डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांनी संकल्पित केलेल्या भारताची दिशा नेमकी काय होती, हे पाहायला हवे. विशेषतः कट्टर राष्ट्रवादाची विषारी मुळं वेगाने फोफावू लागली असताना त्याची गरज तीव्रतेने समोर येते.
‘ए फॉर आंबेडकर’ या शीर्षकाची एक दीर्घकविता २००७ पूर्वी माझ्या हातून लिहिली गेल्याचे स्मरणात आहे. ही कविता एकीकडे भारताच्या समग्र विषम व्यवस्थात्मक ढाच्याकडे निर्देश करते, शिवाय या निर्मम श्रेणीबद्ध रचनेला सुरुंग लावणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाच्या योगदानाची बहुआयामी परिमाणे अधोरेखित करते. ज्या क्षेत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्तिदायी असा वैचारिक हस्तक्षेप केलेला नाही, असे ‘मानव्य’ क्षेत्र नसेल. अर्थशास्त्रज्ञ, प्रगल्भ राजकीय नेते, कुशल कायदेतज्ज्ञ, राज्यघटनेचे शिल्पकार, उदारमतवादी विचारवंत, प्रभावी वक्ते, साक्षेपी संपादक, अकादमिक लेखक, इतिहासतज्ज्ञ, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, मानववंशशास्त्रज्ञ, भारतीय स्त्री-मुक्तीचे अग्रणी, धर्मशास्त्राचे विचक्षण अभ्यासक आणि बौद्ध धम्माचे भाष्यकार... असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व!
डॉ. आंबेडकर यांनी आधुनिकतेच्या टप्प्यावर पाऊल रोवणाऱ्या भारताची संकल्पनात्मक संहिता लिहिली. समस्त स्त्री-पुरुषांना परात्म करणाऱ्या शोषण यंत्रणांच्या विरोधात त्या संहितेद्वारे इहवादाचा आणि श्रेणीविहीन समाजरचनेचा त्यांनी कल्पिलेला आकृतिबंध अलीकडच्या काळातील विखारी अशा मूलतत्त्ववादी घातक हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होताना आपण अनुभवतो आहोत. लोकशाहीचा प्राण असणाऱ्या अनेक संस्थात्मक संरचनांची स्वायत्तता आक्रसत जाऊन त्या एककेंद्री, एकचालकानुवर्ती सत्तेच्या दावणीला बांधल्या जात आहेत. सांस्कृतिक राष्ट्रवादाची विषारी मुळं वेगाने फोफावू लागली आहेत. अशा कमालीच्या विदारक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांनी संकल्पित केलेल्या, रचू पाहिलेल्या भारताची दिशा नेमकी काय होती, हे पाहणे अनिवार्य ठरावे.
त्यांच्या आचार-विचारांचे परिशीलन करताना त्यांच्या जीवनाचे ध्येय स्पष्टपणे समोर येते. ते म्हणजे भारतीय समाजातील विषमतेचा पाया असणाऱ्या जातिसंस्थेचा अंत आणि स्त्रियांची, तसेच पूर्वास्पृश्यांची सर्वंकष मुक्ती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातील पन्नासहून अधिक वर्षे अस्पृश्यतेविरोधात आणि जाती निर्मूलनासाठी एक अथक धर्मयोद्धा म्हणून व्यतित केली. ‘जातीचे उच्चाटन’ (१९३५, Annihilation of Caste) हा डॉ. आंबेडकरलिखित सर्वांत महत्त्वाचा प्रबंध आहे. या प्रबंधात बाबासाहेब जातीचे शोषणात्मक स्वरूप स्पष्ट करतात आणि तिचे उच्चाटन करून समान दर्जा व प्रतिष्ठा ही मूल्ये असणाऱ्या सामाजिक रचना निर्मितीचे आवाहन करतात.
स्त्री-मुक्तीसाठी मोलाचे विचार
डॉ. बाबासाहेबांनी स्त्री-मुक्तीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. २० जुलै १९४२ रोजी नागपुरात ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स’मध्ये केलेल्या भाषणात त्यांनी केलेले ‘स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजतो’ हे विधान स्त्री चळवळीला सार्वकालिक ताकद देणारे आहे. त्यांनी हे विधान केले तेव्हा केवळ देशात नव्हे तर जगात प्रचंड अशा राजकीय उलथापालथी सुरू होत्या. अशा काळात त्यांची ही मांडणी त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणारी आहे; परंतु तत्कालीन दार्शनिकांप्रमाणे निव्वळ प्रगतिशील विचार मांडून तिथेच थांबणारे बाबासाहेब नव्हते. म्हणूनच भारतीय राज्यघटनेद्वारा स्त्रियांच्या निखळ माणूस म्हणून विकासाला पुरेपूर वाव मिळावा याकरिता त्यांनी अथक प्रयत्न केले. तत्पूर्वी कामगार स्त्रियांना प्रसूती रजा मिळवून देणे, कुटुंब नियोजनाची साधने स्त्रियांना उपलब्ध करून देणे आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर क्रांतिकारी हिंदू कोड बिल आदी अनेकानेक कायद्यांची निर्मिती करून स्त्रियांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित होतील, हे त्यांनी व्यक्तिश: पाहिले.
डॉ. आंबेडकर हे हिंदू समाजाच्या संरचनेचे अभ्यासक असल्याने त्याचा पोत आणि त्याचे गतिशास्त्र जाणून होते. त्या संरचनेतच एक सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे जिणे पूर्वास्पृश्यांना मिळू शकेल की त्यापासून पूर्णपणे विलग होऊन वेगळी वाट चोखाळावी लागेल याबाबत ते सतत विचार करत असत. राज्यघटनेतील संरक्षित व उन्नतिकारक तरतुदींच्या हमीमुळे हिंदू समाजाच्या रचनेतच पूर्वास्पृश्यांना आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान मिळेल अशी आशा त्यांना दीर्घकाळ होती. मात्र त्यांच्या जीवनाच्या अंतिम काळात ही आशा जवळपास संपुष्टात आली. म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अर्थातच हा बौद्ध धम्म पारंपरिक बौद्ध धर्मापेक्षा खूपच वेगळा होता. समानता आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांवर भर देणारा, लोकशाहीला खऱ्या अर्थाने पूरक असा हा नवयान धम्म होता.
सामाजिक व आर्थिक लोकशाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानात्मक लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते, तसेच ते राजकीय लोकशाहीतील सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीवर अढळ विश्वास ठेवणारेही होते. त्यांच्यासाठी सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वत्रयींना अविभक्तपणे अनुसरून जीवन जगण्याचा मार्ग! या तत्त्वत्रयींचे परस्परांपासून विभक्त होणे म्हणजे लोकशाहीचा पराभवच म्हणता येईल. हिंदू जमातवादातून असा पराभव होऊ शकतो, ही भीती त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती.
विद्यमान भारतात राष्ट्रीय पातळीवर उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीने राजकीय आणि सामाजिक वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि बहुसंख्याकवाद वैचारिक- सामाजिक - सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी ठरताना दिसतो आहे. परिणामी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तिन्ही मूल्ये धोक्यात आलेली असून लोकशाहीवर मोठी आपत्ती आल्याचे दिसते. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रखर चिकित्सक वैचारिक दृष्टी आणि तदनुषंगिक प्रवाही व लवचिक कृतिकार्यक्रमाची गरज कधी नव्हे इतकी प्रस्तुत झाली आहे.
pradnyadpawar@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.