अग्रलेख : नंदीग्रामचा रणसंग्राम

West Bengal Election 2021
West Bengal Election 2021
Updated on

पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील लढतीचा संघर्ष जणू एकवटला आहे, तो ‘नंदीग्राम’मध्ये. त्यात विकासाचा मुद्दा उपस्थित होत असला तरी या संग्रामावर ध्रुवीकरणाची दाट छाया आहे. एकीकडे कोरोना विषाणूने चढवलेल्या दुसऱ्या हल्ल्याने देश बेजार झालेला असतानाही नंदीग्राममध्ये ‘बोले बोले नंदीग्राम...’ असा  गेले महिनाभर तारस्वरात सुरू असलेला गजर काल मंगळवारी एकदाचा थांबला! अर्थात, या घोषणेचा उत्तरार्ध भारतीय जनता पक्षासाठी ‘जय श्रीराम!’ असा होता, तर तृणमूल काँग्रेससाठी तो ‘ममतादीदी... ममतादीदी!’ असा असणार, हे उघड होते. देशाच्या पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दुसरा टप्पा संपला आणि या नंदीग्राम नावाच्या एका छोटेखानी गावात सुरू असलेला घनघोर संग्रामही थांबला. या विधानसभा निवडणुका पाच राज्यांत होत असल्या तरी गेल्या महिनाभरात प्रसारमाध्यमातून उभे करण्यात आलेले चित्र हे फक्त नंदीग्राममध्येच निवडणूक सुरू आहे, असेच होते. त्यास अर्थात ममता बॅनर्जी यांच्याकडून पश्चिम बंगालची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उचललेला विडा कारणीभूत आहे. त्यामुळे या एका मतदारसंघातील लढतीस लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक महत्त्व हे भाजपनेच आणून दिले होते. खरेतर नंदीग्राम हा ममतदादींचा पारंपरिक मतदारसंघ नाही; पण तेथील नेते आणि ममतादीदींचे जुने-जाणते सहकारी सुवेंदू अधिकारी यांना आपल्या छावणीत आणण्यात भाजपला यश आले आणि ममतादीदींनी स्वत: त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यातच प्रचाराच्या पहिल्याच फेरीत ममतादीदींना एक अपघात होऊन, त्यांचा पाय जायबंदी झाला आणि प्लॅस्टरमधील पाय सर्वांना दाखवत ‘व्हीलचेअर’वरून प्रचार करत त्यांनी अवघा बंगाल दणाणून सोडला. हा अपघात नसून, भाजप कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला होता, या दीदींच्या आरोपामुळे तर वादळ उठले. मात्र, भाजपने त्यास घणाघाती उत्तर देत प्रचार आणखी वरच्या पट्टीत नेला. मोदी यांनी मग त्या मतदारसंघाची वारी करणे हे स्वाभाविकच होते. मात्र, अमित शहा हे तर जवळपास तेथे ठाण मांडूनच बसले होते. भाजपचा बंगालमधील प्रचाराचा भर हा  ध्रुवीकरणावर होता आणि त्यातूनच मग प्रभू रामचंद्रांच्या विरोधात कालीमातेला उभे करण्यापर्यंत मजल गेली.  


