विज्ञानात विविध सिद्धान्त असतात आणि ते सातत्याने तपासले जातात. त्यांची नवीन प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या प्रकाशात पुनर्मांडणी होत असते.
विज्ञानात विविध सिद्धान्त असतात आणि ते सातत्याने तपासले जातात. त्यांची नवीन प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या प्रकाशात पुनर्मांडणी होत असते. जो सिद्धान्त इतर सिद्धान्तांच्या तुलनेत जास्त पद्धतशीर पद्धतीने गोष्टींचे समर्पक स्पष्टीकरण देतो, तो विज्ञान क्षेत्रात स्वीकारला जातो किंवा टिकतो. उत्क्रांती सिद्धान्तही अशा कसोट्यांवर टिकला आहे.
जैविक उत्क्रांती सिद्धान्त पहिल्यांदा चार्ल्स डर्विन यांनी मांडला. जीवसृष्टीच्या उगमासह अनेक विषयांच्या संशोधनाची वाट या सिद्धांतामुळे प्रशस्त झाली. पण धार्मिक समजुतीला तडा जातो म्हणून अमेरिकेत काही जण या सिद्धांतालाच विरोध करत असतात. याविषयीचे वादंग तेथे सुरू असते. त्याचे पडसाद अलीकडे आपल्याकडे उमटले ते ‘उत्क्रांती-एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाल्याने. त्यातही हा पुरस्कार ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विभागासाठी मिळाला आहे. त्यामुळे त्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे.
या पुस्तकात लेखकानं उत्क्रांती ही एक वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे असं मांडलं आहे. खरंच असं आहे का? याचा अर्थ आजपर्यंत आपण एका निव्वळ काल्पनिक गोष्टीला कवटाळून बसलो आहोत का? असे असेल तर मग आतापर्यंत उत्क्रांतीने ज्या गोष्टी पुराव्यानिशी स्पष्ट आणि सिद्ध करून दाखविल्या आहेत, त्या सर्व गोष्टी विनाधार आहेत असे म्हणायचे का? असे कित्येक प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. त्याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे उत्क्रांती ही गोष्ट अंधश्रद्धा नसून ते वैज्ञानिक तथ्य आहे; जे आपण निसर्गात आणि प्रयोगशाळेत अगदी सहजगत्या तपासू शकतो. उत्क्रांती हा एक खात्रीलायक पुरावा देणारा वैज्ञानिक अनुभव आहे.
उत्क्रांती-जैविक उत्क्रांती या गोष्टीनं आत्तापर्यंत सजीवसृष्टीतील कित्येक अनाकलनीय अशी कोडी सोडविली आहेत. जीवसृष्टीच्या उत्पत्तीपासून ते मानवी जाणीवक्षमतेपर्यंत कित्येक गोष्टींचा अर्थ आपणाला उत्क्रांतीच्या प्रकाशात लागत आहे. मानव हा काही पृथ्वीवर एकदमच निर्माण झालेला विशेष जीव नसून तो जवळ जवळ साडेतीन-चार अब्ज वर्षापूर्वी सुरू झालेल्या उत्क्रांतीतील एक टप्पा आहे. मानवाचा इतर जीवांशी असणारा संबंधही आपणला उत्क्रांतीमुळेच समजू शकला आहे. आजही अनेक जीवशास्त्रज्ञ उत्क्रांतीतील गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या कित्येक गोष्टी सोडवित आहेत.
उदाहरणादाखल इतक्या वर्षात जीवशास्त्रात मिळालेले नोबेल पुरस्कार पाहिले की याचा लगेचच प्रत्यय येतो. उत्क्रांतीतील काही गोष्टी अजूनही अनाकलनीय आहेत; पण त्यावरून उत्क्रांती ही गोष्ट खोटी आहे किंवा ती एक अंधश्रद्धा आहे, असं म्हणणं पटण्यासारखं नाही. असं करणं म्हणजे व्यक्तीच्या स्वभावात काही प्रमाणात कमतरता किंवा अनाकलनीयता आहे म्हणून ती व्यक्तीच अस्तित्वात नाही, असं म्हटल्यासारखं आहे. विज्ञानाला आपल्यातील कमतरता स्वीकारायला कधीच लाज वाटत नाही. ते या बाबतीत नम्र असते. नाहीतर विज्ञानाचा विकास इथपर्यंत कधीच झालाच नसता.
जैविक उत्क्रांती सिद्धान्त पहिल्यांदा पद्धतशीरपणे चार्ल्स डार्विन यांनी आपल्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज’ या ग्रंथात पुराव्यासहित मांडला. त्यानंतर नवीन होणाऱ्या संशोधांनबरोबर तो अधिकच बळकट होऊ लागला आणि होतही आहे. या सिद्धांताद्वारे जीवसृष्टीचा उगम आणि तिच्यात होणारी विविध स्थित्यंतरे विविध पुराव्यांद्वारे सिद्ध झाली आहेत आणि होतही आहेत. असं असताना उत्क्रांतीतील अजून न सुटलेल्या काहीच गोष्टी अधोरेखित करून उत्क्रांतीच नाही म्हणणं किंवा ती अंधश्रद्धा म्हणणं अतार्किकच आहे. या न सुटलेल्या गोष्टीवर उत्क्रांतीक्षेत्र आज प्रामाणिकपणे काम करत असतांनाही! असं करणे म्हणजे संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीलाच सत्याच्या कोर्टात गुन्हेगार म्हणून उभा केल्यासारखं आहे. या प्रामाणिक गुन्हेगाराच्या बाजूने शेकडो साक्षीदार असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त आपलीच बाजू मांडून न्यायाधीशाचा निर्णय न ऐकता आपणच जिंकलो असं मानण्यासारखं आहे.
