अग्रलेख : काका, मामा अन् भतिजा!

मध्य प्रदेशात भाजपकडून सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे; तर छत्तीसगडमध्ये भाजपने सत्तांतर घडवण्यासाठी आटापिटा चालवला आहे.
shivraj singh chouhan and kamal nath
shivraj singh chouhan and kamal nathsakal
Updated on

मध्य प्रदेशात भाजपकडून सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे; तर छत्तीसगडमध्ये भाजपने सत्तांतर घडवण्यासाठी आटापिटा चालवला आहे.

दिवाळीच्या शेवटच्या दिवशी मामाजींनी आपल्या राज्यातील पाच-साडेपाच कोटी मतदारांपैकी जवळपास संख्येने निम्म्या असलेल्या भगिनींना भाऊबीजेची दणदणीत ओवाळणी घातली! ‘लाडली बहेन योजने’त समाविष्ट नसलेल्या महिलांचाही समावेश या योजनेत लाभार्थी म्हणून केला जाईल. एवढेच नव्हे तर या सर्व भगिनींना लखपती बनवले जाईल, अशी ही भाऊबीज आहे.

त्याचवेळी काकाजींच्या पाटण मतदारसंघात ‘अब की बारी, काका पर भतिजा भारी!’ असे फलक झळकले आहेत. ऐन दिवाळीच्या मोसमात देशातील पाच राज्यांत सुरू असलेल्या निवडणुकांच्या हंगामात प्रचार कसा रंगतदार होत आहे, याची ही झलक! हे मामाजी आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, तर काकाजी आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल.

त्याचवेळी भाजपचे नेते साक्षात अमित शहा यांनी छत्तीसगडमध्ये जाऊन, ‘यावेळी काकाजींची डाळ शिजणार नाही!’ असे भाकित केले. मध्य प्रदेशातील सर्व म्हणजे २३० आणि छत्तीसगडमधील उर्वरित सत्तर मतदारसंघांत आज, शुक्रवारी मतदान होत आहे. साऱ्या देशाचे लक्ष सध्या मध्य प्रदेशवर केंद्रित झाले आहे. त्याचे कारण म्हणजे कमलनाथ आणि दिग्विजय सिंह या जोडीने घणाघाती प्रचाराची दंगल उभी केल्याने मामाजींची सत्ता खेचून घेण्याचे स्वप्न काँग्रेस बघत आहे.

छत्तीसगडमध्ये काकाजींविरोधात भाजपने त्यांच्याच एका लांबच्या पुतण्याला म्हणजेच ‘भतिजा’ला उभे केले आहे. हे विजय बघेल भाजपचे खासदार आहेतच; शिवाय पूर्वी एकदा त्यांनी काकाजींचा पराभवही केलेला आहे. त्यामुळे भाजप थेट छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनाच पराभूत करण्याच्या हिरीरीने प्रचारात दंग आहे.

मात्र, यापलीकडे मध्य प्रदेशात शिवराजसिंह यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. २०१८ मधील निवडणुकीत त्यांची सत्ता काँग्रेसने हिसकावून घेतली होती. मात्र, अवघ्या सव्वा वर्षांतच ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपशी घरोबा केला आणि मामाजींना आपली गादी पुन्हा मिळाली! हा १५ महिन्यांचा अपवाद वगळता ते सलग १८ वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रस्थापितविरोधी लाट आणि पक्षांतर्गत मतभेद त्यांच्या विरोधात हात जोडून उभे आहेत.

त्यामुळेच भाजपला केंद्रातील काही नेत्यांना मैदानात उतरवणे भाग पडले आहे. तर शेजारच्याच छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसच्या सरकारविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून दिली असली, तरी शिवराजसिंह यांच्याही गाठीशी ‘व्यापम घोटाळ्या’सारखी काही प्रकरणे आहेतच. त्यामुळेच ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या माध्यमातून भाजपने आपला हिंदुत्वाचा हुकमी एक्का प्रचारात अग्रभागी आणला आहे.

मात्र, दिग्विजयसिंह यांचा झंझावाती प्रचार हे भाजपपुढील खरे आव्हान तूर्तास दिसते. काँग्रेसला अवघड वाटणाऱ्या ६६ मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शिवाय, भाजपमधील तिकीटवाटपावरून नाराज असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील अनेक स्थानिक नेत्यांना परत काँग्रेसमध्ये खेचण्यात त्यांना यश आले आहे.

अर्थात, दिग्विजयसिंहांनी कितीही रान उठवले तरी मुख्यमंत्रीपदाचा काँग्रेसचा चेहरा कमलनाथ हाच आहे. मात्र, काँग्रेसने मध्य प्रदेश जिंकला तर दिग्विजयसिंहांचे पुत्र जयवर्धन यांना सत्तेत मोठे स्थान मिळू शकते.

छत्तीसगडमध्ये सत्ता राखण्यात काँग्रेसला यश आले तर भूपेश बघेल यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा पडणार, यात तूर्तास संदेह नाही. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडबरोबरच अन्य कोणत्याही राज्यांत भाजपची भिस्त ही केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच करिष्म्यावर आहे. त्यामुळे राजस्थान असो की मध्य प्रदेश; वा छत्तीसगड यापैकी कोठेही भाजपला मुख्यमंत्री कोण होणार, ही बाब गुलदस्त्यात ठेवणे भाग आहे.

या दोन्ही राज्यांबरोबर राजस्थानातही काँग्रेसने जातनिहाय जनगणना करण्याबाबत दिलेल्या आश्वासनामुळे आता ‘ओबीसी’ हा घटक निर्णायक खेळी करू शकतो. मात्र, गेली काही वर्षे सलग पाठीशी उभा राहणारा हा वर्ग आपल्यापासून दुरावतो की काय, या चिंतेनेही भाजपला ग्रासले आहे. शिवाय, मध्य प्रदेशात सुमारे २० टक्के असणाऱ्या आदिवासींची भूमिकाही महत्त्वाची ठरणार, हे भाजपच्या लक्षात आले आहे.

त्यामुळेच गेल्या महिन्यात आदिवासी राणी दुर्गावती यांची पाचशेवी जयंती मोदी यांनी धुमधडाक्यात साजरी केली होती. या पार्श्वभूमीवर आता आज, शुक्रवारी होत असलेल्या मतदानात मध्य प्रदेशातील महिला मामाजींनी दिलेल्या भाऊबीजेच्या ओवाळणीची परतफेड करतात काय? छत्तीसगडमध्ये काकाजी भतिजाच्या आव्हानाला कसे तोंड देतात, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.