भाष्य : महासाथीतील मनोवस्थेचे टप्पे

गेली दोन वर्षे लोक कठीण अशा मानसिक त्रासातून गेलेले असल्याने महासाथ संपल्यानंतरही समाजाला मानसिक आरोग्यासाठी विविध माध्यमातून मदत द्यावी लागेल.
Mood
Moodsakal
Updated on
Summary

गेली दोन वर्षे लोक कठीण अशा मानसिक त्रासातून गेलेले असल्याने महासाथ संपल्यानंतरही समाजाला मानसिक आरोग्यासाठी विविध माध्यमातून मदत द्यावी लागेल.

गेली दोन वर्षे लोक कठीण अशा मानसिक त्रासातून गेलेले असल्याने महासाथ संपल्यानंतरही समाजाला मानसिक आरोग्यासाठी विविध माध्यमातून मदत द्यावी लागेल. ती दीर्घकालीन, शास्त्रीय उपायांवर आधारित असावी आणि तज्ज्ञांमार्फत अंमलात आणली जावी.

गेल्या दोन वर्षात करोनाच्या महासाथीतील मानसिक परिणामही मोठे आहेत. त्यांचा अभ्यास करताना एक विशिष्ट आकृतिबंध दिसतो. बहुतेक समाज त्यातून गेले आहेत.आजही जात आहेत. वाईट बातमी किंवा वाईट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वैद्यकीय व मनोविज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे ‘कूब्लर रॉस’ मॉडेल करोनामध्ये कितपत लागू पडले, हे पाहूया.

सर्वप्रथम ह्या मॉडेलच्या प्रणेत्या एलिझाबेथ कूब्लर रॉस यांच्याविषयी. कूब्लर रॉस (१९२६-२००४) स्विस-अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञ होत्या. त्यांनी आपल्या करिअर मध्ये मृत्यूसंबंधातील अनुभवांचा अभ्यास केला. त्यांचं या संदर्भातलं जगप्रसिद्ध पुस्तक On Death and Dying वाचकप्रिय आहे. एखाद्याला ''तुम्ही गंभीर रोगाने आजारी आहात'' हे सांगिल्यावर ती व्यक्ती कोणकोणत्या मानसिक अवस्थांमधून जाते, यासंबंधीचे टप्पे सांगणारे मॉडेल कूब्लर रॉस यांनी १९६९ मध्ये जगापुढे मांडलं. मनोविज्ञानाच्या अभ्यासात आजही ही संकल्पना शिकविली जाते.

कोणत्या अवस्थांमधून लोक जातात?

१) नकार २) संताप ३) करार/सौदा ४) नैराश्य ५) स्वीकार

वाईट बातमी ऐकल्यानंतर संबंधित व्यक्ती जेव्हा सुरुवातीच्या अवस्थांमध्ये असते तेव्हा त्यांची कार्यशक्ती, ऊर्जा, सकारात्मकता कमी होते. जेवढे मोठे नैराश्य तेवढे ते नकारात्मकतेच्या गर्तेत ते लोटले जाऊ शकतात. वाईट बातमी कळताच लोक नकाराच्या पवित्र्यात जातात. ‘मृत्यू जवळ आला आहे’ किंवा ‘काहीतरी वाईट घडलेलं आहे’ हे त्यांचं मन मान्य करत नसते. परिस्थिती लक्षात आल्यानंतर ते रागाच्या टप्प्यात जातात. ह्या दरम्यान ते आपल्यावर ही वेळ का ओढवली, ह्याबद्दल अवलोकन करू लागतात आणि स्वतःला किंवा इतरांना ते कोसतात. त्यानंतर ते स्थितीशी सौदा करायला तयार होतात.

वैयक्तिक मानसिक धक्क्यातून सावरताना येणारे हे अनुभव जीवनाच्या इतर क्षेत्रात, परिस्थितीतही येतात का? कूब्लर रॉस यांचं मॉडेल व्यवसाय क्षेत्रात घडणाऱ्या मोठ्या बदलानंतरही लागू होते. उद्योग व्यवस्थापनातही या मॉडेलचा उपयोग होतो. महासाथ हा जगातील बहुतांश लोकांसाठी एक मोठा मानसिक आघात आहे. अनेक लोक स्वतः आजारी पडले, अनेकांचे जवळचे कुणीतरी यात दगावले, अनेकांचा व्यवसाय गेला, करियर बुडाले आणि विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. हा आघात सहन करताना बहुसंख्य लोक कूब्लर रॉसच्या पाच पायऱ्यांमधून गेल्याचे आपल्याला दिसेल. ते कसे?

