माळढोक नावाची दंतकथा !

Maldhok-Bird
Maldhok-Bird
Updated on

‘अभयारण्या’मधूनही माळढोक पक्षी नाहीसा झाला आहे. या अतिसंकटग्रस्त राजबिंड्या पक्ष्याचा अधिवास संपल्यानं नान्नज अभयारण्याला माळढोकचं नाव दिल्याची घटना दंतकथा ठरावी, अशी स्थिती आहे. सोलापूरचं नाव जगाच्या क्षितिजावर आणणारा हा पक्षी नामशेष होण्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे जमिनींची खरेदी-विक्री ! 

घटना आहे १९७२ च्या दुष्काळातली. करमाळा तालुक्‍यातील एका गावात ‘पाणीवाला बाबा’ अवतरला होता. ‘लोकांचा आजार, रोगराई औषधी पाण्यानं दूर करतो,’ असा त्याचा दावा होता. गावोगावचे अश्राप खेडुत त्याच्या दाव्याला भुलून जमलेले. आपला रुबाब वाढवण्यासाठी त्या बाबानं साडेतीन फूट उंचीचा एक पक्षी दोरीनं खुंटाला बांधला होता. त्या मोठ्या आकाराच्या पक्ष्याला पाहून लोक बिचकत. सोलापूरचे पक्षिमित्र बी. एस. कुलकर्णी खास तो पक्षी पाहण्यासाठी तिथं गेले. तो होता माळढोक! मग करमाळ्यापासून नगरपर्यंत आणि उत्तर सोलापुरातील नान्नजपर्यंत सर्वत्र त्यांनी भटकंती केली आणि या पट्ट्यात माळढोक पक्षी मोठ्या संख्येनं असल्याचं शोधून काढलं. ‘माळढोक कुलकर्णी’ असंच त्यांचं नामाभिधान झालं...

दुसरी घटनाही करमाळा तालुक्‍यातलीच. सोलापूरचे पोलिस अधीक्षक म्हणून एक साहित्यप्रेमी, रसिक गृहस्थ बदलून आलेले. कवी-निसर्गप्रेमींचा त्यांच्याभोवती गोतावळा असे. त्यांना माळढोकबद्दल कळल्यानंतर बी. एस. कुलकर्णींना बरोबर घेऊन ते करमाळ्याला निघाले. तिथल्या पोलिस निरीक्षकाला माळढोकसाठी येत असल्याचं त्यांनी कळवलं होतं. पोलिस अधीक्षक आपल्या पक्षीमित्रासह करमाळा पोलिस ठाण्यात पोचले. तिथले सोपस्कार पार पडल्यावर ‘माळढोक कुठंय’ अशी विचारणा त्यांनी केली.

त्यावर माळढोकचा रस्सा, कबाब तयार असल्याचं पोलिस निरीक्षकांनी सांगितलं. पोलिस निरीक्षकांनी रातोरात शिकारी गाठून ‘साहेबांना माळढोक हवाय’ म्हणून त्याचं मसालेदार कालवण केलं होतं...

अभयारण्यातून माळढोक गायब होण्याची ही सुरवात होती. वन्यजीव विभागाने मग अभयारण्यातील जमिनींची खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. माळढोकमुळे हे झाल्याचं शेतकरी, एजंट आणि गावोगावच्या पुढाऱ्यांना कळालं. त्यामुळे माळढोक दिसला, की त्याला गुपचूप ठार मारून नाहीसं करून टाकण्याचं काम पद्धतशीरपणं सुरू झालं. दरवर्षीच्या पक्षिगणनेत माळढोकची संख्या घटत गेली. गेल्या काही वर्षांपासून माळढोक नामशेष झाला आहे, हे सिद्ध झालं आहे.

नान्नजबरोबरच महाराष्ट्रातूनही हद्दपार 
एकाच वेळी सहा-सात माद्यांचा जनाना बरोबर घेऊन माळावर फिरणारा साडेतीन फूट उंचीचा, पांढऱ्या मानेचा, विटकरी रंगाचे पंख, त्यावरचे ठिपके असा हा देखणा पक्षी नान्नज अभयारण्यातूनच नव्हे, तर महाराष्ट्रातूनही हद्दपार झाला आहे. ज्या राजस्थानाचा तो राज्यपक्षी आहे, तिथंही तो अभावानेच दिसतो. उजाडल्यावर वाढलेल्या गवताळ माळावरून जाताना त्यांच्या हालचालीमुळं उडणारे किडे, कीटक माळढोक आणि त्याच्या माद्या मटकावून टाकत. सरडे, उंदीरदेखील त्यांचे आवडते खाद्य. बाजरी, हुलग्यातून फिरतानाही त्यांचा पिकाला उपद्रव होत नसे. पण हे चित्र आता दुर्मीळ म्हणण्यापेक्षा इतिहासजमाच झालं आहे.

माळढोकाच्या हालचालींवरून अनेक आडाखे बांधले जात. पाऊस चांगला पडणार असेल, तरच त्याची मादी अंडी घालते. पाऊसकाळाचा अंदाज त्यावरून घेता येत असे. माळढोक वजनदार असल्यानं त्याला चिमणी-कावळ्यासारखं पटकन उडून जाता येत नाही. गोलंदाज चेंडू टाकण्याआधी जसा ‘स्टार्ट’ घेतो किंवा उड्डाणापूर्वी विमान जसं धावतं, तशी धाव घेऊन तो उडतो. त्यामुळे तो शिकाऱ्याचं सावज सहज होतो. 

‘पक्षी नको नि अभयारण्यही नको’ 
शेतजमिनींची खरेदी-विक्री रोखणारा हा पक्षी अभयारण्याच्या परिसरातील लोकांचा शत्रूच ठरला होता. मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या विवाहासाठी शेतकऱ्याला आपली जमीन विकावी लागत असेल, तर त्याला माळढोकविषयक कायद्याचा अडसर होता. आर्थिक उलाढाल खोळंबलेली. त्यामुळे माळढोक अभयारण्याचं क्षेत्र घटवण्यासाठी गावातल्या पुढाऱ्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी कंबर कसली. अभयारण्याचं क्षेत्र घटलं, गवताचं कुरण संपलं. समाजकटंकांनी आगी लावून माळ उजाड, भगभगीत करून टाकला. ‘पक्षी नको आणि अभयारण्यही नको’ हीच स्थानिक गावकऱ्यांची भावना असल्यानं माळढोकचं अस्तित्वच संपलं आहे. 

माळढोकांची संख्या घटल्यानं कृत्रिम प्रजनन केंद्र तयार करणं, त्यांचा अधिवास निश्‍चित करणं वगैरे प्रकार करून पाहिले. त्याचा काही उपयोग झाला नाही. यंदा नान्नज अभयारण्यात केलेल्या प्राणी-पक्षी गणनेत नान्नज अभयारण्यातील लांडग्यांची संख्याही अकरावरून सातवर आल्याचं स्पष्ट झालं आहे. घोरपडी, मुंगूस, खोकडांची संख्याही घटली आहे. ‘महासारंग’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माळढोकाचं तर अस्तित्वच नाही. कंबोडिया, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनीमध्ये त्याच्या जातकुळीतील पक्षी आढळतात. तिकडे पक्षिमित्र, तज्ज्ञ माळढोक पाहण्यासाठी नान्नजला येत. आता हे सारंच थांबलं आहे. ‘अभयारण्यात एकेकाळी माळढोक होता,’ अशी दंतकथाच तयार झाली आहे... डायनासोरसारखी !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.