‘कोरोना’ संकटाच्या काळात माध्यमांनी जास्त जबाबदारीने वागण्याची गरज आहे. पण समाजमाध्यमांवर अर्धवट, चुकीच्या माहितीचा आणि अफवांचा पूर आलेला दिसतो. समाजमाध्यमाचे सर्व समाजाशी उत्तरदायित्व असते, याचे भान ठेवून वस्तुनिष्ठ माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे.
‘आमची जबाबदारी नाही’, असे निक्षून सांगणारी परदेशातून कार्यन्वित असलेली ‘फेसबुक’सारखी समाजमाध्यमे आता आपला पवित्रा बदलताना दिसताहेत. अफवा आणि खोट्या बातम्या यांना रोखण्यासाठी ‘फेसबुक’ने आपल्या संकेतस्थळावरून मार्च २०२०पर्यंत ९६ लाख एवढ्या मोठ्या संख्येने टिपण्या वगळल्या आहेत. ‘वंशद्वेषी मजकुराला, दहशतवादी विषारी पोस्ट्सना इथे थारा नाही,’ असा एल्गारच आता ‘फेसबुक’ने केलेला दिसतोय.
गेल्या तीन वर्षांत केलेली ही सर्वात मोठी गाळणी मानली जाते. ‘कोरोना’चे संकट घोंगावत असताना त्याविषयी दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल शंका उपस्थित करून त्याला चिन्हांकित करून त्यांनी ‘पोस्ट’धारकाला आणि वाचकालाही या निमित्ताने सावध केले आहे. अशा सुमारे पाच कोटी पोस्ट्स ‘फेसबुक’च्या रडारवर आल्या आहेत. अचूक आणि विश्वासार्ह मजकूर यावर टाकावा, अशी अपेक्षा यातून व्यक्त होते आणि ती स्वागतार्ह आहे. हे करण्यासाठी ‘फेसबुक’ने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करून असा मजकूर शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरले आहे. ‘मेसेंजर’, ‘व्हॉट्सॲप’ यावरील मजकुराबाबतही हेच धोरण अवलंबून याला आळा बसावा यासाठी ‘फेसबुक’ प्रयत्नशील आहे. ‘इंस्टाग्राम’ या संकेतस्थळावरही अशी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आपण एका जागतिक व्यासपीठाचे प्रतिनिधी आहोत हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. हा ‘कोविड-१९ ’मुळे झालेला सकारात्मक बदल म्हणता येईल.
चुकीचा मजकूर, प्रक्षोभक मजकूर यांचे गांभीर्य त्यांना लक्षात येऊ लागल्यामुळे समाजमाध्यमांच्या भिंतीवर पडणाऱ्या या अभद्र पिचकाऱ्या पुसल्या जाणे गरजेचेच होते. समाजमाध्यमाचे सर्व समाजाशी उत्तरदायित्व असते. त्याला जातीपाती, प्रदेश, देश या भिंती नसतात, हा साक्षात्कार होण्यासाठी एवढी मोठी जागतिक समस्या समोर उभी राहावी लागावी, याचा मात्र विषाद वाटल्यावाचून राहात नाही. माहिती खातरजमा न करता दिली, तर त्यातून गोंधळ वाढतो, माणसे हवालदिल होतात, मिळालेली माहिती खरी की अर्धवट खरी की खोटी याचा शहानिशा करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यामुळे अशा साथीच्या रोगात त्यांचे मानसिक आरोग्यही धोक्यात येते. चीनने ‘विषाणू युद्ध’ करण्यासाठी हा ‘कोरोना’ शोधून काढला आहे या अफवेपासून ते गोमूत्र प्याल्याने ‘कोरोना’ होत नाही, या अंधश्रद्धेपर्यंत अनेक वावड्या समाजमाध्यमात भिरभिरताना दिसतात. अशा अफवांमुळे जागतिक स्तरावर शास्त्रज्ञांच्या एकत्रितपणे काम करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते. आयुर्वेद, होमिओपॅथी अशा उपचारपद्धती मान्यताप्राप्त असल्या, तरी बऱ्याच वेळा समाजमाध्यमातून काही औषधोपचारांसंबंधी अवास्तव दावे केले जातात. याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत, या विश्वासापोटी अशा औषधांच्या वापराला धरबंध राहत नाही, असे चित्र दिसते.
घाबरलेली मने आणि भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याबद्दल साशंक झालेला समाज या मजकुरातील तथ्य तपासून न पाहता त्याच्या मागे लागतो. यातून काही फायदा झाला नाही, की रोगाविषयीचे गैरसमजच वाढीला लागण्याची शक्यता असते. विघातक पोस्ट टाकायच्या असा यात हेतू नसतो, पण अर्धवट माहिती अधिक घातक ठरते. म्हणून या काळातील विधाने, त्याची मांडणी ही मूळ आशयापासून दूर गेलेली असता कामा नये. घटनेचे विश्लेषण करताना त्यातील गाभा घटकाला धक्का लागला, तर बातमीचे रुपांतर अफवेत व्हायला वेळ लागत नाही. समाजमाध्यमातील अनेक महाभाग आपल्या मगदुराप्रमाणे घटनेचा अर्थ लावून त्यात ते आपले ‘चिंतन’ मिसळत असतात. ते अफवेपेक्षा अधिक भयानक ठरू शकते.
