‘कोविड-१९’ने अनेक समस्या पुढ्यात आणून ठेवल्या आहेत हे खरेच; परंतु या संकटातही काही संधी आहेत. धोरणात्मक अग्रक्रमांविषयी जो धडा आपल्याला मिळाला आहे, त्याचा उपयोग भावी काळात नक्कीच होईल.
‘Every problem is an opportunity in disguise` प्रत्येक समस्येत संधी लपलेली असते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन अडॅम्स यांचे हे विधान.
‘कोविड-१९’चे संकट त्याला अपवाद आहे असे मानण्याचे कारण नाही. तीस जानेवारी २०२०ला जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोविड-१९’ ला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले. धर्म, पंथ, जात, लिंग, वय, देश, प्रादेशिकता असे विषमता दर्शविणारे सर्व घटक बाजूला सारून, कोरोना विषाणूने संपूर्ण जगातल्या मानवजातीला आपल्या मगरमिठीत जखडून टाकले. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना या क्षणी सनातनी अर्थतज्ज्ञ माल्थस यांनी मांडलेल्या मानवाने योग्य ते उपाय योजले नाही, तर निसर्गच आपले प्रतिबंधात्मक उपाय वापरून लोकसंख्येचे नियंत्रण करेल, या प्रसिद्ध सिद्धान्ताचीही नक्कीच आठवण झाली असणार.
भारताच्या संदर्भात विचार केला तर सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत आजवर झालेली हेळसांड आणि दुर्लक्ष ,आरोग्यविषयक सरकारी गुंतवणुकीचा अभाव, अपुऱ्या वैद्यकीय सोयी-सुविधा, असंघटित कामगारांचे स्थलांतर, त्यांच्या रोजगाराच्या समस्या व धोरणात्मक उपाययोजनांचा अभाव असे अनेक प्रश्न आपल्यासमोर ठळकपणे आले. यापुढे प्रयत्न करताना कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायला हवे आहे हे कळले. सध्याच्या संकटातून वाट शोधताना आपल्या देशातील असंख्य डॉक्टर, परिचारिका, पोलिस, सफाई कामगार यांच्या कर्तव्यनिष्ठा उजळून निघाल्या. सामाजिक संघटना, सर्वसामान्य व्यक्ती, उद्योगपती, कलाकार यांची सामाजिक बांधीलकी आपल्यापुढे आली. पाश्चात्य देशांत संचारबंदीच्या काळात घराच्या उंबरठ्याआड घडणारी हिंसा, घटस्फोट यांचे प्रमाण वाढले; भारतात तेवढ्या प्रमाणात तसे घडले नाही. त्यातून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्वच अधोरेखित झाले.
‘कोविड-१९’च्या अचानक लागलेल्या या ‘ब्रेक’मुळे आपली सामाजिक वीण व तिची दृढता हीदेखील जाणवली. पैसा, उत्पन्न, मालमत्तेचा संग्रह, त्यातून येणारी सधनता अशा भौतिक सुखसाधनांपेक्षा नात्यांचे बंध व त्यातील माणुसकीची वेगवेगळी रूपे समजली. उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या ( कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) पलीकडे जाणारे रतन टाटा यांच्यासारखे उद्योगपती आणि त्यांच्या देश व समाजाप्रतीच्या निष्ठांचे दर्शन झाले. ‘कोविड-१९’चा मुकाबला करताना उपयोगी पडणारे हायड्रोक्सोक्लोरोक्विन हे औषध व ‘बीसीजी’ची लस अमेरिकेसह श्रीलंका, इस्राईल, नेपाळ, भूतान अशा जवळपास ५० देशांना मदत वा निर्यात करणारा एक सहिष्णू देश म्हणून भारताचे स्थान आंतराष्ट्रीय समुदायापुढे अभिमानाने आले. अनेक शहरांत आपल्या रोजच्या सवयीची सर्वच प्रकारची प्रदूषणे या काळात कमी होऊन निसर्गातील जैव-विविधतेच्या वेगवेगळ्या छटा स्पष्ट दिसू लागल्या व त्यामुळे निसर्गचक्रातील मानवाचे स्थानदेखील नव्याने कळले.
जागतिक व्यापाराच्या संधी
काही अर्थतज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात जगभर आणि विशेषतः भारतात आर्थिक घडी कमालीची विस्कटलेली असेल आणि हे आर्थिक अरिष्ट कदाचित २००८ च्या जागतिक मंदीपेक्षाही भयंकर असेल; पण अशाच प्रतिकूल परिस्थितीत अनेक प्रकारच्या जागतिक व्यापाराच्या संधी आपल्याला उपलब्ध होतील. या निमित्ताने नव-उदारमतवादी भांडवलशाहीतल्या चंगळवादाचे दाहक वास्तवही आपल्या समोर आले आहे.
