भाष्य : प्रलयातही उभे वनराजीचे खंदे वीर

भूस्खलनाला न जुमानणारा नागचाफ्याचा वीरवृक्ष. (श्री शिवन्‌ व श्री विष्णुदास यांच्या सौजन्याने.)
भूस्खलनाला न जुमानणारा नागचाफ्याचा वीरवृक्ष. (श्री शिवन्‌ व श्री विष्णुदास यांच्या सौजन्याने.)
Updated on

भूमातेची दोन नावे आहेत; सर्वसहा आणि क्षमा. पण मानव स्वार्थापोटी ज्या कठोरतेने पाणी-माती-जीवसृष्टीचे परिसरचक्र उद्‌ध्वस्त करत आहे, ते असह्य झालेली पृथ्वी आता दया-क्षमा विसरून त्याला अद्दल घडवू लागली आहे की काय, असे वाटते. महाराष्ट्रातील महापूर आणि केरळमधील भूस्खलनाच्या घटना या त्याचेच निदर्शक आहेत.

यंदाच्या २० जुलैला सूर्याने गाढवावर बसून पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आणि वरुणराजाने तिसरा डोळा उघडला. देशभर जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. महाराष्ट्रात कृष्णा खोऱ्यात महापूर लोटले आणि उत्तर केरळात जागोजाग दरडी ढासळल्या. केरळातल्या भूस्खलनांमुळे गावेच्या गावे चिखल-दगडगोटे-तुटलेल्या झाडांखाली सहा-सहा मीटर खोल गाडली गेली. पण या हाहाकारातही एक अचंबित करणारे दृश्‍य पाहायला मिळाले. डोंगरउतारांवरून जोरात वाहत चाललेल्या या प्रलयाच्या माऱ्याला खंबीरपणे तोंड देऊन, काही मोजके वृक्षवीर आपली पाळेमुळे जमिनीत घट्ट रोवून ठामपणे उभे ठाकले होते. त्यांच्या आसपासचे लेचेपेचे सवंगडी गारद होऊन वाहत गेले होते. हे आपल्या धरणीमातेशी, आपल्या मातीशी इतके बळकट नाते जपणारे तरुश्रेष्ठ होते तरी कोण? हे होते नागचाफा, रुद्राक्षासारखे दक्षिण सह्याद्रीच्या टापूतील पूर्णप्रगत वनस्पतिराजीचे द्योतक.  

बाकीच्या लेच्यापेच्या वनस्पती जाती होत्या तरी कोणत्या? त्या बहुतांश वनस्पतिराजीच्या कमी प्रगत अवस्थांतील अथवा जिकडे तिकडे बेतालपणे घुसवलेल्या युकॅलिप्टससारख्या परक्‍या जाती-प्रजाती होत्या. नैसर्गिक पूर्णप्रगत अवस्थांमध्ये मानवाने ढवळाढवळ सुरू केली, झाडे तोडली, वणवे लावले, बेसुमार गुरेचराई केली, माती उघडी टाकत धुपून जाऊ दिली की तिथे वेगळ्या धर्तीच्या, काही आपल्याकडच्या टाकळ्यासारख्या स्थानिक अथवा गाजर गवतासारख्या परकी वनस्पती फोफावतात. गडचिरोली जिल्ह्यात आईन, धावडा, सागवान भरपूर प्रमाणात असलेले नैसर्गिक वनावरण खूपसे टिकून आहे. तेथेही वनविभागाने पैशासाठी, लोकांनी जळाऊ लाकडासाठी, शेतांच्या कुंपणांसाठी तोड केली, तर अरण्य विरळ होते आणि तिथल्याच स्थानिक पळसासारख्या विशिष्ट जाती खूप पसरतात. पण वसंतात लाल रंगाची आकर्षक उधळण करणारे हे पळस पूर्णप्रगत अवस्थेत वाढणाऱ्या धावडा-आईनसारख्या जातींप्रमाणे माती घट्ट धरून ठेवत नाहीत.

वैविध्यसंपन्न पूर्णप्रगत वनराजीत वेगवेगळ्या उंचीचे वृक्ष, निरनिराळ्या जातीचे बांबू, भल्यामोठ्या वेली, झुडपे आणि सावलीतही वाढणाऱ्या शाक वनस्पती, गवत असे थरावर थर असतात. शिवाय जमिनीवर चिक्‍कार पालापाचोळा असतो. त्यामुळे जमिनीवर पावसाचा थेट मारा होत नाही, पाणी हळूहळू ठिबकते, मातीची धूप अल्प प्रमाणात होते. माती हे अखेर जीवसृष्टीचे उत्पादन आहे. नैसर्गिक वनराजी ही माती जोपासत राहते.

तिच्यात पाणी हळूहळू मुरते, झऱ्यांतून सावकाश झुळुझुळु वाहते, भूजलात समाविष्ट होते. नैसर्गिक प्रगत अवस्थांतील विकसित वनराजी पाणी आणि मातीचे चक्र असे प्रेमाने सांभाळते. हे चक्रच मानवी जीवनाचा आधार आहे. 
शांता शेळके एका कवितेत या परिसरचक्राचे सुंदर वर्णन करतात : मातीचे झाड; झाडाची मी; माझी पुन्हा माती; याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती! या तळहातावरच्या रेषा विसरून पैसे फुगवण्याच्या लोभातून आपण वनराजीची आणि त्याबरोबरच जल-मृद्‌ चक्राची वाताहत केली आहे.

