भाष्य : ‘ब्लॉक चेन’ची सुरक्षा नि उपयोगिता

सुरक्षितता म्हणजे संकटापासून संरक्षण अथवा संरक्षित असण्याची भावना असे म्हटले जाते. या सुरक्षिततेसाठी मानवाने सतत प्रयत्न केले.
Block Chain technology
Block Chain technologySakal
Updated on

‘ब्लॉक चेन तंत्रज्ञान’ तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आहे. त्याला भेदणे सध्यातरी कठीण आहे. बिटकॉइनमुळे ते चर्चेत आले असले तरी या तंत्रज्ञानाचा उपयोग इतरही अनेक क्षेत्रांत होऊ शकतो. त्यामुळे त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्यायला हवीत.

सुरक्षितता म्हणजे संकटापासून संरक्षण अथवा संरक्षित असण्याची भावना असे म्हटले जाते. या सुरक्षिततेसाठी मानवाने सतत प्रयत्न केले. मात्र सुरक्षिततेची भावना मृगजळच ठरलेली आहे. सुरक्षिततेची यंत्रणा कालानुरूप कुचकामी ठरते. संगणकाबाबतही हेच घडले आणि घडत आहे. संगणकाचा उपयोग जसजसा विस्तारला तसतशी त्याची सुरक्षितता धोक्‍यात येऊ लागली. संगणकीय अवकाशातल्या (सायबर स्पेस) हल्ल्यांची तीव्रता वाढतच गेली. सुरवातीला खट्याळपणाच्या पातळीवरील या समस्येने आता गंभीर रुप घेतले आहे. संगणकाच्या माध्यमातून बॅंकांचे व्यवहार होऊ लागल्याने त्यात सातत्याने वाढ होत आहे. आजमितीस संगणकीय सुरक्षिततेसाठी अनेक प्रणाली उपलब्ध आहेत. माहिती, संपर्कप्रणाली आणि उपयोजनांची (ॲप्लिकेशन) सुरक्षितता असे त्याचे अनेक घटक आहेत.

असे असूनही बॅंकांचे व्यवहार संगणकाद्वारे सुरू झाल्यानंतर पैशांच्या अफरातफरीच्या घटना होत आहेतच. सध्या मूर्त स्वरुपात चलन अस्तित्वात असल्याने त्याची किंमत बदलता येत नाही. आभासी चलनामुळे (बिटकॉईन) तशी शक्‍यता निर्माण झाली आहे. ही बाब खूपच गंभीर आहे. हे टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जातो. त्याचे नाव ब्लॉक चेन तंत्रज्ञान. बॅंक जे व्यवहार करते त्याची माहिती एकत्रितपणे साठवते. शिवाय माहिती संकलित केल्याचा वेळ त्यातून कळत नाही, साठवलेली माहिती वितरीत स्वरुपात असत नाही. अशा वेळी माहितीत परस्पर,अनधिकृतपणे बदलाची आणि माहिती अपघातामुळे नष्ट होण्याची शक्‍यता असते. ब्लॉक चेन तंत्रज्ञानात ते टाळण्याची पुरेपूर काळजी घेतलेली असते. प्रथमतः माहिती साठविण्याच्या रचनेतच बदल केला आहे. या तंत्रज्ञानात माहिती सलग न साठवता तिची विभागणी ब्लॉकमध्ये (गटांत) केली आहे. एका गटातील माहिती साठविण्याची क्षमता संपली की, तो गट बंद केला जातो. त्यानंतरची माहिती नवीन गटात साठवली जाते. अशा प्रकारे निर्माण झालेले गट एकमेकांना जोडून त्यांची साखळी बनवतात. त्यामुळे त्याला ‘ब्लॉक चेन तंत्रज्ञान’ म्हणतात.

ब्लॉक चेन तंत्रज्ञानातील प्रत्येक गटाला वेळेशी जोडण्याची सुविधा असते. त्यामुळे हे गट एका निश्‍चित वेळी तयार झाल्याचे कळते. शिवाय ही संकलित माहिती एका ठिकाणी न साठवता ती वितरीत स्वरुपात अनेक अधिकृत ठिकाणी (नोड) साठवली जाते. हे सर्व नोड या प्रणालीचा भाग बनतात. यात साठवलेली माहिती अनधिकृतपणे बदलणे केवळ अशक्‍य असते. त्याचप्रमाणे प्रत्येक गटावर मारलेला शिक्का हा कायमस्वरुपी असतो. त्यामुळे साठवलेली माहिती बदलणे, नष्ट करणे किंवा काढून टाकणे अशक्‍य होते. एखाद्या नोडमधील माहिती काही कारणांमुळे नष्ट झाली तरी ती इतर नोडमध्ये सुरक्षित असते. एखाद्या नोडमधील माहिती बदलली तर इतर नोड एकमेकांशी संपर्क साधून तो बदल सर्वत्रिक झाला का? हे तपासतात. हा बदल सर्वांना ज्ञात होत असल्याने कोणत्या नोडमध्ये बदल झाला, ते कळते. शिवाय त्याची वैधता तपासता येते. त्यावरून इतरांना सूचना मिळून ते सावध होतात. होणाऱ्या बदलाला एकूण नोडपैकी बहुसंख्य नोडने स्वीकारले तरच तो वैध ठरतो. त्यामुळे असा बदल करणे जवळजवळ अशक्‍य असते. त्याचप्रमाणे एका ठिकाणी माहिती बदलल्यास ती सर्वांना कळते. ती माहिती कोणत्या ठिकाणी बदलली तेही कळते. त्यामुळे चोराला शोधणे सोपे जाते.

