संध्याकाळचा तांबूस प्रकाश नदीकाठच्या साऱ्या आसमंतावर पसरलेला. सुट्टीच्या दिवशी मी एकटाच इथल्या एका खडकावर बसतो. विचार येत रहातात ते सगळे उदासवाणे... मनाच्या डोहातून प्रश्नांच्या लाटांवर लाटा येत रहातात. नेहमी माझ्याच बाबतीत अपयश का? इतका शिकलो, इंजिनियर झालो. पण मनासारखी नोकरी नाही. जी आहे त्यात प्रगती नाही. सहकारी म्हणतात तुझ्यात प्रेझेन्टेशनची स्किल नाहीत. वरिष्ठ म्हणतात आत्मविश्वास नाही. सारखे दडपणाखाली असता. होय, खरंय ते. आहे माझ्यावर कसलं तरी दडपण लहानपणापासून. वासंती म्हणायची तुझं कुठे इम्प्रेशनच पडत नाही.
किती घाबरत राहतोस सगळ्या गोष्टींना, एवढा हुशार असून. ती माझी कॉलेजमधली एकमेव मैत्रीण. नातं त्यापुढे गेलं नाही. इच्छा असून तिला तसं सांगताच आलं नाही. भीती वाटायची, नाही म्हणाली तर? ही भीती. सतत वाटायचं आपल्यात काहीतरी कमी आहे. कॉलेजात कार्यक्रम असो किंवा पुढे नोकरीचा इंटरव्यू असो, नोकरी लागल्यानंतर मिटिंग असो, की सेल्स प्रमोशन असो. साधं साहेबांच्या केबिनमधून बोलावणं आलं तरी छातीत धडधडणं सुरु. मग महत्वाचं बोलायचंसुद्धा ऐनवेळी जमत नसे. मान्य आहे मी दिसायला नाही आहे चांगला. मित्र म्हणतात तशी पर्सन्यालिटी स्किल्स नाहीत माझ्याकडे. मग काय करू मी? या अस्वस्थतेतच ठरवलं कोणाची तरी मदत घ्यायची.
सरांकडे गेलो. त्याचं प्रसन्न, आश्वासक व्यक्तिमत्व आणि स्वरातला प्रेमळपणा भावला. म्हणाले,‘तुझ्या समस्येवर तोडगा आहे. सकारात्मक व्यक्तिमत्व तुला लाभू शकतं. त्यासाठी आपण दोघं प्रयत्न करू या. काही सेशन्स करू या. थेरपी सेशन्स आणि तुझे प्रयत्न ह्यातून हे घडू शकतं. तुझी आत्मप्रतिमा खूप दुबळी आहे. तुझ्या रंगाविषयी, उंचीविषयी तुला गंड आहे. शाळेत, महाविद्यालयात, मुलांच्या चिडवण्यामधून तो आणखी पक्का झाला आहे. सरांनी काही स्वस्थतेची सेशन्स दिली. काही मनाचे व्यायाम शिकवले. काही महत्त्वाचे कानमंत्र दिले. ते असेः
१. तू स्वत:ला प्रत्येक गोष्टीत कमी समजत आला आहेस. त्यातून तुझी आत्मप्रतिमा दुबळी होत गेली आहे. तू अपयशाला घाबरायला लागलायस. मग अपयश स्वीकारण्यापेक्षा परिस्थितीपासून पळून जाण्याचीच तुला सवय लागलीय. तुझ्या मनाचं निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालं आहे. ते पॉझिटिव्ह करणं महत्त्वाचं आहे.
२. ह्या जगात प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असते . तसाच तुही आहेस. प्रतिकूल परिस्थितून शिकून तू नोकरी मिळवली आहेस. तुझी बुद्धिमत्ता आणि कष्टाळू वृत्ती ही तुझी बलस्थानं आहेत. अशी सगळी बलस्थानं शोधून काढ.
३. ह्या जगात प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. वेगळी आहे. आपण सर्वं निसर्गनिर्मित आहोत. मग ती निर्मिती असुंदर कशी असू शकेल? रंग, उंची वगैरे परिमाणं मानवनिर्मित आहेत. त्यांच्याकडे फार लक्ष देण्यासारखं काही नाही. दिसण्यापेक्षा तुझं असणं म्हणजेच तुझी देहबोली, तुझं वागणं,तुझा वावर, आत्मविश्वास, बोलताना वापरली जाणारी सुसंस्कृत भाषा, चेहेऱ्यावरचं स्मित जास्त महत्वाचं आहे.
४. आपण जसे आहोत तसेच्या तसे स्वत:ला स्वीकारलं पाहिजे.
५. आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णयक्षमता, कुठल्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता इत्यादी व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टी विकसित करता येतात, यावर विश्वास ठेव.
६. माणसं आहेत तिथे मतभेद, संघर्ष, इर्षा, स्पर्धा, थोडंफार राजकारण असणारच.
त्यानं मी अस्वस्थ होणार नाही. कामाच्या ठिकाणी करायची स्वस्थतेची तंत्रे, स्वयंसूचना शिकून घेता येतात.
७. माझ्यासमोर असणारी लोकांची संख्या, त्यांची अधिकारपदामुळे असणारी श्रेणी ह्या गोष्टीचं दडपण माझ्यावर यायचं काहीच कारण नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ व महत्त्वाचा असतो. मीही माझ्या ठिकाणी महत्वाचा आहेच. माझ्या अंगी नम्रता असावी; पण नेभळटपणा नसावा. किंवा पळून जाण्याची वृत्ती नसावी. हे साधण्यासाठी, कल्पनाशक्तीद्वारे करायच्या तंत्रांचा सराव उपयुक्त आहे. कुठेही काम करताना माझं सगळ्यांशी सौहार्दाचं नातं असावं. त्यासाठी मी ताणरहित असायला हवं. आनंदी असायला हवं. म्हणजेच माझी आंतरिक ताकद विकसित होत जाणं (Inward Journey) आणि माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली होत जाणं, कौशल्य विकसित होत जाणं (Outward Journey ) ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सत्रे चालू होती. मीही ‘गृहपाठ’ प्रामाणिकपणे करत राहिलो.
हळू हळू माझ्यात सकारात्मक बदल झाले. प्रत्येक क्षण समरसून जगावासा वाटत होता. छान वाटत होतं. डोहाच्या तळाशी असलेली प्रश्नांची उत्तरं माझी मला मिळायला लागली होती. आता जेव्हा कातरवेळी नदीकिनारी बसतो, तेव्हा उदासी नसते. निरव, शांत अशी रात्र येणार असते, उद्याची प्रसन्न, आश्वासक पहाटकिरणं घेऊन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.