‘इस्रो’ची शुक्रावर स्वारी

dr prakash tupe
dr prakash tupe
Updated on

भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)ने शुक्रमोहीम जाहीर करताच जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष या मोहिमेकडे गेले असून, अनेकांनी त्यांचे काही प्रयोग (पेलोड) या यानासोबत पाठविण्याची विनंती केली आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी शुक्रमोहिमेची कल्पना प्रथम २०१२ मध्ये मांडून त्यावर सांगोपांग चर्चा केली होती. त्यानंतर २०१७मध्ये या मोहिमेच्या प्राथमिक खर्चांसाठी निधी मंजूर झाला. शुक्र मोहिमेसाठीचे यान मंगळयानासारखेच बनवण्याचे ठरले, मात्र त्यातील उपकरणे अत्याधुनिक असतील. उड्डाणावेळी यानाचे वजन २५०० किलो असेल आणि ते ‘जीएसएलव्ही मार्क- ३’ या अग्निबाणामार्फत प्रक्षेपित केले जाईल. यानात शंभर किलो वजनाची प्रयोगासाठीची यंत्रे असतील. यान शुक्राभोवती प्रथम ५०० कि.मी. बाय ६० हजार कि.मी. अशा लंबगोलाकार कक्षेतून फेऱ्या मारू लागेल. पुढील काही महिन्यांत यान शुक्राजवळ नेण्यासाठी त्याची कक्षा बदलली जाईल. कर्बद्विप्रणील वायूच्या दाट वातावरणाने वेढलेल्या शुक्राचा पृष्ठभाग आहे तरी कसा, त्याभोवतालचे वातावरण कसे आहे, हे वातावरण सूर्याच्या प्रभावामुळे बदलत आहे काय आणि असल्यास त्याची कारणे काय याचा शोध हे यान घेईल.

शुक्र हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. कवींनी त्याला ‘शुक्र तारा’ म्हणून संबोधले असले, तरी तो पृथ्वीशेजारचा ग्रह आहे. विशेष म्हणजे तो पृथ्वीसारख्याच आकाराचा, जवळजवळ तेवढ्याच वस्तूमानाचा, घनतेचा व गुरुत्वाकर्षणाचा ग्रह असल्याने त्याला पृथ्वीचा जुळा भाऊ मानले जाते. सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी एकाच प्रकारच्या घटक पदार्थांपासून पृथ्वी व शुक्र यांचा जन्म झाला. असे असले तरी कालांतराने शुक्र प्रचंड उष्ण व कोरडा ठणठणीत ग्रह बनला व त्याभोवती दाट असे कर्बद्विप्रणील वायूचे वातावरण तयार झाले असावे. या वातावरणात सल्फ्युरिक ॲसिडचे कणही आढळतात. शुक्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीपेक्षा नव्वद पट जास्त वातावरणाचा दाब आहे. कर्बद्विप्रणील वायूच्या दाट वातावरणामुळे शुक्रावर पडलेल्या सूर्यप्रकाशाची उष्णता पृष्ठभागापर्यंत पोचत असली, तरी ती परावर्तित होऊन शुक्राच्या वातावरणाबाहेर जाऊ शकत नाही. या ‘ग्रीन हाऊस इफेक्‍ट’मुळे शुक्र अत्यंत उष्ण ग्रह असून, त्यावरचे तापमान शिसे वितळेल, एवढे म्हणजे ४५५ अंश सेल्सिअस एवढे आहे. अशा या आगळ्यावेगळ्या ग्रहाच्या निरीक्षणासाठी आतापर्यंत ४० याने पाठविली गेली, पण त्यातील निम्म्या यानांना अपयश आले. शुक्रावरच्या प्रचंड उष्णतेमुळे, दाट कर्बद्विप्रणील वायूच्या वातावरणामुळे, सल्फ्युरिक ॲसिडच्या कणामुळे, वातावरणाच्या प्रचंड दाबामुळे, अवकाशयानांना या ग्रहावर उतरून निरीक्षण घेणे अवघड होते. याचमुळे बोटावर मोजता येतील एवढीच याने शुक्रावर उतरली. रशियाने ‘व्हेनेरा’ नावाची याने शुक्राकडे पाठविली. सुरवातीच्या यानांना अपयश आले. मात्र शुक्राच्या वातावरणाच्या प्रचंड दाबाला तोंड देत ‘व्हेनेरा-४’ यानातील कुपीने तेथील वातावरणाचे अल्पकाळ निरीक्षण केले. पुढील ‘व्हेनेरा’ यानांतील कुप्यांनीही शुक्रावर उतरून त्याची निरीक्षणे घेतली. पुढे अमेरिकी शास्त्रज्ञांनी ‘मॅगेलन’ व युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘व्हिनस एक्‍स्प्रेस’ यानांनी शुक्राची सखोल निरीक्षणे घेतली. मे २०१० मध्ये जपानच्या यानांनी शुक्राची काही निरीक्षणे घेतली. त्यानंतर मात्र एकही यान निरीक्षणासाठी पाठविले गेले नाही. या पार्श्‍वभूमीवर भारताने शुक्र मोहिमेचा घाट घातला असून, अनेक देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शुक्राचा अभ्यास करणाऱ्या ‘व्हिनस एक्‍सप्लोरेशन ॲनॅलिसिस ग्रुप’ने २०१४ च्या परिषदेत शुक्राभोवतालच्या दाट वातावरणातून रडारच्या साह्याने शुक्राचा पृष्ठभाग जाणून घ्यावा, असे सुचविले. याच परिषदेत भारताच्या शुक्रयान मोहिमेवर चर्चा झाली. हा ग्रुप भारताच्या शुक्र मोहिमेत सहभागी होऊ इच्छित आहे. तसेच भारतीय शास्त्रज्ञांना अमेरिकेतील ‘नासा’व फ्रेंच शास्त्रज्ञांसह जगभरातील शास्त्रज्ञांनी सहकार्य करण्याचे कबूल केले आहे. शुक्र यानाच्या मार्गक्रमणात व यानाचा वेग नियंत्रित करण्यास फ्रेंच शास्त्रज्ञ मदत करणार आहेत. जॅक बेलमांट या फ्रेंच शास्त्रज्ञाने शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हलक्‍या धातूच्या फुग्याचा वापर करता येईल, असे सुचविले. याचमुळे शुक्र यानामध्ये दहा किलोचा बलून ठेवण्याचे ठरले आहे. हा बलून शुक्राभोवतालच्या तप्त वातावरणाबाहेर ५५ किलोमीटर उंचीवरून शुक्राची निरीक्षणे घेईल. यानामध्ये विविध प्रकारची रडार, कॅमेरे, दुर्बिणी, स्पेक्‍ट्रोमीटर, मॅग्नेटोमीटर यांसारखी वीस उपकरणे असतील. ‘इस्रो’ ही मोहीम २०२३ मध्ये राबविण्याच्या विचारात आहे.

भारतीय शास्त्रज्ञ पुढील दहा वर्षांत सात महत्त्वाच्या मोहिमा ग्रहगोलांकडे पाठविण्याच्या तयारीत आहेत. येत्या जुलैमध्ये ‘चांद्रयान-२’ मोहीम कार्यान्वित होत असून, चंद्रावरील दक्षिण ध्रुवानजीक यान उतरवून ‘इस्रो’ इतिहास घडविणार आहे. ‘इस्रो’ लवकरच दुसरी मंगळ मोहीम राबविणार आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या चार-पाच वर्षांत आपले यान शुक्राकडे झेपावणार असल्याने अवकाश क्षेत्रात भारताचा मोठा दबदबा निर्माण होईल, हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.