१. नकार- कोरोनाची साथ चीन,युरोपात सुरु झाल्यानंतर अनेक व्यक्तींनाच नव्हे तर सरकारांनाही वाटले, की ही समस्या आमच्या देशात निर्माण होणार नाही. ‘कोरोना आमच्या देशात फार वाढणार नाही, लोकांना मारणार नाही. आम्ही सुरक्षित आहोत’ असे अनेकांनी जाहीर केले. याशिवाय हा आजारच नाही किंवा करोना हा विषाणूच नाही असाही प्रचार होऊ लागला. हा गंभीर आजार नसून मरणारे लोक कोरोनाने नाही, तर इतर कारणांनी मेलेत, ते डॉक्टरी उपचारांनीच मरत आहेत, असेही काहींना वाटले.

२. संताप- ही अवस्था जगभरच्या देशांत आणि समाजांत दिसून आली. भारतीय समाजही त्यातून गेला. कोरोनाला चीन जबाबदार, सरकार जबाबदार, मरकजचे मुस्लिम किंवा परदेशातून येणारे प्रवासी कारणीभूत, अशा अनेक धारणा दिसून आल्या. त्याद्वारे आपल्या समाजाने संताप व्यक्त केला.

३. सौदेबाजी- नकार आणि रागाच्या अवस्थेनंतर कोरोनाच्या परिस्थितीचे, गांभीर्याचे आकलन होऊन व्यक्ती, समूहांनी काहीशी तडजोडीची भूमिका घेतली. कोरोना कायमचा नाही. ठाणबंदीने साथ आटोक्यात येईल. समूह प्रतिकारशक्ती आली की तो नक्की संपेल. औषधे आणि लशी आल्या की कोरोना जाईलच. तोपर्यंत आम्ही मास्क, सोशल डिस्टन्स याद्वारे स्वतःला सांभाळून घेऊ, अशा प्रकारचा एक ‘मानसिक करार’ आपण परिस्थितीशी केला आणि यातून आपल्याला जावे लागले, आपण या काही गोष्टी केल्या तर कोरोनाची समस्या राहणार नाही, असे अनेकांना वाटले.

४. नैराश्य- मनाने कोरोनाच्या परिस्थितीशी तात्पुरता करार करण्याचे ठरवले असले तरी कोरोना मात्र जाता जात नव्हता. एका लाटेनंतर दुसरी आली, लोक आजारी पडत राहिले, सरकारं निर्बंध लावत राहिले, लोक मरत राहिले. व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्या, स्वातंत्र्य गेलं. यातून नैराश्य आलं. ही परिस्थिती नेमकी कधी बदलेल? कोरोना जाईल की नाही? अशा शंका सगळ्यांना येऊ लागल्या.

५. स्वीकार- हळूहळू लोकांना असे लक्षात येऊ लागले, की ही अनिश्चितता लगेच संपणार नाही. लस घेऊनही संक्रमण सुरु राहील. आपल्याला कोरोनासोबत सुरक्षित कसे जगता येईल हे बघावे लागेल. हे लक्षात आल्यावर लोकांनी वास्तव स्वीकारायला सुरुवात केली. यातून आपल्याला जायलाच हवं, लस घ्यायला हवी, सुरक्षा पाळायला हवी, ‘न्यू नॉर्मल’ स्वीकारायला हवं आणि मार्गक्रमण करायला हवं. ही सत्य परिस्थिती स्वीकारल्यावर अनेकांचं जगणं सुखकर झालं.

कूब्लर रॉस मॉडेलचा संदेश काय?

१. गंभीर मानसिक धक्क्यातून जाताना बरेच लोक संताप आणि नैराश्य या टप्प्यात अडकून बसतात आणि हानी करून घेतात. हीच बाब समाजालाही लागू होते. कोरोना काळातही आपण हे समाज आणि देश म्हणून भारतात अनुभवले.

