अमेरिकी राजकीय व्यवस्थेच्या बाहेरच्या आणि ‘पोलिटिकली इनकरेक्ट’ असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एका खंडानंतर पुन्हा एकदा ‘व्हाइट हाऊस’मधील प्रवेश निश्चित केला आहे. निवडणुकीचा अधिकृत निर्णय जाहीर झाला नसला तरी त्यांना मिळालेली आघाडी लक्षात घेता त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब व्हायचेच बाकी आहे. जागतिक महासत्तेच्या सर्वोच्च राजकीय स्थानावर महिला विराजमान होण्याची संधी हिरावली जाण्यास ट्रम्प दुसऱ्यांदा कारणीभूत ठरले. त्यांच्या २०१६ मधील निवडणुकीत हिलरी क्लिंटन आणि या निवडणुकीत कमला हॅरिस यांना त्यांनी पराभूत केले. त्यामुळे अमेरिकी राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे परिवर्तन होता होता राहिले. याला ट्रम्प यांनी इतिहास घडवला, असे म्हणायचे की इतिहास रोखला असे म्हणायचे, हा प्रश्नच आहे.