संशोधनाचे पाठबळ असलेल्या, वैज्ञानिक निष्कर्षांवर आधारित मजकुराला अशा वातावरणात दुय्यम स्थान मिळते. ही परिस्थिती बदलायला हवी. आणखी एक गोष्ट माहितीच्या देवाणघेवाणात गांभीर्याने पाळली पाहिजे ती म्हणजे माहितीतील संदिग्धता कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि किचकट, क्लिष्ट वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. आकडे माणसांना घाबरवतात, म्हणून रुग्णांची एकूण संख्या सांगताना बरे होऊन गेलेले रुग्ण त्यातून गाळले गेले आहेत काय हे पाहिले गेले पाहिजे. एखाद्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त का आहे, याचेही वस्तुनिष्ठ विश्लेषण जनतेसमोर ठेवले, तर अवास्तव चित्र निर्माण होणार नाही. चाचण्या अधिक म्हणजे रुग्ण सापडण्याची शक्यता जास्त याविषयीचे प्रबोधन समाजमाध्यमात फारसे होताना दिसत नाही. ‘कोरोना’ म्हणजे मृत्यू अशी भावना जनतेच्या मनात निर्माण करण्यात समाजमाध्यमांवरील फाजील माहितीचा वाटा मोठा आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे रोज अधिकृत माहिती जाहीर केली जाते. त्यातील तज्ज्ञ उत्तम माहिती देतात. समाजमाध्यमांनी या लिंक्स प्राधान्याने दाखवल्या, तर संदेहाचे वातावरण निवळायला मदत होईल. या काळात वृत्तपत्रांची भूमिका अतिशय समंजस आणि जबाबदारीचे भान दर्शवणारी आहे. मध्यंतरी छापील वृत्तपत्रे मिळत नव्हती तेव्हा विश्वासार्ह माहितीची चणचण अनेकांना तीव्रतेने जाणवली. या काळात घरी अडकलेल्या वाचकांसाठी दिले जाणारे नवे नवे उपक्रम वातावरणातील नैराश्य कमी करत आहेत. वृत्तपत्रांचे हे योगदान अशा आपत्तीच्या काळात त्यांच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तबच करते.
समाजमाध्यमे आणि मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्या यांना आपण वेगवेगळा न्याय देऊ शकत नाही. कारण दोन्ही घटकांनी सत्य माहिती समोर आणणे अपेक्षित आहे. वृत्तवाहिन्यांची तर यात अधिक जबाबदारी आहे. वाहिन्या मात्र याचे गांभीर्य अजूनही लक्षात घेताना दिसत नाहीत. एका वाहिनीने दोन रेल्वे अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पत्रव्यवहाराचा हवाला देत, शहानिशा न करता ‘परराज्यांतील मजुरांसाठी रेल्वे सुरू होणार’, अशी बातमी देऊन ‘बातमी’ या संकल्पनेलाच खाली मान घालायला लावली. यावर कडी म्हणजे या बातमीनंतर १७ दिवसांनी खरेच काही गाड्या सुरू झाल्या, तेव्हा आमची बातमी खरी ठरली की नाही, अशी हास्यास्पद बातमी चालवून आपली पाठ आपणच थोपटली. यावर बराच गदारोळ झाल्यानंतरही वाहिन्यांच्या चुकांचा सिलसिला थांबायला तयार नाही. दहा मे रोजी पुण्याच्या बाबतीत एक ब्रेकिंग बातमी वाहिन्यांवर झळकत होती. ‘पुण्यातील सर्व दुकाने सात दिवस बंद’.
प्रतिबंधित क्षेत्रातील हा शब्द त्यात न वापरल्यामुळे लाखो पुणेकरांच्या मनात भीतीची लाट पसरवण्यात या बातमीचा मोठा वाटा होता. पुन्हा हे लक्षात आल्यावर याचे दिलगिरीच्या भाषेत स्पष्टीकरण केले असते, तरी हा भयगंड निवळला असता. पण चुकीच्या बातमीबद्दल माफी मागणे, दिलगिरी व्यक्त करणे या संस्कृतीपासून ही माध्यमे कोसो दूर गेली आहेत.
अवाजवी भीती ही समाजमाध्यमे व वृत्तवाहिन्या यांनी पेरलेली एक भयंकर गोष्ट आहे. ‘कोरोना’ची बाधा झाली की आपण संपलोच, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण करण्यात यांचा मोठा वाटा आहे. ज्या पद्धतीने ते देशभरातील ‘कोरोना’च्या बातम्यांची मांडणी करतात, त्यातील कथानक, उपकथानक फुलवतात त्यावरून हे काहीतरी भयंकर आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली जाते आणि मग एखादा रुग्ण आपल्या चाचणीचा अहवाल येण्याच्या आतच भीतीने आत्महत्या करतो आणि दुसऱ्या दिवशी कळते की त्याला ‘कोरोना’ नाही. अशा अनेक घटना आपण पाहतो, तेव्हा ‘कोरोना’पेक्षा समाजमाध्यमे आणि मुख्य प्रवाहातील वाहिन्या यांचा प्रादुर्भाव अधिक गंभीर वाटतो आणि यांना चाप बसावा अशी व्यवस्था अजून तरी आपण निर्माण केलेली नाही, हे ‘कोरोना’पेक्षाही गंभीर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.