भाष्य : शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे

डॉ. सलिम अली यांच्याबरोबर (१९७७ मध्ये ) बंडीपूर अभयारण्यात.
डॉ. सलिम अली यांच्याबरोबर (१९७७ मध्ये ) बंडीपूर अभयारण्यात.
Updated on

मी जन्मलो त्या १९४२ मध्ये महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘भारत छोडो’ म्हणून ठणकावले आणि त्याच वर्षी सलिम अलींचे सचित्र ‘बुक ऑफ इंडियन बर्डस’ प्रकाशित झाले. बाबांना पक्षिनिरीक्षणाची आवड होती; त्यांच्या विपुल ग्रंथसंग्रहातल्या पक्ष्यांवरच्या अनेक पुस्तकांमध्ये सलिम अलींच्या पुस्तकाची भर पडली. आम्ही त्या वेळी पुण्याबाहेर असलेल्या एरंडवण्यात राहत होतो. घराभोवती आंब्याची, जांभळाची, फणसाची, कडुलिंबाची झाडे होती. मागे पेरूची बाग होती. घराशेजारच्या खडकवासल्याच्या डाव्या कालव्यात झुळूझुळू पाणी वाहायचे. जवळच वेताळ टेकडी होती. अजून रासायनिक कीटकनाशके माहीत नव्हती आणि सगळ्या आसमंतात विविध जातींचे चिक्कार पक्षी किलबिलत असायचे. मलाही लहानपणापासून पक्षिनिरीक्षणाचा छंद जडला. मला खास आवडायचे वेडे राघू. हिरव्याचार पाचूच्या रंगाचा हा देखणा पक्षी हवेत सुंदर भराऱ्या घेत किडे पकडतो.

विजेच्या तारांवर त्यांचे थवेच्या थवे असायचे आणि मी त्यांना खुशीत न्याहाळत राहायचो. एकदा लक्षात आले की, अनेक वेड्या राघूंच्या शेपटीच्या टोकाला मध्येच जे लांबट पीस असते, ते दिसेनासे झाले होते. ही वेगळीच जात आहे काय? बाबांनाही ठाऊक नव्हते. अनेक पुस्तके धुंडाळली तरी उत्तर सापडेना. मग बाबा म्हणाले, ‘‘अरे, लिही की सलिम अलींना आणि विचार हा काय प्रकार आहे?’’ मी पत्र लिहिल्याच्या चार दिवसांतच सलिम अलींचे स्वहस्ते लिहिलेले उत्तर आले : काही ऋतूंत पक्ष्यांची जुनी पिसे झडतात आणि नवी उगवतात; अशा वेळी थोडे आठवडे वेड्या राघूच्या शेपटीच्या टोकाचे लांबट पीस अजून वाढलेले नसते, नंतर ते पुन्हा वाढते; आणि खरेच ते भुंड्या शेपटीचे वेडे राघू काही आठवडेच दिसत होते, नंतर दिसेनासे झाले. सलिम अलींनी पटकन खुलासा केला म्हणून बेहद्द खूष झालो. 

मला मराठी साहित्याची खूप आवड होती. आमचे शेजारी रसायनशास्त्रज्ञ दिनकरराव कर्वे सांगायचे, की नुसता काय वाचतोस, ‘सृष्टिज्ञान’मध्ये एखादा लेख लिही. मग मी वयाच्या १४ व्या वर्षी पुण्यात न आढळणाऱ्या; पण महाबळेश्वरला पाहिलेल्या पक्ष्यांवर ‘सृष्टिज्ञाना’त लेख लिहिला. तो लिहिण्यासाठी निरीक्षण करताना आणि मग लिहायला खूपच मजा आली. तेव्हा नववीत शिकत होतो, ठरवून टाकले, की आपणही सलिम अलींसारखे जीवशास्त्रज्ञ बनायचे. जन्मभर मोकळ्यावर हिंडत पशु-पक्षी-प्राण्यांचा अभ्यास करत आयुष्य घालवायचे. पुढची एकतीस वर्षे सलिम अलींना सातत्याने भेटत राहिलो. त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे आकर्षक होते, विनोदबुद्धी अफाट होती.

‘वन पार्ट मिल्क अँड थ्री पार्टस पानी, इज नोन ॲज दूध इन हिंदुस्थानी’ अशा अनेक चारोळ्या सुनवत राहायचे. चाकोरीतली नोकरी त्यांना शक्‍य नव्हती. पण त्यांच्या सुदैवाने सधन कुटुंबात जन्मले होते, विविध जातींचे पक्षी परागीकरण कसे करतात, त्यांपैकी फुलचुख्यांसारख्या पक्षिजातींच्या फलाहारामुळे आमरायांत बांडगुळे कशी फैलावतात याच्या नावीन्यपूर्ण अभ्यासापासून सुरुवात करून देशभरच्या पक्ष्यांचे नानाविध अभ्यास करत, त्या आधारे लेख, पुस्तके लिहीत त्यांनी आयुष्य घालवले. गालिबने एका शेरात वर्णन केल्याप्रमाणे त्यांची वृत्ती होती: नश्‍शा-ए-रंग से है वाशुद-ए-गुल, मस्त कब बंद-ए-क़बा बाँधते हैं? फुले स्वतःच्या रंगांच्या नशेत धुंद असतात, प्रतिभावंत अशाच मस्तीत असतात, ते कधीच आपल्या बाराबंदीचे बंद आवळून घेत नाहीत; कसलीच बंधने स्वीकारत नाहीत. मीही आपल्याकडून जन्मभर असेच वागण्याचा प्रयत्न करत आलो.

