शैक्षणिक संशोधनाला गती गरजेची

कोरोनाचे आव्हान मोठे होते. त्याचा विपरित परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला. शिक्षण प्रक्रियेतील अनेक प्रश्‍नही समोर आले.
Educational Research
Educational ResearchSakal
Updated on

- प्रा. डॉ. साताप्पा लहू चव्हाण

कोरोनाचे आव्हान मोठे होते. त्याचा विपरित परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला. शिक्षण प्रक्रियेतील अनेक प्रश्‍नही समोर आले. हे लक्षात घेता शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधनाला गती देणे विद्यार्थिहितासाठी अगत्याचे आहे.

कोरोना महासाथीनंतरच्या काळात शैक्षणिक संशोधनास चालना मिळणे गरजेचे होते. पण तसे होताना दिसत नाही. यावर विचार करण्याची आज गरज आहे. तसे पाहता शैक्षणिक संशोधनाची प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची नाही. ती सरळ आणि सोपी आहे, हे आपण ध्यानात घेणे गरजेचे आहे.

समाजातील कोणत्याही समस्येची निवड करणे, त्या समस्येसंदर्भातील परीकल्पनेची संरचना करणे, संबंत समस्येची माहिती संकलित करणे, समस्येसंदर्भात प्राप्त महत्त्वपूर्ण निष्कर्षाचा अहवाल तयार करणे, संशोधन समस्या शोधणे आणि त्या संदर्भातील विविध विषयांच्या अभ्यासाची पद्धत शोधणे, माहितीचे संयोजन व अर्थनिर्वचन, निष्कर्षाचा अहवाल व्यवस्थित मांडणे या सर्व मुद्द्यांना शैक्षणिक संशोधन प्रक्रियेत महत्वाचे स्थान असल्याचे शिक्षणविषयक अभ्यासक अनंत जोशी यांनी या पूर्वीच नमूद केले आहे.

या सर्वांचा वर्तमानात पुन्हा नव्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. कोरोनानंतरच्या काळातील शैक्षणिक विश्व बदलल्याचे चित्र दिसत आहे. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे संपूर्ण भावविश्व, त्यांची मानसिकता, त्यांना प्राप्त होणारी शैक्षणिक साधनसामग्री या सर्वांचा पुन्हा नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शैक्षणिक संशोधनासाठी आवश्यक असणारे विविध स्रोत शोधणे अर्थात सांस्कृतिक स्रोत, सादृश्य स्रोत, वैज्ञानिक स्रोत, सैद्धांतिक स्रोत, संशोधकांचे व्यक्तिगत ज्ञान आणि अनुभव यांचा पुन्हा नव्याने समन्वय साधल्यास शैक्षणिक संशोधन विकास प्रक्रिया गतिशील होण्यासंबंधीचा सकारात्मक विचार बळकट होईल, यात शंका नाही.

डिजिटल शैक्षणिक साहित्य

‘डिक्शनरी ऑफ एज्युकेशन ’ या ग्रंथानुसार ‘शैक्षणिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक समस्यांशी निगडित अभ्यास व अन्वेषण यास शैक्षणिक संशोधन’ म्हटले आहे. याचा अर्थ असा होतो की, शिक्षण क्षेत्रातील उद्दिष्ट्ये, अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापनपद्धती, मूल्यमापन, विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक साहित्य, तंत्र, पाठ्यपुस्तके इत्यादींपैकी एक वा अनेक शैक्षणिक घटकांच्या संदर्भांत निर्माण झालेल्या अथवा होणाऱ्या समस्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तर शोधण्याचा केलेला वा करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे शैक्षणिक संशोधन असे अभ्यासक मौली यांनी केलेली मांडणी महत्त्वाची वाटते.

कोरोना नंतर या प्रक्रियेत शिथिलता आल्याचे प्रकर्षाने अनुभवायाला येते. डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्माण प्रक्रिया वाढली, पण ती प्रयोगात आणण्यात आपण कमी पडत आहोत, याचा विचार होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक वातावरणाचा नव्याने अभ्यास करून शैक्षणिक संशोधन विषयाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे.

शिक्षण विषयक संशोधनाला चालना मिळावी म्हणून शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील कोरोना नंतरच्या शैक्षणिक पारिस्थितीचा विस्तृत अभ्यास होणे गरजेचे वाटते. ग्रामीण भागातील शाळा, विशेषतः जिल्हा परिषद चालवत असलेल्या मराठी शाळा व त्यांची शैक्षणिक पारिस्थिती चिंता वाढवणारी आहे, हे आपणांस मान्य करावे लागेल.

संस्थात्मक स्तरावरील कार्य

संस्थात्मक स्तरावर १९१७ पासून सुरू झालेली शैक्षणिक संशोधन प्रक्रिया पुढे विविध संस्थांच्या माध्यमातून आजही सुरू आहे. ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’, ‘सेंट्रल ब्यूरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च’, ‘नॅशनल फंडामेन्टल एज्युकेशन सेंटर’, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्ह्युज्युअल एज्युकेशन’, ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ (एनसीईआरटी), ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’ (आयसीएसआर) आणि ‘नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन’ या संस्थांचा उल्लेख करावा लागेल. शिक्षणविषयक संशोधनाला या संस्थांनी आपापल्या कक्षेत भरीव योगदान दिले आहे. शैक्षणिक संशोधनास चालना देण्यासाठी कोठारी आयोगानेही विशेष प्रयत्न केले, हे मान्य करावे लागेल.

डॉ. एम. बी. बुच यांचा शिक्षणातील संशोधनाचे सर्वेक्षण (A Survey of Research in Education) हा ग्रंथ आजही महत्त्वाचा वाटतो. या ग्रंथाची कोरोना नंतरच्या शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करण्यास निश्चित मदत होईल. शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक अर्थशास्त्र समजावून घेण्यात आजही आपण अपयशी ठरत आहोत. वर्तमानाचा विचार करता अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शाळाबाह्य विद्यार्थी व त्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच आहेत. एक-दोन योजना येतात पण त्या फारसा प्रभाव टाकत नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज

आपल्या देशात आंतरविद्याशाखीय शैक्षणिक संशोधनावर कोठारी आयोग आणि ‘एनसीईआरटी’ या संस्थांनी भरीव कार्य केले आहे. विविध विद्या शाखा आणि त्यामध्ये कार्यरत संशोधक आपापल्या क्षेत्रात संशोधन करत असतात. पण आंतरविद्याशाखीय शैक्षणिक संशोधनास चालना दिल्याने शैक्षणिक संशोधन विषय क्षेत्रांचा विस्तार झाला.

परिणामी इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तुलनात्मक शिक्षण, स्त्री शिक्षण, वंचितांचे शिक्षण, मूल्य शिक्षण, लोकसंख्या व पर्यावरण शिक्षण अशा अनेक विषयांमध्ये संशोधनाची देवाण-घेवाण वाढताना दिसत आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक असून, अहमदनगर कॉलेजमध्ये हिंदीचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.