निवृत्तीनंतरच्या जबाबदाऱ्याही वाढत गेल्या आणि मग प्रामुख्याने नोकरदार वर्गाला बचतीकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावे लागले.
अर्थव्यवस्था खुली असो, अथवा नियंत्रित; सामाजिक कल्याणकारी योजनांचे कवच ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. कोणतीही उलथापालथ झाली, तरी परिघावरील व्यक्तींना अशा परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाता कामा नये, हाच त्यामागे रास्त असा विचार असतो. तेव्हा असे पुरेसे भक्कम कवच जर आपल्याकडे असते, तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरातील ०.४ टक्क्यांच्या घटीचे पडसाद फारसे उमटले नसते. पण तसे सामाजिक सुरक्षा जाळे नसल्यामुळे व्याजदरातील या घटीची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. आपल्याकडे जगण्याच्या दोन पद्धती पूर्वसुरींनी सागून ठेवल्या आहेत. एक आहे जगण्याचा हाती आलेला क्षण हा सर्वात महत्त्वाचा आणि तो शक्य त्या परीने उपभोगून घ्यावा! या तत्त्वज्ञानाला छेद देणारी दुसरी एक जीवनशैली आपल्या देशात सांगितली जाते आणि साधारणपणे१९९० नंतर फोफावलेल्या चंगळवादाच्या आधी तीच मोठ्या प्रमाणावर आचरली जात होती. आपली नोकरी असो की व्यवसाय, तो चांगुलपणाने तसेच प्रामाणिकपणे करावा, पै-पैसा वाचवून गाठीला चार पैसे बांधावेत आणि निवृत्तीनंतर ‘साफल्य’, ‘कृतार्थजीवन’ अशा नावानं छोटेखानी घर बांधून निवांत जीवन कंठावे. मात्र, गेल्या अडीच-तीन दशकांत आयुर्मान वाढत गेले.
निवृत्तीनंतरच्या जबाबदाऱ्याही वाढत गेल्या आणि मग प्रामुख्याने नोकरदार वर्गाला बचतीकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावे लागले. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन तरी होते. पण खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तेही नाही. त्यामुळेच या सगळ्यांच्या दृष्टीने ‘कमर्चारी भविष्य निर्वाह निधी’ हा एक मोठा आधार राहिलेला आहे. त्याविषयीचा कोणताही निर्णय कोट्यवधी कर्मचारी व त्यांच्या कुटुबीयांना बसतो. ही योजना कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने यासाठी महत्त्वाची, की एकतर ही बचत सक्तीची असे. त्यापलीकडली बाब म्हणजे या ‘पीएफ’च्या खात्यात, कर्मचाऱ्याच्या बचत रकमेइतकी रक्कम संबंधित उद्योगालाही भरावी लागते. ही बचत अनिवार्य असल्याने कर्मचाऱ्याचे हित साधले जाते. त्यामुळेच आजमितीला देशात असलेल्या या निधीच्या कोट्यवधी खातेदारांची निवृत्तीनंतरची भिस्त याच ‘पीएफ’वर प्रामुख्याने असते. या निधीतील बचतीचा व्याजदर ८.५ टक्क्यांवरून यंदाच्या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्के करण्याच्या निर्णयाचे वर्णन ‘नोकरदारांना धक्का!’ अशा शब्दांत केले गेले. त्यात तथ्य निश्चितच आहे; कारण निवृत्तीनंतर याच बचतीवर पुढचे वानप्रस्थाचे जीवन जगण्याच्या योजना बहुतेकांनी आखलेल्या असतात.
अवघा देश दणाणून सोडणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच्या ४८ तासांत सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे त्यास राजकीय वास येणे साहजिक आहे. मात्र, या निर्णयाचा विचार त्यापलीकडे जाऊन करायला हवा. गेली दोन वर्षे अवघ्या जगावर कोरोना विषाणूचे महाकाय सावट होते. या काळात अनेकांचे रोजगार गेले, तर नोकऱ्या कशाबशा टिकून राहिलेल्यांना मोठ्या पगारकपातीला तोंड द्यावे लागले. एकूणातच उत्पादनही मंदावले आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेलाच मोठा फटका बसला. तरीही त्या दोन वर्षांच्या काळातही सरकारने ‘पीएफ’चा दर हा ८.५ टक्के असा कायम ठेवला होता. मात्र, आता यंदाच्या वर्षासाठी सरकारने जाहीर केलेला ८.१ टक्के हा दर गेल्या चार दशकांतील निचांकी दर आहे. या ४० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून, जनतेला सुगीचे दिवस दाखवणाऱ्या दशकात तर हा दर ११ टक्क्यांपर्यंत वर होता, यावर आता विश्वासही बसणे कठीण आहे.
अर्थात, विकासाच्या वाटचालीत एका टप्प्यानंतर व्याजदरांची पातळी खालचीच असते. जगभरच हा प्रवाह दिसतो. शिवाय अन्य सर्व पर्यायांमधील व्याजदर खाली आणि पीएफचाच जास्त ही व्यस्त स्थिती फार काळ राहू शकत नाही. त्यामुळे व्याजदराच्या घटीला तर्कसंगत कारणे कितीही देता येतील. मुद्दा एवढाच की आर्थिक छत्र नसलेल्या, अनिश्चित परिस्थितीला तोंड देत उमेदीच्या काळात भरपूर कष्ट उपसणाऱ्या नागरिकांच्या वृद्धावस्थेत त्यांना आपण कोणते संरक्षण देणार आहोत? सरकारला आधी हा विचार करावा लागेल आणि त्यानंतरच असे निर्णय घेणे योग्य ठरेल. हे व्याजदर कमी करताना महागाईचे सावट, रशिया-युक्रेन युद्धाचा बाजारपेठांवर होत असलेला परिणाम अशी कारणे गुवाहाटी येथील ‘भविष्य निर्वाह निधी संघटने’च्या बैठकीनंतर कामगार मंत्री भूपेन्द्र यादव यांनी नमूद केली आहेत.
अर्थात, सुरक्षिततेची हमी असलेल्या अन्य सरकारी बचत योजनांपेक्षा हा जाहीर झालेला ८.१ टक्के दरही काही प्रमाणात तरी अधिकच आहे, हे ध्यानात घ्यावे लागेल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर ७.१ टक्के, सुकन्या समृद्धी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये सध्या व्याजदर ७.४ टक्के, तर पोस्टातील बचत योजनांत तो ६.७ टक्के आहे. हे लक्षात घेता, ‘पीएफ’चे महत्त्व अद्यापही अबाधित असल्याचेच दिसून येते. सरकारच्या या निर्णयास विरोध करणाऱ्या कामगार संघटनांनीही ही बाब ध्यानात घ्यायला हवी.
एखाद्या व्यक्तीने कोणतीच चूक आयुष्यात केली नसेल, तर त्याचा अर्थ असा, की कोणतीही नवी गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केलेला नाही.
- अल्बर्ट आइन्स्टाईन, शास्त्रज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.