पहाटपावलं : यशासाठी हवा संयम नि सातत्य

Raja-Akash
Raja-Akash
Updated on

प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं कुठलंही काम सहज आणि विनासायास पूर्ण झालं पाहिजे. अभ्यासातला धडा लक्षात ठेवायचा आहे, तो पटकन लक्षात राहायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट फार परिश्रम न करता लक्षात राहिली पाहिजे. कुठलीच अडचण न येता व्यवसायासाठी बॅंकेने कर्ज द्यावं. मला संगणक शिकायचा आहे, हार्मोनियम शिकायचा आहे. या गोष्टी चटकन जमल्या पाहिजेत. माझ्या मार्गात कुठलेच अडथळे यायला नको...’

अशा शेकडो अपेक्षा आपण मनाशी बाळगत असतो. त्या पूर्ण करण्याच्या मार्गात लहानसाही अडथळा आला, तर ‘हे काम मला कधीच जमणार नाही’ असं म्हणून आपण त्या गोष्टीचा नाद सोडून देतो आणि खंत करत बसतो. स्वत:ला कमकुवत समजू लागतो. त्यातून नैराश्‍य येतं, ही अनेकांची शोकांतिका आहे. कुठलीही गोष्ट करायची असेल, तर ती शंभर टक्के परिपूर्ण कर; नाहीतर मुळीच करू नको.’ हा सबकॉन्शन्स मेसेज आपल्या मेंदूत प्रोग्रॅम झाला आहे. त्याचा परिणाम आपण भोगत असतो. खरंतर कुठलीही नवीन गोष्ट करताना अडचणी येणारच. तो आपल्या परिश्रमांचा एक भाग असतो. तुम्ही बॅंकेकडे कर्जासाठी  गेलात, तर पहिल्या भेटीत बॅंकेतील अधिकारी फारसा प्रतिसाद देणार नाहीत. संगणक शिकताना तर पहिले काही दिवस काहीच कळणार नाही. असे अडथळे आले की अनेक लोक प्रयत्नच थांबवतात.

खरं पाहिलं तर हीच आपली खरी परीक्षा असते. संयम ठेवावा लागतो, परिश्रम करावे लागतात. ध्येय गाठण्याच्या पद्धती बदलून पाहाव्या लागतात. पुन्हा नव्यानं सुरवात करावी लागते. कधी कधी दोन पावलं मागंसुद्धा जावं लागतं. हे करण्याची आपली तयारी हवी. लहान सहान अडथळे आले तर अनेक जण हतबल होतात, प्रयत्न थांबवतात आणि मग काही केल्या ते काम त्यांच्या हातून पूर्ण होत नाही. कुठलंही काम हाती घेतल्यानंतर त्यातील यश आणखी एका गोष्टीवर अवलंबून आहे, ते म्हणजे कार्यातील सातत्य.

मार्गातील अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी कामातील सातत्य मदत करतं. इसापनीतीच्या कथेतला ससा झोपेचा छोटासा अडथळा आल्यामुळे थांबला, झोपला आणि शर्यत हरला. कासव गती  कमी असूनही केवळ सातत्य असल्यामुळे हळूहळू चालून शर्यत जिंकलं. आपल्याजवळ सशाची गती आहे, पण कासवाचं सातत्य नाही. ते स्वभावात आणता येईल काय?
वाहतं पाणी मार्गात अडथळा आला तरी थांबत नाही. उताराच्या दिशेनं जाण्यासाठी कुठूनतरी रस्ता शोधतंच. पण पुढे जात राहतंच, आपण तसं व्हायचं काय? आपल्या कामातील गती, सातत्य टिकवायचं काय? अगदी सोपं आहे. ठरलेलं काम करत राहा. कंटाळा आला, गती कमी झाली, डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी थांबू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.