ज्ञानाच्या प्रकाशात पुनर्मांडणी
ज्या गोष्टीला पुराव्यानं तपासता येतं आणि ती गोष्ट खरी आहे असं समजतं तेव्हा त्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणताचं येत नाही. पुरावा नसताना आणि एखादी गोष्ट सिद्ध करता येत नसतानाही ती गोष्ट स्वीकारणं म्हणजे अंधश्रद्धा. या पुढं जाऊन ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा’ नावाची गोष्ट कधीच नसते. विज्ञान हे काही अंधश्रद्धेवर विकसित होत नाही. ते विश्वासावर आणि त्यातील तथ्य तपासणाऱ्या पुराव्यावर चालतं. विज्ञानात विविध सिद्धान्त असतात आणि ते सातत्याने तपासले जातात. त्यांची नवीन प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या प्रकाशात पुनर्मांडणी होत असते. जो सिद्धान्त इतर सिद्धांताच्या तुलनेत जास्त पद्धतीशीर पद्धतीने गोष्टींचे समर्पक स्पष्टीकरण देतो, तो विज्ञान क्षेत्रात स्वीकारला जातो किंवा टिकतो. या अर्थाने पाहता डार्विनची उत्क्रांती हा जीवशास्त्रात आणि विज्ञानजगतात सर्वमान्य झालेला सिद्धान्त आहे.
डॅनियल डेनेट यांच्या भाषेत डार्विनचा जैविक उत्क्रांती सिद्धान्त हा मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा शोध आहे. डार्विनने त्याकाळी मांडलेला सिद्धान्त जरी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नसला तरी डार्विनने मांडलेल्या मार्गावरून उत्क्रांती जीवशास्त्र खूप पुढे आलेले आहे. डार्विनने निर्माण केलेल्या उत्क्रांती जीवशास्त्राच्या पायवाटेचा आज महामार्ग झालेला आहे. कित्येक गोष्टींची उत्तरे डार्विन त्या काळात देऊ शकला नाही; पण त्या गोष्टींची उत्तरे अनेक वैज्ञानिकांनी दिली आहेत आणि देतही आहेत.
जीवसृष्टीची निर्मिती निर्मिक नावाच्या दैवी शक्तीशी जोडून तिचे अस्तित्व त्यातून सिद्ध करायचा प्रयत्न करणं निश्चितच अवैज्ञानिक आहे. निर्मिक नावाच्या शक्तीनं विश्वाची निर्मिती काही उद्देशानं केली आहे. मानव प्राण्याला त्यात विशेष स्थान आहे. निर्मिकानं मानवाला आपली प्रतिकृती म्हणून बनविले आहे, असे निष्कर्ष काढणं अनुभवाधारित तर नाहीच तर या केवळ अतार्किक उड्या आहेत. ‘बुद्धिमान अभिकल्प’, ‘इंटलिजंट डिझाईन थिअरी’अशा अवैज्ञानिक गोष्टी वैज्ञानिक रूपात मांडण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी तो प्रयत्न विज्ञानजगतात अजिबात टिकत नाही. ज्या पाश्चिमात्य देशात अशा गोष्टींची चळवळ आहे, तिलाही तिथे वैज्ञानिक रूपात मान्यता नाही.
अथक संशोधन
उत्क्रांती ही वस्तुनिष्ठ गोष्ट आहे, हे सिद्ध करण्यासाठी कित्येक पुरावे आहेत. उत्क्रांतीबाबतीत कित्येक संशोधक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ती अभ्यासत आणि मांडणी करत असले तरी उत्क्रांती ही वस्तुस्थिती आहे, यावर त्यांचे एकमत आहे. सुरुवातीचा जीव कसा निर्माण झाला हे सांगता येत नाही, इतके गुंतागुंतीचे शरीर असणारे जीव कसे निर्माण झाले, याला उत्तर नाही. मनुष्यासारखा बुद्धिमान जीव निर्माण होणे कधीच शक्य नाही, अशा गोष्टींची उदाहरणे उत्क्रांती सिद्धांतविरोधासाठी वापरली जातात.
पण जगभरात आत्तापर्यंत झालेल्या जीवशास्त्रीय आणि उत्क्रांती जीवशास्त्रातील संशोधनाने या गोष्टींची उत्तरे पुराव्यासहित दिलेली आहेत आणि आजही दिली जाताहेत. काही गोष्टी अजूनही अनाकलनीय आहेत; पण यावरून उत्क्रांती हा असफल झालेला सिद्धान्त आहे, असं म्हणणं चूक आहे. उत्क्रांती हे पुराव्यांधारिंत नैसर्गिक विज्ञान आहे. त्याला सिद्ध करणारे पुरावे मिळत असताना त्याला ‘छद्मविज्ञान’ म्हणणं ही जीवशास्त्राचीच नव्हे; संपूर्ण विज्ञानविश्वाची प्रतारणा होय.
(लेखक विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.