लढवय्या विवेकी नरेंद्र दाभोलकर

महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महत्त्वाचं नाव. कार्यरत असतानाच प्रतिगामी शक्तींनी त्यांची हत्त्या केली.
Narendra-Dabholkar
Narendra-Dabholkarsakal
Updated on

- किशोर बेडकिहाळ

महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीतील डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महत्त्वाचं नाव. कार्यरत असतानाच प्रतिगामी शक्तींनी त्यांची हत्त्या केली. महाराष्ट्र एका समाजसुधारकास मुकला. आपल्या कार्यासाठी डॉ. दाभोलकरांनी हौतात्म्य पत्करले. त्यांची आजच्या दिवशी आठवण होणे अपरिहार्य आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संपर्कात मी, ज्येष्ठ कवी प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्यामुळे आलो. जवळपास चाळीस वर्षे त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्या कार्याला अनेक पैलू आहेत. डॉ. दाभोलकरांच्या सामाजिक कार्याचे दोन टप्पे आहेत. एक टप्पा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीपूर्वीचे (अंनिस) दाभोलकर (१९७० ते १९८९) आणि दुसरा टप्पा म्हणजे ‘अंनिस’मधले दाभोलकर (१९८९ ते २०१३). आजच्या ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना साधारणतः दुसऱ्या टप्प्यातले डॉ. दाभोलकर जास्त परिचित आहेत.

पहिल्या टप्प्यातील डॉ. दाभोलकर हे सर्वंकष परिवर्तनवादी, लोकशाही समाजवादी कार्यकर्ते होते. माझ्या पिढीला समाजवादाची लागण डॉ. दाभोलकरांमुळेच झाली. समाजवादी युवक दल नावाची संघटना ते चालवत असत. सुरुवातीला त्यात धनंजय कासकर, जगदीश कासट, बाळासा थोरात, कॉ.सी. पी. कुलकर्णी, कॉ. नारायणराव देशपांडे, अशोक काळे होते.

नंतर किशोर बेडकिहाळ, प्रमोद कोपर्डे, लक्ष्मण माने, दिनकर झिंब्रे, पार्थ पोळके, विजय मांडके आदी त्यात सामील झाले. डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली समाजवादी युवक दलाने भ्रष्टाचार विरोधी आंदोलने, ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात कृतिशील सहभाग, एक गाव एक पाणवठा मोहीम, एक गाव एक म्हसनवाटा मोहीम, ३५ गावांतील दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्रिपुटी येथे (१९७९) भव्य परिषद आणि तळ्यावरील पाण्यासाठी सत्याग्रह, परळी व जावळी खोऱ्यातील दलित समस्यांची पाहणी करण्यासाठी पदयात्रा, सातारा-महाड पायी यात्रा, नामांतर आंदोलनात सहभाग व तुरुंगवास, दलित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी मुक्तांगण वसतिगृह (१९७५ ते २०१३) लोकशिक्षण व्यासपीठ, ‘बेधडक’सारखे अनियतकालिक चालवणे असे अनेक उपक्रम केले.

कृतज्ञता निधी ते ‘अंनिस’

चळवळींच्या व्यापक पटावर डॉ. दाभोलकरांनी सामाजिक कृतज्ञता निधीच्या स्थापनेत आणि विस्तारात मोठा सहभाग दिला. यासाठी ‘एक उपवास कृतज्ञतेचा’ ही मोहीम राबवली. शाळांमधून विद्यार्थ्यांद्वारा मोठा निधी सामाजिक कृतज्ञता निधीला दिला. विषमता निर्मूलन समिती या महाराष्ट्राच्या विविध परिवर्तनवादी संघटनांच्या समितीतही ते सक्रिय होते.

या समितीतर्फे दरवर्षी विनिशि (विषमता निर्मूलन शिबिर) शिबिर व्हायचे. समाजवादी युवक दल (सातारा), समता युवा संघटन (ठाणे) आणि लोक संघर्ष समिती (येवला) अशा तीन संघटनांचे नामांतर आंदोलनात, तुरुंगात असताना विलिनीकरण झाले. समता आंदोलन ही नवी संघटना अस्तित्वात आली. याही संघटनेत ते सक्रिय होते.

‘अंनिस’चे पूर्णवेळ काम स्वीकारेपर्यंत, किंबहुना ते जीवनकार्य स्वीकारेपर्यंत डॉ. दाभोळकर महाराष्ट्रभर परिवर्तनादी चळवळीतील महत्वाचे व्‍यक्ती मानले जात होते. याचा फायदा त्यांना ‘अंनिस’चे काम करताना झाला. ते साधारणत: १९८६-८७ नंतर ‘अंनिस’च्या कार्याकडे वळले. (तरीही ‘मुक्तांगण’ प्रकल्पात ते कार्यरत होतेच) सुरुवातीला प्रा. शाम मानव यांच्याबरोबर आणि १९८९ पासून स्वतंत्रपणे ते ‘अंनिस’चे काम करू लागले.

डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्घा निमूर्लन समितीची रितसर स्थापना केली. त्या आधी साताऱ्यात आलेल्या डॉ. कोवूर यांच्या यात्रेतही ते सामील झाले होते. ‘अंनिस’ने सुरुवातीला जटा निमूर्लन, अंगात येणे, विस्तवावर चालणे, अशांसारख्या परंपरांविरोधात अभियान सुरू केले. ही चळवळ व्‍यापक करण्यात त्यांना यश आले.