भाजपच्या या निवडणुकीतील प्रचाराचे वैशिष्ट्य हेच, की त्यांनी ममतादीदींना आपल्या खेळपट्टीवर खेळावयास भाग पाडले. भाजप केवळ हिंदुत्वाचे राजकारण करत आहे, हे लक्षात येताच ममतादीदींनी कालीमहिम्न स्तोत्रच म्हणून दाखवले! आपले गोत्र ‘मा, माती, मानूष’ आहे, असे सांगणाऱ्या दीदींनी अखेर आपले गोत्र ‘शांडिल्य’ असल्याचेही जाहीर केले. या संपूर्ण प्रचारमोहिमेत भाजपचा रोख हा ‘तृणमूल’ करत असलेल्या बंगालमधील २७ टक्के मुस्लिमांच्या तुष्टीकरणावर होता. त्यातून वाद वाढत गेले. केंद्राच्या ‘कल्याणकारी योजना’ दीदी बंगाली जनतेपर्यंत पोचूच देत नाहीत, असे तुणतुणे भाजपने बराच काळ वाजवले. तर बिगरभाजप सरकारे असलेल्या राज्यांवर केंद्र सरकार कसा अन्याय करत असतो, हे ‘तृणमूल’चे त्यास उत्तर होते. त्यापलीकडची बाब म्हणजे २७ टक्के मुस्लिमांखालोखाल असलेल्या २१ टक्के ओबीसींवर आता भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. याचा स्पष्ट अर्थ तृणमूल मुस्लिमांना गोंजारत असेल, तर मग आम्ही ओबीसींना आमच्या छावणीत आणतो, असाच आहे. एकविसाव्या शतकाच्या कितीही गप्पा मारल्या तरी आपली राजकीय परिभाषा आणि प्रचारसूत्रे अद्यापही मागच्या काळातच घोटाळत आहेत, हे यावरून स्पष्ट होते. खरेतर नंदीग्राम हा भाजप तसेच तृणमूल कॉंग्रेस या दोहोंसाठीही कळीचा मतदारसंघ बनण्यास अनेक कारणे आहेत. २००७ मध्ये बंगालमधील डाव्यांच्या सरकारने तेथे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन एक भलामोठा रासायनिक प्रकल्प उभारण्याचा घाट घातला होता. त्याविरोधात उभारलेल्या आंदोलनात ममतादीदींच्या ‘तृणमूल’चा वाटा मोठा होता. सिंगूरमधील टाटांच्या नॅनोच्या प्रस्तावित प्रकल्पालाही ‘तृणमूल’ने विरोध केला होता. या संघर्षातून ममतादीदी आणि त्यांच्या पक्षाने मोठी झेप घेतली आणि त्याचीच परिणती अखेर पुढच्या चारच वर्षांत म्हणजे २०११मध्ये डाव्यांची ३० वर्षांची राजवट कोसळून ‘तृणमूल’ची सत्ता येण्यात झाली होती. मात्र, त्या आंदोलनात ममतादीदींबरोबर सहभागी झालेली काँग्रेस आता ‘तृणमूल’ तसेच भाजप या दोहोंच्या विरोधात अस्तित्वाची लढाई खेळत आहे. नंदीग्राम आणि सिंगूरमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘तृणमूल’च्या विरोधात पर्यायी नॅरेटिव्ह उभे करून विकासाचा आणि रोजगारनिर्मितीचाच मुद्दा भाजपने केंद्रस्थानी आणला असता तर प्रचाराला सकारात्मक वळण लागू शकले असते. प्रचारात हे मुद्दे येत असले तरी त्या बरोबरीनेच ध्रुवीकरणाच्या सर्व क्लृप्त्या भाजप वापरत असल्याने त्यानेच प्रचार झाकोळला गेला. भाजपने आपली सारी ताकद ही केवळ ममतादीदींना पराभूत करण्यासाठी लावली नाही ना, असे चित्र आता उभे राहिले आहे.  नंदीग्राममधील त्या आंदोलनाच्या काळात बंगालमध्ये औषधालाही न सापडणाऱ्या भाजपने याच एका तपात मोठी मुसंडी मारली. २०१६मधील निवडणुकीत भाजपचे केवळ तीन आमदार निवडून आले असले, तरी नंतर तीनच वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४२ पैकी १८ जागा जिंकताना १२१ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली होती. त्या जोरावरच आज बंगालात सत्तास्थापनेची स्वप्ने बघणाऱ्या भाजपला ‘नंदीग्राम’ हीच महत्त्वाची रणभूमी वाटते आहे, ही बाबच राज्यातील राजकीय संघर्षाचे स्वरूप पुरेसे स्पष्ट करणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.