खरेच ‘जीवनावश्यक‘ काय आहे याची जाणीव आणि या जीवनावश्यकतेचे नेमके भान आपल्याला आले. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी म्हटल्याप्रमाणे आज आपल्या नागरिकांचे जीव वाचविणे ही आपली प्राथमिकता आहे आणि त्यासाठी प्रसंगी नोटा छापायलासुद्धा हरकत नाही, आत्ता चलनवाढीचासुद्धा विचार करू नये आणि रिझर्व्ह बॅंकेने असे जाहीर केले आहे की २७ मार्चपासून १.२० लाख कोटी रुपयांचे ताजे चलन अर्थव्यवस्थेत ओतले आहे. याशिवाय या संकटातले काही सकारात्मक मुद्दे असे आहेत.
१) जागतिक पातळीवर देशांचे व्यापारी सबंध व भागीदार बदलतील आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा आपल्याला करून घेता येईल. जागतिकीकरणाकडून अ-जागतिकीकरणाच्या दिशेने सुद्धा धोरणे आखली जातील. आजवर जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण देशांच्या सीमापार व्यापार करत होतो; पण आज प्रत्येक देशाला त्याच्या सीमाच बंद कराव्या लागल्यात. त्यामुळेच आता देशाच्या स्वयंपूर्णतेला जास्त महत्त्व येईल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच भारताने त्याच्या शेजारी देशांमधून येणाऱ्या परकी गुंतवणुकीवर घातलेले सरकारी निर्बंध. म्हणूनच येणाऱ्या काळात स्वदेशी आणि ‘मेक इन इंडिया‘ सारख्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारतीय उद्योगधंदे देशाच्या आर्थिक प्रगतीत अधिक समर्थपणे आपली भूमिका बजावतील. उदा. पुढील काळात भारताने योग्य पद्धतीने संशोधन विकासात गुंतवणुक केल्यास औषध उत्पादनाच्या निर्यातीच्या क्षेत्रात तो नक्कीच वेगळे स्थान निर्माण करेल. चीनमधून गाशा गुंडाळणाऱ्या कंपन्या भारताचा विचार करू शकतील.
शेतीचे महत्त्व अधोरेखित
२) भारताच्या सर्वांगीण विकासात आजवर दुर्लक्ष झालेल्या शेती क्षेत्राचे मोलाचे स्थान या ‘कोविड-१९’ने अधोरेखित केले आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला भरपूर अनुदाने, सरकारी व खासगी भांडवली गुंतवणूक, कर्ज व वित्तपुरवठा याबाबत भरीव कामगिरी अपेक्षित आहे. याबरोबरच ग्रामीण भागात अन्नप्रक्रिया उद्योग आणि त्यातून आवश्यक ती रोजगारनिर्मिती करण्याच्या दृष्टीने खूप धोरणात्मक बदल होतील. रोजंदारीवर काम करणाऱ्या असंख्य असंघटित कामगारांचे दाहक वास्तव आपल्यासमोर आले आहे. त्यामुळे केवळ स्मार्ट शहरांचे नियोजन करून चालणार नाही, तर त्याचबरोबर स्थानिक रोजगार निर्माण करू शकतील व स्थलांतर रोखू शकतील अशा स्मार्ट खेड्यांचीही धोरणे आखली जातील.
३) आपली जीवनपद्धती, उत्पादन, उपभोग, श्रमशक्ती, यंत्रे, तंत्रज्ञान याबद्दलच्या भूमिकाही खूप सकारात्मक पद्धतीने बदलतील. विषमता कमीकरण्याच्या दृष्टीने काही स्वागतार्ह बदल आपल्या आर्थिक व सामाजिक धोरणात होतील. सार्वत्रिक किमान उत्पन्न (Universal Basic Income) योजनेचाही पुनर्विचार होऊ शकेल. ग्रामीण नागरिकांचे आरोग्य विमा कवच जास्त बळकट केले जाईल आणि एकूणच सार्वजनिक आरोग्य धोरणांची दिशा बदलेल. आज आपल्या देशात सार्वजनिक वितरण व्यवस्था, ‘मनरेगा’, ‘जन-धन’ अशा वेगवेगळ्या लाभार्थीसाठी अनेक योजना सुरू आहेत; पण पुढील काळात सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा धोरणाच्या दिशेने आपली वाटचाल होईल.
४) प्रदूषण, हवामानबदल, कार्बन उत्सर्जन आदींबाबतची धोरणे व उपाययोजना यात भारतात व वैश्विक पातळीवरही सकारात्मक बदल होतील
५) आज ज्या प्रकारे केंद्र व राज्य सरकारे, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात समन्वय दिसतो आहे तो बघता पुढील काळात केंद्र-राज्य संबंधातील तेढ कमी होऊन त्यांच्यातील पूरकत्व वाढेल आणि राजकोषीय व मौद्रिक धोरणातील सुसूत्रताही वाढेल. राजकोषीय धोरणात कदाचित वेगळे कर/ अधिभार आणि वेगळ्या सवलती/ प्रोत्साहने दिली जातील. आपल्या १३० कोटींपेक्षाही जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात प्रखर राजकीय इच्छाशक्तीने खूप खंबीर निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या काळात दूरदर्शीपणाने आखलेली धोरणेच आपल्याला सकारात्मक विकासाकडे नेतील. अर्ध्या रिकाम्या पेल्याचे वास्तव अर्धा भरलेला, असेही समजून घेता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.