उष्णकटिबंधीय प्रदेशात समुद्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळांचा धोका वेळोवेळी उद्भवत आहे. यामुळे शतकानुशतके जीवितहानी मालमत्तेचे नुकसान होत आले आहे. हे कसे टाळता येईल, यासाठीच्या उपायांची दिशा सुचविणारा लेख.
भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्याने एकूण ७५१६.५ किमी अंतर व्यापले आहे. भारत हा चक्रीवादळाच्या दृष्टीने जगातील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. जगातील जवळजवळ ६% चक्रीवादळे दरवर्षी या भूमीवर आदळतात. चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर होत असला तरी मुख्यतः पूर्व किनारपट्टी आणि गुजरातच्या किनारपट्टीला जास्त धोका आहे. चक्रीवादळाने बाधित अशी १३ किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामधील ८३ जिल्हे किनारपट्टीला लागून आहेत. यामध्ये आंध्र, ओडिशा, तामिळनाडू आणि प. बंगाल आणि पूर्व किनारपट्टीवरील एक केंद्रशासित प्रदेश अशी चार राज्ये चक्रीवादळाच्या आपत्तीत सर्वाधिक असुरक्षित आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे अशा आपत्तींचा धोका समुद्रकाठी वसलेली शहरे व बंदरे यांना आहे. भारतीय हवामान विभागाने नमूद केलेल्या चक्रीवादळाच्या श्रेणीनुसार, जर वाऱ्याचा प्रत्येकी ताशी वेग १२५ ते १६६ किमी असेल, तर मालमत्तेचे नुकसान होते. हाच वेग ताशी १६७ ते २८० किमीपेक्षा जास्त झाला, तर मोठी जीवितहानीही संभवते. शिवाय विस्तारित क्षेत्रात परिणाम होतो. किनारपट्टीच्या प्रदेशातील सखल भाग पाण्याखाली जातो, वनस्पती नष्ट होतात, समुद्रकिनारे आणि तटबंदीचे नुकसान होते आणि मातीची सुपीकता कमी होते. या पार्श्वभूमीवर हानी कमी करण्यासाठी पुढील मुद्दे महत्त्वाचे वाटतात.
डेटाचा वापर :
चक्रीवादळाची तीव्रता आणि वारंवारता या संदर्भातील भरपूर डेटा उपलब्ध आहे. ज्या स्थानावर एखाद्या व्यक्तीची मालमत्ता आहे किंवा ती तयार करू इच्छित आहे, अशा ठिकाणी चक्रीवादळामुळे होणाऱ्या जोखमीचे मूल्यांकन होत नाही. आज गरज आहे ती वादळामुळे तयार होणाऱ्या मालमत्तेचे नुकसान टाळण्याची, याकरिता जर वादळापूर्वीच होणारे नुकसान कळले आणि त्यानुसार समुद्रकिनारी कोणत्या जागी कसे बांधकाम असावे, किती नुकसान होण्याची शक्यता आहे, इन्शुरन्स घेणे योग्य ठरेल का? असे अनेक प्रश्न विचारात घ्यावे लागतील. आज इन्शुरन्स कंपन्यांना मालमत्तेवर होणारा धोका आधीच कळण्याची गरज आहे, त्यानुसार इन्शुरन्स प्रिमियम लावणेही त्यांना सोईचे जाईल.
संबंधित घटकांमधील जागरूकता :
EM-DAT ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात सुमारे सात लाख लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला असून यामुळे सुमारे अडीच लाख कोटी डॉलरचे नुकसान भारताला झाले आहे. आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, गुंतवणूकदार, उद्योग, उद्यम भांडवलदार, बँक, इन्शुरन्स इ घटकांना आज चक्रीवादळ कोठे होऊ शकते आणि वादळामुळे नुकसान कमी कसे होईल, याचा विचार करावा लागेल. त्याकरीता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे.