याचे एक ठळक उदाहरण आहे सह्याद्रीवरच्या सदाहरित वनराजीची आणि ती तोडून तेथे वाढवलेल्या युकॅलिप्टसची व्यथाकथा. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पंचवीस वर्षांत कोणतीही किंमत देऊन विकास करायलाच पाहिजे, या प्रवृत्तीला कोणीही आव्हान दिले नव्हते. या विकासात आपली गुरू होती आणि दुर्दैवाने आजही मोठ्या प्रमाणात आहे ती जागतिक बॅंक. १९६०च्या दशकात या बॅंकेने वनविकास कसा करावा या विषयावर एक अहवाल सादर केला. त्यात म्हटले होते की भारताची नैसर्गिक वनराजी अनुत्पादक आहे, ती तोडून तिच्या जागी मोठ्या प्रमाणात युकॅलिप्टससारख्या परक्‍या वनस्पती जातींची लागवड केली पाहिजे. त्यांच्या हिशेबाप्रमाणे सह्याद्रीवरच्या सदाहरित अरण्याची उत्पादकता दर वर्षी दर हेक्‍टरला अवघा दीड टन होती.

तिच्या जागी युकॅलिप्टसची लागवड केली, तर ती उत्पादकता तीस टनांपर्यंत वाढेल. झाले, जिकडेतिकडे वन विभागाने नैसर्गिक अरण्य सफाचट करून युकॅलिप्टस धडाधड लावले. त्याआधी खरोखरच या भरपूर पावसाच्या परिस्थितीला युकॅलिप्टस अनुरूप आहे की नाही, त्याची किती वाढ होईल याचा काहीही अभ्यास केला गेला नव्हता. साधारण असा अनुभव आहे की अशा परकी जाती आपल्याकडे लावल्या, की त्यांच्या मूळच्या देशातील कीटक, बुरशी इत्यादी शत्रू त्या मागे सोडून आलेल्या असतात. त्यामुळे ज्या देशात त्यांचे नव्याने आक्रमण सुरू होते, त्या देशात त्यांची कुठेही भरपूर वाढ होते. आपल्याकडे अनेक ठिकाणी शेतजमिनीवर आक्रमण करू लागलेली सुबाभूळ हे याचेच उदाहरण आहे. पण असा अनुभव आला, की भरपूर पावसाच्या मुलखात युकॅलिप्टसवर ‘पिंक डिसीज’ नावाचा बुरशीचा रोग पडू लागला आणि त्या रोपवनांची वाढ अजिबात खुंटली. मी १९७०च्या दशकात बंगळूरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये काम करायला लागल्यावर ही दुर्दशा पाहिली. जसा युकॅलिप्टसच्या लागवडीआधी काहीही केला नव्हता, तसाच आता काय होत आहे याचा काहीही अभ्यास वन विभाग करत नव्हता. पण मी तसा केला. त्यातून स्पष्ट दिसून आले की सगळीकडे ‘पिंक डिसिज’ग्रस्त झालेल्या युकॅलिप्टसचे दर वर्षी दर हेक्‍टर उत्पादन केवळ दोन ते तीन टन होते. या अत्यल्प वाढीव उत्पादनाच्या हावेपोटी भरपूर पाऊस पडणाऱ्या आणि जिकडेतिकडे उभे चढ असलेल्या व त्यामुळे माती सहज धुपून जाण्याची, दरडी ढासळण्याची आणि पुराचे धोके वाढण्याची भीती असलेल्या सह्याद्रीच्या मुलखाची धूळधाण केली गेली होती. 

या निसर्गसंपत्तीच्या नासाडीची किंमत कुणी कधीच मोजत नव्हते. २०१० मध्ये आमच्या पश्‍चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाने ही किंमत मोजायला पाहिजे हे लक्षात आणून देऊन डोंगरमाथ्याजवळच्या भरपूर पावसाच्या, तीव्र चढांच्या काही भागात अजून शिल्लक असलेली नैसर्गिक वनराजी पूर्णपणे शाबूत ठेवावी अशी शिफारस केली. यंदा केरळात प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी करणारी भूस्खलने ही नेमकी जेथे नैसर्गिक वनराजीचा आणि त्याबरोबरच पाण्याचा, मातीचा विध्वंस करू नका असे आम्ही सुचवले होते, परंतु ही सूचना झिडकारून केला गेला, तेथेच मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या वर्षीसुद्धा केरळावर महापुराची आपत्ती ओढवली होती. यंदा असेच संकट पुन्हा लोटल्यावर केरळातील सर्वसामान्य लोकच नव्हे, तर अनेक राजकीय नेतेही आमच्या शिफारशी नाकारल्या ही चूक झाली, त्यांचा पुनर्विचार केलाच पाहिजे असे बोलू लागले आहेत. आपल्याकडे मात्र आरे वसाहतीतील मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रातल्या नैसर्गिक वनराजीतली २००० झाडे तोडली तर काय बिघडले, दुसरीकडे कुठली तरी दसपट झाडे - जरी ती मृद्‌ जलसंधारणाला कुचकामी असली तरी लावून भरपाई करू असे असमर्थनीय दावे केले जाताहेत. देव जाणे महाराष्ट्रातल्या जनतेने आणखी किती नैसर्गिक आपत्ती सोसल्यानंतर आपले नेते काहीतरी वेगळे विचार करायला तयार होतील!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.