२. संताप आणि नैराश्य याखेरीज अजून एका पायरीवर भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर अडकून बसले, ती म्हणजे नकाराची. ‘प्रत्येक देशात कोरोना हा आजार नाही, हा विषाणू नाही, हे षडयंत्र आहे, देशाचे, औषध कंपन्यांचे किंवा डॉक्टरांचे षडयंत्र आहे’ असे ठणकावून जाहीरपणे बोलणारे लोक आजही आपल्याला दिसून येतात. ‘आपल्याकडे लाट येणार नाही, पहिली लाट गेल्यावर दुसरी येणार नाही, आता तिसरी येणार नाही, लसीची गरज नाही’ वगैरे ही नकारावस्थेची उदाहरणे आहेत. या अवस्थेत जाणारे लोक किंवा समाज केवळ खेडूत, अशिक्षित असे नाहीत; तर उच्चशिक्षित मंडळींनी देखील या अवस्थेतून बाहेर यायला अनेक महिने घेतले. आजही बरेच लोक ह्याच अवस्थेत अडकून पडलेत. त्यामुळे अनेकांना त्रास झाला. कोरोना खरा नाही म्हणणारे अनेक लोक जगभर मेलेत, हे लक्षात घ्यावे. लशींना विरोध करणारे, लस न घेतलेले बरेच लोक आजही मरताहेत. या मंडळींनी स्वतःचं नुकसान केलं तसं इतरांनाही संभ्रमात टाकलं.

३. प्रत्येक लाटेचं कूब्लर रॉस मॉडेल- संपूर्ण महासाथीत जसे आपण पाच टप्प्यांतून गेलो; तसेच प्रत्येक लाटेदरम्यान आपण याच अवस्थांमधून थोड्याफार प्रमाणात जात आहोत. याबरोबरच लस घेण्यासंदर्भात अनेकांचा या मॉडेलमधून प्रवास झाला आहे. अनेक लोक आजही लस घेणारच नाही, याची गरज नाही, अशा नकारात अडकलेले आपल्याला दिसतात.

४. या माहितीच्या आधारे आपत्तीतून जाताना समाज कुठल्या मानसिक स्थितीतून प्रवास करतो हे जाणून घ्यायला मदत होते. ह्या अवस्थांचं ज्ञान असल्यास समाज विशिष्ट पद्धतीने का वागतो हे समजणे सोपे होते आणि त्यानुसार लोकांकडून काय अपेक्षा करावी, त्यांची प्रतिक्रिया काय असेल, त्यांना काय मदत लागेल याचे निर्णय घेता येतील.

५. आपत्तीबद्दल शास्त्रीय माहिती लोकांना उपलब्ध करून दिली, लोकांना विश्वासात घेतले तर त्यांना या मानसिक अवस्थांमधून जाताना कमीत कमी त्रास होईल असे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ नकारावस्था, संताप आणि नैराश्य या अवस्थांचा कालावधी समाजात किंवा देशात आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकतो. योग्य माहिती, सकारात्मक आणि आश्वासक असा मदतीचा हात मिळाल्यास सत्य परिस्थिती स्वीकारून तिचा सामना करायला लोक तयार होतील आणि समाजाला पुढील मार्गक्रमण करायला सोपे होईल.

६. आपत्कालीन उपाययोजना करताना समाजाची मानसिकता महत्त्वाची. याचं कारण समाजातील लोकांचे वर्तन, प्रतिक्रिया, अपेक्षा आणि आनंद हे सर्व त्यांच्या मानसिक अवस्थेतवर अवलंबून असतात. त्यादृष्टीने मानसिक आरोग्य व्यवस्थापन ही देखील कोरोनाच्या नियोजनाच्या प्राधान्यक्रमात असणे गरजेचे आहे. गेली दोन वर्षे लोक कठीण अशा मानसिक त्रासातून गेलेले असल्याने करोना महासाथ संपल्यानंतरही समाजाला मानसिक आरोग्यासाठी विविध माध्यमातून आधार लागेल. तो दीर्घकालीन, शास्त्रीय उपायांवर आधारित आणि तज्ज्ञांमार्फत अंमलात येणं गरजेचं आहे. सरकारी पातळीवर याबाबत योजना आखून त्यासाठी यंत्रणा उभारणे आणि ती दीर्घकाळ प्रभावी चालवण्यासाठी योग्य निधी उपलब्ध करून देणे ही समाज व देशासाठी मोठी गुंतवणूक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.