भाष्य : पंचप्राणांसाठी ‘मिशन लाइफ’

जागतिक हवामान बदलांच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी भारताने ‘मिशन लाइफ’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे.
mission life
mission lifesakal
Updated on

जागतिक हवामान बदलांच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी भारताने ‘मिशन लाइफ’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून पर्यावरणस्नेही विकास साधण्याच्या या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे. यंदाच्या पर्यावरणदिनाची भारताने जाहीर केलेली संकल्पनाही तीच आहे.

ही पृथ्वी, ही हवा, ही माती आणि हे पाणी म्हणजे काही आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला वारसा नव्हे; तर पुढील पिढीकडून आपण घेतलेली ती उचल आहे. हा ठेवा जसा आपल्यापर्यंत पोचला किमान तशाच स्थितीत पुढील पिढीपर्यंत पोचवणे हे आपले कर्तव्य आहे.

- महात्मा गांधी

निसर्गाकडून मिळालेला ठेवा जतन, संवर्धन करून आपल्या पुढील पिढीपर्यंत पोचवण्याच्या संकल्पापासून औद्योगिकीकरणाच्या गेल्या सुमारे दीड शतकाच्या इतिहासात आपण दूर गेलो आहोत. विकासाच्या संकल्पनांना शाश्वत मूल्यांची जोड देऊ न शकल्याने आपण निसर्गस्नेही जीवनशैलीशी फारकत घेत आहोत. मानवी गरजा भागवण्याएवढे स्रोत निसर्गाकडे नक्कीच आहेत, परंतु आपली हाव भागवणे त्यालाही शक्य नाही, हे आपल्यापैकी प्रत्येकालाच ठाऊक आहे. तरीही, आपल्या खऱ्या आणि कृत्रिम गरजा यांत मेळ न ठेवल्याने अतिविकोपाच्या हवामान बदलांच्या रूपांतील दुष्परिणामांना सामोरे जाण्याची वेळ आपण स्वतःवर ओढवून घेत आहोत.

निसर्गावर स्वार होण्याच्या मानवी दुःसाहसामुळे ती स्वारीच आता आपल्यावर रुसली आहे. परिणामी, पंचतत्त्वांचं संचालन करणाऱ्या त्या अद्भुत शक्तीला यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुन्हा एकदा नमन करून, तिच्या स्वास्थ्यामध्येच आपले स्वास्थ्य सामावले आहे, हे मान्य करणे आता अनिवार्य आहे. यंदाच्या मे महिन्यात असाधारण उकाडा आणि तेवढाच असाधारण गारांचा पाऊस आपण अनुभवला. २०२३ ते २०२७ ही पाच वर्षे जगभरातच आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता जागतिक हवामानशास्त्र संस्थेने व्यक्त केली आहे.

दाराशी येऊन ठेपलेल्या या संकटावरील उपाययोजनांच्या चर्चा संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली जगभरातील देश सातत्याने करत आहेत. परंतु हे उपाय केवळ ‘राजा बोले, दळ हले’ असे वरून खालीपर्यंत पोचवले किंवा लादले जाणारे न ठरता, ते लोकसहभागातून वरपर्यंत येणारे ठरावेत, अशी संकल्पना भारताने संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत मांडली. गेल्या वर्षीच्या पर्यावरणदिनी त्याची घोषणा झाली. आता लोकसहभागातून निसर्गसंवर्धनाचे प्रारूप जगापुढे ठेवत यंदाचा पर्यावरण दिन भारतामध्ये साजरा केला जात आहे.

लाइफस्टाइल फॉर एनव्हायरन्मेंट (लघुरूप :लाइफ) असे या मोहिमेचे नाव आहे. भारतातील आणि देशाबाहेरीलही किमान एक अब्ज लोकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी आणि २०२८पर्यंत भारतातील किमान ८०%गावे आणि नगर संस्था पर्यावरणस्नेही व्हाव्यात, हा या मोहिमेचे उद्देश आहे. म्हणजे काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सरकारने ऊर्जा बचत, पाणी बचत, प्लास्टिकचा प्रतिकार, शाश्वत अन्ननिर्मिती प्रक्रियेचा अंगीकार, कचरा कपात, सुदृढ जीवनशैलीचा अंगीकार आणि ई-कचरा कपात या सात स्वरूपांच्या ७५ उपायांची यादी प्रसृत केली आहे.

त्यामध्ये नवीन वाहनखरेदी करताना पेट्रोल किंवा डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वाहनांना प्राधान्य देणे, भाज्या धुण्यासाठी वापरलेले पाणी झाडांसाठी वापरणे, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरणे, इलेक्ट्रॉनिक साधने खराब झाली तरी ती दुरुस्त करून वापरण्याची शक्यता पडताळणे अशा प्रत्येकाला सहजशक्य असणाऱ्या उपायांचा समावेश आहे. या उपायांतून निसर्गस्नेही जीवनशैली अंगीकारणाऱ्या नागरिकांच्या प्रभावातून सेवा आणि वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या बाजारपेठेतील मागणीला दिशा देणे, त्या बदलत्या मागणीनुरूप पुरवठ्यासाठी उद्योग व व्यापारसंस्थांना उद्युक्त करणे आणि त्या बदलत्या मागणी-पुरवठा साखळीतील समतोल राखण्यासाठी पूरक औद्योगिक व शासकीय धोरणे आखणे अशा तीन स्तरांवर ही मोहीम राबवली जात आहे.