त्यांच्याकडे कल्पकता, उपक्रमशीलता व विलक्षण संघटन कौशल्य होते. ‘अंनिस’च्या विविध अभियानांना त्यांनी दिलेली नावे हे त्यांच्या कल्पकतेचे द्योतक आहे. ‘चला भूत शोधायला’, ‘चला शिंगणापूरला चोरी करायला,’ ‘भानामतीला मूठमाती’ अशा त्यांच्या अनेक घोषणा गाजल्या. संघटना कौशल्याच्या आधारे त्यांनी लवकरच विद्यार्थी, तरुण-तरुणी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, कामगार-कर्मचारी अशा समाजातील सर्व घटकांतून कार्यकर्ते उभे केले.

आजमितीला महाराष्ट्रातील तरुणांचा सहभाग असणारी ‘अंनिस’ ही मोठी संघटना आहे. ही चळवळ आज चांगलीच स्थिरावली आहे. चळवळीचे स्वत:चे मुखपत्र (वार्तापत्र), दिवाळी अंक, निधी उभा करणे, व्‍याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे असे उपक्रम दाभोळकरांनी अव्‍याहतपणे राबवले.

प्रबोधन आणि धर्मचिकित्सा

अंधश्रद्घा हा केंद्रबिंदू ठेवून त्यांनी हळूहळू अंधश्रद्घेबाबत जनजागृतीची व्‍याप्ती वाढवली. जातीप्रथा, विधवा विवाह विशेषत: सत्यशोधक विवाह, ‘अंनिस’च्या परीक्षा, जातपंचायत विरोधी लढा, स्त्रियांचे आरोग्‍य आणि त्‍यांच्याशी जोडलेल्‍या अंधश्रद्धा, होळीसारख्या सणाबाबत वेगळी भूमिका, गणेशमूर्ती विसर्जन व पर्यावरण यांचा अनुबंध जोडणारी भूमिका, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अशा व्यापक पटावर डॉ. दाभोलकरांनी ‘अंनिस’ची चळवळ नेली.

चळवळ व संघटना चालवताना प्रबोधनाची भूमिका कायम ठेवली. ‘धर्मचिकित्‍सा’ हा ‘अंनिस’चा महत्‍वाचा अजेंडा. या धर्मचिकित्‍सेलाही व्यापक केले. हळूहळू त्‍यांनी त्यात सर्व धर्म आणले. जातिव्यवस्‍था आणि तिच्याशी संबंधित अंधश्रद्धा, अनेक बुवांचे चमत्‍कार यावरही कार्य केले. चमत्‍कारांमागची चलाखी दाखवणारी प्रात्‍यक्षिके लोकांपर्यंत पोचवली. त्‍यासाठी एक पथकच उभे केले.

त्याद्वारे गावोगावी बुवांच्या चमत्‍कारांचे भांडे फोडले. विवेकीविचार, तर्कबुद्धी यांच्या आधारे समाजाची पुनर्रचना हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्या जोडीने परमेश्‍वराच्या अस्‍तित्‍वाबाबतचा संवादही महाराष्‍ट्रभर नेला. त्यांनी प्रबोधनाचा एकही मार्ग सोडला नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत कायदा व्हावा म्‍हणून दीर्घ उपोषणही केले.

सरकारच्या वेळकाढूपणाला संयमाने उत्तर दिले. त्‍यांच्या हत्‍येनंतर अखेरीस सरकारला कायदा करावा लागला. त्‍यांच्या मागे कार्यकर्त्‍यांनी ही लढाई चिकाटीने चालू ठेवली आहे. त्‍यातून जातपंचायत विरोधी कायदा अस्‍तित्‍वात आला, त्‍याची व्याप्तीही वाढली. अनेक समाज मासिक पाळीच्या घातक प्रथांविरुद्धही आज लढताहेत.

तरुणाईला दिली दिशा

‘अंनिस’च्या रुपाने डॉ. दाभोलकरांनी तरुणाईला प्रस्‍थापितांविरोधात लढण्याची दिशा दिली. अहिंसक आंदोलनाचे मार्गही दाखवले. ‘अंनिस’च्या कार्यातून शिक्षणही सुटले नाही. ‘विवेक वाहिनी’द्वारा महाराष्‍ट्रभर महाविद्यालयात तरुणांना ठोस कार्यक्रम दिला. समाजापासून न तुटताही लोकसंघटन करता येते, हे दाखवून दिले. महाराष्‍ट्रातील विवेकी विचारधारा त्‍यांनी पुढे नेऊन आज तरुणांच्या खांद्यावर ठेवली आहे.

‘अंनिस’च्या कार्यासोबत त्‍यांनी ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादन केले. अनेकांना लिहिते केले. साधना साहित्‍य संमेलनाची सुरुवात केली. डॉ. आंबेडकर अकादमीच्या विचारवेध संमेलनातही त्‍यांचा सहभाग होता. सर्वच पुरोगामी उपक्रमाला त्‍यांचे सहाय्य झाले.

त्‍यांचे जाणे हे महाराष्‍ट्राचे प्रचंड नुकसान करून गेले. पण त्‍यांनी उभे केलेले कार्यकर्ते मात्र नेटीने लढत त्‍यांचा वारसा चालवत आहेत. ही लढाई दीर्घ आहे, याची त्‍यांना जाणीव आहे. हुतात्‍मा दाभोलकरांना अभिवादन आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा!

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com