बलात्काराच्या घटनेइतकेच त्याचे राजकारण करण्याची वृत्ती घृणास्पद आहे. ते थांबत नाही, तोवर मूलभूत उपाययोजनेचा मार्ग सापडणार नाही.
कोलकात्याच्या ‘आर. जी. कर रुग्णालया’तील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या यामुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरुन गेला. अशाच प्रकारची विटंबना बारा वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत निर्भयाच्या वाट्याला आली होती, त्यानंतर हाथरस, उन्नाव आणि मणिपूरमध्येही हीच विकृतीची मालिका सुरू राहिलेली दिसली. त्याला खळ नाही.