आपल्या देशाने चक्रीय अर्थव्यवस्थेकडे (सर्क्युलर इकॉनॉमी) जावे, अशी या मोहिमेची अपेक्षित अंतिम फलनिष्पत्ती आहे. या चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी सामाजिक विकास, आर्थिक विकास आणि शाश्वत पर्यावरण यांचा समतोल साधला जाईल, अशी धोरणकर्त्यांची दिशा राहील. तो समतोल साधण्यासाठी वापरातील कपात, फेरवापर आणि फेरप्रक्रिया (रेड्यूस, रीयूज, रीसायकल) या तीन मार्गांचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी सरकारने आपल्या स्तरावरही नागरी क्षेत्रांमधील घनकचरा व ओला कचरा, भंगारातील धातू, इ-कचरा, लिथियम आयन बॅटऱ्या, सौरपंखे, जिप्सम, विषारी आणि घातक औद्योगिक सांडपाणी, वापरलेले टाकाऊ तेल, शेतातील जैवकचरा, रबर व टायर फेरप्रक्रिया आणि वापरातून बाद झालेली वाहने ही ११ क्षेत्रे निश्चित केली आहेत.

मागणी व धोरणआखणी या आघाड्यांवर असे प्रयत्न होत असताना, पुरवठ्याच्या आघाडीवरील सकारात्मक प्रतिसादही सुनिश्चित होईल. त्यातही, पर्यावरणाची हानी करणाऱ्या हवामान बदलांना सर्वाधिक कारणीभूत घटक हरितगृह वायूंची (ग्रीन हाऊस गॅसेस) निर्मिती हा ठरत असल्याने आणि खनिज इंधने ही ७५% हरितगृह वायूंच्या निर्मितीला कारणीभूत असल्याने, या इंधनांच्या वापराला पर्यायी मार्ग व पर्यायी स्रोत शोधण्याला शासकीय धोरणांत प्राधान्य दिसते. एका अर्थाने, अक्षय स्रोतांपासून केलेली इंधन व ऊर्जानिर्मिती ही हवामान बदलांच्या रूपातील संकटाचे ढग दूर करणे आणि पर्यायाने ‘मिशन लाइफ’नुसार अपेक्षित पर्यावरणस्नेही जीवनशैली अंगीकारणे सुकर ठरू शकते.

संक्रमणातील भारतासाठीच्या संधी

केवळ आपल्या देशासाठीच नव्हे; तर संपूर्ण जगासाठी हा आव्हाने आणि संक्रमण यांचा काळ आहे. या संक्रमणातच मोठी संधी आहे. खनिज ऊर्जा स्रोतांसाठीचे आपले परावलंबित्व आणि अक्षय ऊर्जा स्रोतांची मुबलक उपलब्धता यांतून ही संधीची कवाडे शाश्वत विकासाचे अवकाश दाखवत आहेत. लोकसहभागातून अपेक्षित ऊर्जा बचत आणि कचरा कपात यांमधून अक्षय ऊर्जा निर्मितीसाठीचे जैवस्रोत उपलब्ध होणार किंवा उपयोगात येणार आहेत.

ओला आणि सुका कचरा विलगीकरण प्रत्येक घराच्या स्तरावरच झाले आणि त्यातून इंधनरुपी फेरप्रक्रिया करण्यायोग्य घनकचरा उपलब्ध झाला तर त्याचा वापर रस्ते वाहतुकीसाठीच्या जैवइंधनापासून शाश्वत हवाई इंधनाच्या निर्मितीपर्यंत होऊ शकणार आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे नागरिकांनी अधिक प्रमाणात वळण्यास सुरुवात केली तर त्या विजेची निर्मितीही सौरऊर्जा, पवनऊर्जा, जैवऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या रुपातील ऊर्जा अशा स्वच्छ व परवडणाऱ्या स्रोतांपासून करण्याच्या पर्यायांवर आपल्याला विसंबता येणार आहे.

यातील जैवऊर्जेचा पर्याय चक्रीय अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शेतांतील जैवकचरा, टाकाऊ धान्य, शहरी घनकचरा अशा स्रोतांपासून ही ऊर्जानिर्मिती करण्याचे तंत्रज्ञान आता आपल्या देशातही विकसित झाले आहे. एकीकडे येत्या काळात या स्रोतांची विल्हेवाट ही वाढती डोकेदुखी ठरण्याची चिन्हे असताना तो कचरा हीच संपत्ती ठरण्याचा मार्ग म्हणजे हे तंत्रज्ञान आहे. त्यातून आपल्या शेतीकेंद्रित ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग खुला होणार आहे. दुसरीकडे, त्यामुळे खनिज इंधनस्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन त्यावर खर्च कराव्या लागणाऱ्या परकी चलनाचा बोजाही कमी होणार आहे. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी होऊन त्याला मजबुतीचे पंख लाभतील.मात्र हे सगळे शासकीय धोरणांचे पाठबळ मिळाल्यासच उभे राहू शकणार आहे, हे येथे अधोरेखित करायला हवे.

या तीन स्तरांवरील प्रयत्नांचा समतोल ‘मिशन लाइफ’मधून आपण साधू शकणार आहोत. त्यामुळे, या मोहिमेचे यश हे चक्रीय अर्थव्यवस्थेतून शाश्वत विकासासाठीचे जगापुढील प्रारूप ठरू शकते. प्रकृति रक्षति रक्षितः असे संस्कृत वचन आहे. आपण निसर्गाचे रक्षण (संवर्धन) केले तर निसर्गही आपले रक्षण करतो, असा त्याचा अर्थ आहे. आपल्यात पंचप्राण फुंकण्याची त्याची शक्ती आपल्या शाश्वत विकासासाठी उपयोगात आणण्याचा आपण सारे संकल्प करूया!

(लेखक प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.