एकदाच, १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाल्याबरोबर मला घट्ट आवळण्याचा प्रयत्न केला गेला. आदल्याच वर्षी मी बंडीपूर-नागरहोळे या म्हैसूर पठारावरच्या अभयारण्यांत निसर्गनिरीक्षणानिमित्त सत्तर किलोमीटरची पायपीट केली होती. एका भागात खूप रमणीय आणि वैविध्यसंपन्न अशी मूळची वनराजी सफाचट करून सागवान लावला होता. परिसरशास्त्राचा नियमच आहे की एकसुरी समूहात मोठ्या प्रमाणात किडी-रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्याप्रमाणे सलिम अलींच्या अभ्यासातल्या एकसुरी आमरायांप्रमाणेच या सागवानावर चिक्कार बांडगुळे फैलावून त्यांची वाढ पार खुंटली होती. मी ‘डेक्कन हेरल्ड’ या बंगळूरच्या वर्तमानपत्रात माझ्या भटकंतीच्या वर्णनाचे तीन लेख लिहिले, त्यातल्या एकात वन विभागाने अभयारण्यातील एका अरण्याचा असा हकनाक विध्वंस केल्याचे वर्णन केले. साहजिकच वन विभागाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. पण हे वास्तव असल्याने मूग गिळून राहिले होते. आणीबाणी जाहीर होताक्षणी त्यांना वाटले की चला, आता चांगली संधी आहे, माधव गाडगीळच्या मुसक्‍या आवळू. तातडीने मला पत्र पाठवले, की या पुढे कोणतेही लेख प्रसिद्ध करण्याआधी ते आम्हाला दाखवले पाहिजेत आणि आमची संमती मिळाल्यावरच प्रकाशनासाठी पाठवता येतील.

माझ्या सुदैवाने आमच्या संस्थेचे संचालक सतीश धवन मोठे उमदे तत्त्वनिष्ठ शास्त्रज्ञ होते. त्यांच्याच नेतृत्वामुळे आजही अवकाश विभाग इतकी उत्तम कर्तबगारी करून दाखवत आहे. त्यांना मी ते पत्र दाखवले. त्यांनी विचारले की यामागे काय असावे? मी त्यांना ते लेख दाखवले. काळजीपूर्वक वाचून दुसऱ्या दिवशी बोलावून विचारले की जे लिहिले आहेस त्यातील सर्व विधानांसाठी तू घट्ट पुरावा दाखवू शकतोस ना? मी म्हटले, ‘अर्थात.’ मग ते म्हणाले, ‘ठीक, हे पत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकून दे, वन विभाग काय करील ते मी बघतो.’ सतीश धवन देशातले अत्यंत वजनदार शास्त्रज्ञ होते. सगळ्यांना ठाऊक होते, की अवकाश विभाग इंदिरा गांधींच्या हाताखाली आहे आणि इंदिरा गांधी त्यांना मानतात. वन विभाग गप्प राहिला आणि पुढील पंचेचाळीस वर्षे मी अव्याहत जे वास्तव तेच मांडत राहिलो. 

या सगळ्या लेखनाला रसिक वाचकांची भरघोस दाद मिळत राहिली. एकदा गडचिरोलीत याचा खासा अनुभव आला. खूप वर्षे मी तिथल्या गोंड गावात मुक्काम करून लोकांसोबत अरण्याचा अभ्यास करत, त्यांना व्यवस्थापनासाठी हवी ती शास्त्रीय मदत करण्यात काढली आहेत. या नक्षलग्रस्त मुलखात बाहेरून आलेले कोण कुठे राहताहेत यावर पोलिसांची सक्त नजर असते. अशाच एका मुक्कामात सकाळी लोकांबरोबर नाष्टा करत असताना तिथे एक पोलिस सबइन्स्पेक्‍टर दाखल झाले. क्षणभर वाटले की काय आहे हे बालंट? पण ते सद्‌गृहस्थ म्हणाले, ‘तुझे लेख नेहमी आवडीने वाचतो, तू इथे आहेस कळले म्हणून सहज गप्पा मारायला आलोय.’

त्यांच्यापर्यंत माझे लेखन पोचले म्हणून प्रचंड खूष झालो. हे आवडीचे, वास्तवाखेरीज कोणतेही बंधन न मानणारे लेखन मी चालू ठेवीनच, पण सध्यापुरता गेली तेरा वर्षे दर महिन्याला ‘सकाळ’मध्ये एक लेख लिहिण्याचा नेम थांबवून एक पुस्तक लिहिण्याचा मानस आहे. अखेरीस तुकोबांच्या शब्दांत किंचित बदल करून म्हणू इच्छितो : आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे पाजळीतो!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.