सामूहिक निर्णयप्रक्रिया

प्रचलित पद्धतीत असे बदल शोधणे आणि ते कोणत्या ठिकाणी झाले ते जाणून घेणे फार जिकीरीचे असते. जर एखाद्या गटातील माहिती अधिकृतपणे बदलायची असेल तर इतर गटांनी ती मान्य करणे आवश्‍यक असते. माहिती बदलण्यासाठी पुरावा सिद्ध करणाऱ्या प्रक्रियांचा अवलंब केला जातो. यातही बहुमताने निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे ही निर्णयप्रक्रिया सामूहिक असते. एकच माहिती अनेक ठिकाणी साठवल्याने माहितीची पुनरावृत्ती होत असली तरी त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकता वाढते. बहुपयोगी तंत्रज्ञान कोणत्याही गटातील माहितीत बदलणे किती दुरापास्त आहे हे आता आपण पाहू. कल्पना करा की अफरातफर करणाऱ्या व्यक्तीचा एक नोड आहे. त्यामुळे त्या नोडद्वारे तो माहितीत फेरफार करू शकतो. या माहितीतील फेरफार मान्यतेसाठी इतर एक्कावन्न टक्के नोडसची त्याला मान्यता लागते. असे होण्यासाठी फेरफार करणाऱ्या व्यक्तीला एक्कावन्न टक्के नोडसमध्ये बदल करावा लागेल. ही संख्या खूपच मोठी असल्याने तसे करणे खर्चिक आणि अशक्‍यप्राय आहे. शिवाय प्रत्येक गटाला (ब्लॉक) एक संकेत (हॅश) असतो. त्याचप्रमाणे तो त्या अगोदरच्या गटाच्या संकेताला जोडलेला असतो. याबरोबरच प्रत्येक गटावर वेळेचा शिक्का तो गट कधी तयार झाला, हे दर्शवितो. संकेत चिन्ह (हॅशटॅग) निर्माण करण्यासाठी गणितीय सूत्राचा वापर करतात. काही जण संकेत चिन्हावरून ते तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली माहिती शोधून काढतात. एखादे यंत्र पाहून ते कसे निर्माण केले हे शोधण्याचा हा प्रकार असतो. ही माहिती शोधता येऊ नये, अशाप्रकारे संकेतचिन्हाची निर्मिती केली जाते.

अशा या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रथम मुख्यतः बीटकॉईन या आभासी चलनाच्या विनिमय, वितरण आणि निर्मितीसाठी केला गेला. हे चलन कुठल्याही एका देशाचे नसून, त्याचे नियमन ते वापरणाऱ्यांकडून होते. त्यामुळे यामध्ये होणारे व्यवहार हे पारदर्शक आणि अनधिकृत बदलापासून मुक्त असायला हवेत. अन्यथा आर्थिक व्यवहार कोसळण्याची शक्‍यता आहे. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचे इतरही अनेक उपयोग आता समोर येत आहेत. लोकशाहीप्रधान देशांमध्ये निवडणूक हा महत्त्वाचा घटक असतो. ही निवडणूक पारदर्शी आणि खुल्या वातावरणात होणे आवश्‍यक असते. त्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी संगणकांचा वापर होत आहे. असे असूनही त्याबाबत अनेक आक्षेप आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर हा त्यावरील चांगला उपाय ठरू शकतो. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत शेती आणि घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महत्त्वाचे असतात. त्यांच्या दस्तऐवजात अनेक वेळा फेरफार करून घोटाळे केले जातात.

याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरल्यास असे फेरफार करण्याला आळा बसेल. अन्नपदार्थांचे वितरण ही नित्याची बाब आहे. हे अन्नपदार्थ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दुषित झाल्यास पोटाचे अथवा अन्य विकार उद्‌भवतात. अशा वेळी अन्नपदार्थ दुषित करणारा स्रोत आणि ठिकाण शोधणे आवश्‍यक असते. असा स्रोत शोधणे खूप अवघड असते. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाने ते सहज शक्‍य होते. बिटकॉईन चलनाचे व्यवहार, मालमत्तेचे दस्तऐवज, पुरवठा साखळी याबरोबरच बॅंका, मतदान, आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रांतही या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे.

या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तशा काही उणीवाही आहेत. हे तंत्रज्ञान सध्या तरी महाग आहे. याचप्रमाणे याची गती कमी आहे. यावरील नियंत्रण हे सामूहिक आहे. यावर केलेल्या गैरवापराची माहिती कायम स्वरूपात साठवली जाते. असे असूनही हे तंत्रज्ञान सुरक्षित असल्याने त्याचा वापर वाढतच राहील. त्याच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही.

( लेखक माजी कुलगुरू व पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()