इशारा देणाऱ्या यंत्रणांचा उपयोग :
या बाबतीत सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि लोकसंख्येचे प्रमाण हेही घटक विचारात घ्यावे लागतात. इशारा देणाऱ्या यंत्रणेतील सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापनातील सज्जता हानी कमी करू शकते. चक्रीवादळांचे व्यवस्थापन हे धोका आणि असुरक्षितता यांचे शास्त्रीय विश्लेषण, सज्जता, नियोजन, प्रतिबंध यासह अनेक घटकांवर अवलंबून असते. यासाठी ‘आयएमडी’ने चक्रीवादळांशी संबंधित धोक्यांचे निरीक्षण, संख्यात्मक मॉडेलिंग आणि अंदाज बांधणीत क्षमता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भारतीय हवामान विभागाकडे वादळांचा इत्थंभूत डेटा आहे. गरज आहे ती या ‘डेटा’चा उपयोग करून विभागनिहाय संभाव्य हानीची माहिती उपलब्ध करण्याची. एखादा उद्योग सुरु करण्यापूर्वी त्या जागेवर निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज उपयोगी ठरेल. यामुळे उद्योगधंदे नीट चालू राहतील आणि मालमत्तेची हानी टळेल.
विमा उपायांचे महत्त्व : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या विकासाव्यतिरिक्त काही अभ्यासांमध्ये भू-उपयोग नियोजन, किनारी जिल्ह्यांचा विकास आणि विमा उपायांचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल.
लाटांच्या नोंदी
‘आयएनडीआयएस’ ने समुद्र किनारपट्टीवरील चक्रीवादळामुळे तयार होणाऱ्या ७ ते १० मीटर लाटांच्या नोंदी केल्या आहेत. एकूण लाटेची उंची व त्याची व्याप्ती समजणे महत्वाचे आहे जेणे करून या भागात वसलेल्या मालमत्तेचे नुकसान टाळले जाईल. चक्रीवादळामुळे विशिष्ट स्थानावरील जोखीम ओळखण्यासाठी वाऱ्याचा वेग, फ्लॅश फ्लड डेटा आणि समुद्र लाटांची उंची व व्याप्ती इ डेटा चा एकत्रित भ्यास करणे आवश्यक आहे. यांनतर एकाच डिजिटल व्यासपीठावर सर्व डेटावर प्रक्रिया करून आजपर्यंत किती चक्रीवादळे विशिष्ट ठिकाणी येऊन गेली आणि पुढे साधारणतः दहा वर्षात किती चक्रीवादळे येतील, याचा अंदाज बंधणे आवश्यक आहे. याकरिता कार्टोग्राफिक, भूशास्त्रीय आणि जलविज्ञानविषयक माहितीचा व्यापक वापर करून डिजिटल व्यासपीठामार्फत अंदाज दर्शवता येईल. ''ट्रॉपस्याक'' सारख्या वेब बेस सॉफ्टवेअरमार्फत एखाद्या जागेवर चक्रीवादळ किती व त्याचे स्वरूप कसे असेल याचा अंदाज बांधता येतो, याकरिता १८९१पासूनच्या चक्रीवादळाची माहिती वापरून सॉफ्टवेअर बनविण्यात आले आहे. अशा सॉफ्टवेअरची गरज आहे.
किनारपट्टीमध्ये कोणत्या भागात नुकसान होऊ शकते हे आज विमा कंपन्यांना कळले तर विमा रक्कम निश्चित करण्यापूर्वी मालमत्तेच्या मूल्याचे विश्लेषण करण्यास ते सक्षम होऊ शकतील. आपत्तीत सर्वाधिक नुकसान झालेल्या ग्राहकांना आर्थिक मदतीसाठी विमा कंपनीला त्याचा उपयोग होईल. किनारपट्टी भागात पायाभूत स्वरुपाची बांधकामे उभारतानाही या सर्व अभ्यासाचा उपयोग करून घेऊन योग्य ती खबरदारी त्या टप्प्यावरच घ्यायला हवी.
१३० वर्षांत ८०८ चक्रीवादळे
१८९१ ते २०२० दरम्यान भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील चक्रीवादळांच्या वारंवारतेच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, जवळजवळ ८०८ चक्रीवादळे (ज्यापैकी १०३ गंभीर) पूर्व किनारपट्टीवर धडकली. याच कालावधीत ४८ चक्रीवादळे पश्चिम किनारपट्टीवरही धडकली असून, त्यातील २४ अतितीव्र होती.
(लेखक ‘युनिटी जीओस्पेशल’चे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.