होतात. गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रक्रियेत तीन महत्त्वाचे घटक आहेत - डिझाइन, उत्पादन आणि आखणी. गणेशचतुर्थीनंतरच्या चतुर्थीला, म्हणजेच साखर चौथीला, पुढच्या वर्षीच्या मूर्तींचे डिझाइन ठरवायला सुरुवात होते. डिसेंबरपर्यंत साचे तयार केले जातात. मग उत्पादन करून मूर्तींवर सफ़ेदा चढवला जातो, याला कच्चा माल म्हणतात. त्यानंतर रंगकाम केले जाते आणि अखेरीस करतात ती आखणी - म्हणजे बाप्पाचे डोळे आखणे. मूर्तीच्या दृष्टीने आखणी हा "मेक ऑर ब्रेक' टप्पा आहे. मूर्तीचे सत्त्व तिच्या डोळ्यांतच असते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मूर्ती उद्योगाचा अभ्यास करायला काही वर्षांपूर्वी पेणला गेले होते. मूर्तींचे काम जोरात सुरू होते. पाहावे तिथे गणेशमूर्ती होत्या. कुठे कच्चा माल, कुठे अर्धवट रंगकाम झालेली मूर्ती, तर कुठे संपूर्ण दिमाखात तयार बाप्पा. या उद्योगासाठी जागा किती महत्त्वाची आहे, त्याची प्रचिती आली. जुन्या वाड्यांच्या अंगणांमध्ये हा उद्योग वाढला. पण पेणमध्येही शहरीकरण झालेच, जागेच्या किमती वाढल्या आणि हळूहळू मूर्तींचा उद्योग पेणमधून आजूबाजूच्या गावांमध्ये सरकत गेला. पेणपासून आठ कि.मी.वर असलेले हमरापूर अशा पद्धतीने वसले. पेणच्या मूर्तींचे डिझाईन पारंपरिक असते. पण हमरापूरने "फॅन्सी' बाप्पा बनविण्यात आपली वेगळी ओळख बनवली. नवनवीन साचे बनवून गणेश मंडळांना "पीओपी'चे फॅन्सी बाप्पा पुरविले जातात ते हमरापूरहून. पेणने शाडू ते "पीओपी'चा प्रवास काळाच्या ओघात केला, पण हमरापूर पहिल्यापासून "पीओपी गाव' म्हणूनच वसले.
"एसईझेड'मुळे मोठा परिणाम
2007 मध्ये लघुउद्योगाच्या बदलत्या भूगोलाच्या विचारात मी असताना "या वर्षी आखणीला कारागिरच नाहीत' असे ऐकू आले. "या वर्षी असं काय झालं?" मी कुतूहलाने विचारले. उत्तर अनपेक्षित होते. "इथे एसईझेड आला आहे ना! ' रायगडमध्ये "एसईझेड'चे वारे आले होते. एकरी पंधरा लाख मिळत असताना दिवसाला साठ रुपयांसाठी मजुरी कोण करणार? अचानक त्याच गावांमध्ये गणपतीऐवजी माझ्या डोळ्यांना "एसईझेड'चे बोर्ड दिसू लागले. एका गावात एका बाईंनी सांगितले, "आमच्या गावात ना शाळा आहे, ना हॉस्पिटल. पण आज सहा स्कॉर्पिओ गाड्या गावात आहेत!' अचानक पैसा आल्याने पेण आणि सभोवतालच्या अनेक गावांमध्ये आर्थिक आणि त्या अनुषंगाने सामाजिक आणि सांस्कृतिक बदल आले. गणपतीमूर्ती उद्योगाला लागणारी जमीन आणि परंपरागत वडिलांकडून कारागिरी शिकणारी नवीन पिढी दुर्मीळ झाली.
मुंबई, पुणे, सुरत, येथील व्यापारी जानेवारीपासूनच पेणमध्ये येतात. कारखान्यांवर मूर्तींचा दहा टक्के आगाऊ भरणा भरून बुकिंग करतात. एकदा का मुक्कामी मूर्तींचा ट्रक उतरवला की ट्रकचे भाडे आणि पूर्ण पैसे मूर्तिकारांना दिले जातात. आता मूर्ती न विकण्याची जोखीम व्यापाऱ्यांवर येते. गणपतीच्या मूल्यसाखळीचे प्रश्न हे शेतीच्या मूल्यसाखळीसारखेच आहेत. दोन्ही साखळ्यांमध्ये ग्राहकाने मोजलेल्या किमतीत उत्पादकांचा वाटा 30 टक्क्यांवरच अडकून राहिला आहे. इतर 70 टक्क्यांत प्रत्यक्ष वाहतुकीचा, डागडुजीचा आणि जागेचा खर्च 15 टक्के असतो. म्हणजे मूर्तीच्या किमतीतील 50 टक्के भाग व्यापाऱ्याकडे जातो. गेल्या पाच वर्षांत व्यापारीही वेबसाईटवरून मूर्तींची विक्री करू लागले आहेत. पण बाप्पाच्या मूर्तीचे "ऑनलाईन शॉपिंग' करण्याची संस्कृती पटकन रुळली नाही. कारण गणपतीची मूर्ती आणताना अजूनही ग्राहक पिढीजात रुजलेले निकष लावतात.
"कोरोना'मुळे अडचणी
या वर्षी मात्र ग्राहकांच्या निवडीच्या निकषांत दोन फरक झालेले दिसतात. पहिला, "कोरोना'च्या भीतीने अनेकांनी यंदा बाप्पाची मूर्ती ऑनलाईन ठरवून घरपोच मूर्तीला प्राधान्य दिलेले दिसते. मूर्ती शक्यतो घरीच विसर्जित व्हावी म्हणून शाडूच्या छोट्या मूर्तींची मागणी प्रचंड वाढली. पण गणपतीमूर्तीचा पुरवठा हा मागणीप्रमाणे बदलू शकत नाही, कारण मूर्तींची तयारी जानेवारीतच झालेली असते. या वर्षी मूर्तिकार खूपच अडचणीत आहेत. सरकारकडून या वर्षी "पीओपी'च्या मूर्तींचा परवाना असल्यामुळे अनेक मूर्तिकारांनी "पीओपी'च्याच मूर्ती घडवल्या. फेब्रुवारीपर्यंत व्यापारी बुकिंगही करत होते. पण जसा लॉकडाउन जाहीर झाला, तसे व्यापारी बुकिंग रद्द करू लागले. "पीओपी'च्या कितीतरी मूर्ती पेणमध्ये आज शिल्लक आहेत. दुसरीकडे शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली, पण आता पुरवठा वाढवणार कसा? पेणमध्येही लॉकडउन होताच. त्या काळात कुंभार आळीत ना कारागीर येऊ शकले, ना व्यापारी. काही ठिकाणी मुख्य उद्योजकालाच "कोरोना' झाल्याने कारखानाच काही काळ बंद ठेवावा लागला. पुणे-मुंबईमध्ये शाडूच्या मूर्तींची किंमत खूपच वाढली खरी, पण त्याचा फायदा झाला तो "टेक- सॅव्ही' असलेल्या व्यापाऱ्यांना. अनेक कारखान्यांमध्ये उलाढालीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या दहा टक्क्यांवर आलेले दिसते. विक्री कमी झाल्यामुळे खेळते भांडवल अडकले आहे.
डेटा आधारित योजनांची गरज
या वर्षी केलेली "पीओपी'ची खरेदी पुढच्या वर्षी वापरता यावी म्हणून सध्या तरी सरकारने "पीओपी'वरची बंदी स्थगित केली आहे. नजीकचे प्रश्न मिटले की जरा सखोल उपाययोजनांची या उद्योगाला गरज आहे. थेट ग्राहक विक्री करण्याकरिता कारखान्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने "इको-मित्र बाप्पा' अशी पणन मोहीम राबवावी. या मोहिमेमध्ये उद्योग खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रमाणपत्र देणाऱ्या प्रयोगशाळा, कारखानदार, व्यापारी तसेच ग्राहकांचा समावेश असावा. शाडूच्या मूर्ती आणि इकोफ्रेंडली रंग वापरून मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांनी तसे प्रमाणपत्र घ्यावे. "इको-मित्र बाप्पा' असा स्टिकर प्रमाणित कारखान्यांच्या मूर्तींवर असावा. स्टिकरच्या बारकोडद्वारे मातीपासून मूर्तीचा प्रवास व्हिडिओ क्लिपवर ग्राहकाला दाखवता येतो. पर्यावरणविषयक दक्ष असलेले ग्राहक या मूर्ती घेताना पर्यावरण सुरक्षेकरिता चार पैसे जास्त मोजतील. हे पैसे कारखानदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी घ्यावी. सरकारने या मोहिमेची योग्य ती जाहिरात आणि पेणच्या मूर्तींचे ब्रॅंडिंग करावे ज्यायोगे इतर राज्यांमध्ये व परदेशात या मूर्तींची मागणी वाढेल. पेणच्या "बाप्पा क्लस्टर'करिता ही मोहीम राबवून पाहता येण्यासारखी आहे.
पण अशी पणन मोहीम साधण्याकरिता उत्तम प्रतीचा डेटा हवा. भारतात सर्व क्षेत्रांमध्ये आढळणारी डेटाची रडारड या उद्योगात दिसते. पेणमध्ये तयार होणाऱ्या मूर्तींची आकडेवारी, बाजारपेठा, निर्यात, पत, रोजगार, उलाढाल अशा महत्त्वाच्या सूचक बाबींचा डेटा कुठल्याही स्वरूपात मिळत नाही. क्लस्टरच्या पातळीवर उद्योगांना हातभार द्यायचा असल्यास प्रथम क्लस्टरचा डेटा तर हातात पाहिजे ! डेटाच्या आधारे मूल्यसाखळीचे परीक्षण करून, साखळीतील कुठल्या टप्प्यावर काय हातभार द्यायला हवा याचे विश्लेषण करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.