आर्थिक-वित्तीय साक्षरता वाढली पाहिजे, असे नुसते म्हणून चालणार नाही, त्याच्या सुविधा सर्वदूर निर्माण करण्याची गरज आहे. जोखमीचे गुंतवणूक पर्याय मुळातच अनिष्ट आहेत, असे मानण्याचे कारण नाही. पण ते नुसतेच मोहाचे सापळे ठरू नयेत, असे वाटत असेल तर नव्या युगाचे नवे मंत्र-तंत्र नीट आत्मसात करण्याची गरज आहे.
रूळ बदलताना जो खडखडाट होतो, त्याचा फारसा बाऊ केला जात नाही, याचे कारण त्याची आधीच जाणीव असते आणि सर्वांनाच त्याचा बऱ्याच अंशी सारखाच अनुभव येतो. पण जेव्हा बदलाची प्रक्रिया अधिक मूलगामी, सर्वंकष असते आणि त्याच्या खडखडाटाच्या वेदना प्रत्येकाच्या स्थितीनुसार खूप वेगवेगळ्या असतात, तेव्हा मात्र खूप काळजी घ्यावी लागते. सध्या आपला समाज ज्या विविध प्रकारच्या स्थित्यंतरांतून जात आहे, त्या बाबतीतही अशाच काळजीची गरज ठळकपणे समोर आली आहे. ‘क्रिप्टोकरन्सी’नामक आभासी चलनाचे वाढत असलेले प्रस्थ, हे त्या परिस्थितीचे एक तात्कालिक लक्षण म्हणता येईल. ‘बिटकॉईन’चे भाव गेल्या आठवड्यात सातत्याने घसरत आहेत. गेल्या चौदा दिवसातील घसरणीचे प्रमाण वीस टक्के आहे. अर्थात, भावातील उलथापालथ हे त्याचे एक वैशिष्ट्य असल्याने त्यात धक्कादायक काही नाही. मुद्दा आहे तो त्याविषयीच्या सावधगिरीचा. अद्यापही आपल्या सरकारने या चलनाला मान्यता दिलेली नसताना, त्याला नियमनाची कोणतीही चौकट लागू नसताना गुंतवणूकदारांचा एक वर्ग त्याकडे वळत असून त्याचे प्रमाण वाढत आहे. या चलनाविषयी गूढतेचे वलय कायम आहे, तरीही त्या गुहेत शिरण्यास बरेच जण उत्सुक असल्याचे दिसते आहे. अफाट परतावा मिळण्याची शक्यता, हेच त्याचे कारण आहे, हे उघड आहे. अर्थात हे केवळ क्रिप्टोकरन्सीमध्येच घडते आहे, असे नाही, तर शेअर बाजारातही लोक मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवत आहेत; आणि त्यांची त्यातील आशा-अपेक्षांची गुंतवणूकही मोठी आहे. येथेही घसघशीत परतावा मिळणे हे टायमिंग अचूक साधल्यास शक्य असते. पण हा ‘जर-तर’ खूप महत्त्वाचा असतो. ‘जिथे परतावा जास्त, तिथे जोखीम जास्त’ हे सूत्र म्हणून सर्वज्ञात असले तरीही त्याच्या पूर्वार्धाकडे जेवढे लक्ष जाते, तेवढे उत्तरार्धाकडे जात नाही आणि मग घोळ होतो. ‘पेटीएम’ या लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्मची मालक कंपनी असलेल्या ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या प्राथमिक समभाग विक्रीविषयी झालेला प्रचंड गवगवा आणि गाजावाजा यामुळे अनेकांचे वास्तवाचे भान सुटले. जेव्हा त्याचे लिस्टिंग झाले, तेव्हा भावाचा आकडा पाहून सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या निराशेला पारावार उरला नाही. पहिल्या दिवशी प्रतिसमभाग ५८९ रुपयांचा तोटा पाहून तोंडचे पाणी पळाले. हे मुळातच जोखमीचे गुंतवणूक क्षेत्र आहे आणि तिथे असा सापशिडीचा खेळ सतत सुरू असतो, हे जरी खरे असले तरी या खेळाचीही काही पथ्ये आहेत आणि ती समजून न घेताच नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत राहिल्यास निराशा येऊ शकते. त्यामुळेच नीट समजून घेणे, सावधगिरी बाळगणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवली पाहिजे.
हे सगळे ज्या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर घडते आहे, ती लक्षात घेतली तर समस्येच्या व्याप्तीचा अंदाज येतो. बॅंकिंग क्षेत्रात सातत्याने फार मोठे बदल घडत आहेत. ज्या सर्वसामान्य ग्राहकांची बॅंकांच्या ठेवींवर प्रामुख्याने भिस्त असते, त्यांवरील व्याजदर सातत्याने खालचा आलेख दाखवीत आहेत. जोखीम पेलण्याची शक्ती नसलेला वर्ग बॅंकांनाच प्रामुख्याने आपली बचत सुरक्षित ठेवण्याचे साधन मानतो आणि अर्थातच त्यावर काही परतावा मिळावा, अशी अपेक्षा ठेवतो. परंतु सध्याच्या बदलाच्या झपाट्यात वित्तीय क्षेत्र आणि त्यातही बॅंकिंगच्या स्वरूपात मोठे बदल घडत आहेत. अर्थव्यवस्थेला गती द्यायची तर पैसा सुलभ रीतीने उपलब्ध होणे ही एक पूर्वअट असते. त्यामुळेच कर्ज स्वस्त झाले तर उद्योजक ते उचलतील आणि अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान होईल, या दिशेनेच गेल्या काही वर्षांत प्रयत्न सुरू आहेत. व्याजदर कमी झाले, की त्याचा फटका ठेवीदारांनाही बसतो. एकीकडे त्यांना हा सुरक्षित वाटणारा पर्याय अशा रीतीने अनाकर्षक बनत आहे, तर दुसरीकडे जोखमीची अनेक साधने त्यांना खुणावत आहेत. मोहात पाडत आहेत. पण तो पर्याय आजमावताना पुरेशी तयारी केली जात नाही. या प्रश्नावर दुहेरी उपाययोजनेची गरज आहे. एक म्हणजे रिझर्व्ह बॅंक, ‘सेबी’सारख्या नियामक संस्थांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरतील. म्हणूनच त्या संस्था कशा मजबूत होतील आणि त्यांची कार्यात्मक स्वायत्तता कशी टिकेल, हे पाहावे लागेल. दुसरा भाग अर्थातच लोकशिक्षणाचा. सध्याच्या संक्रमणकाळात लोकांना बदल अंगीकारताना आधारांची, मदतीची, मार्गदर्शनाची गरज आहे. आर्थिक साक्षरता वाढली पाहिजे, असे नुसते म्हणून चालणार नाही, त्याच्या सुविधा सर्वदूर निर्माण करण्याची गरज आहे. हे शिक्षण प्रादेशिक भाषांतून देणे गरजेचे आहे. मुदलातच भांडवली बाजार आणि त्या अनुषंगाने इतर गुंतवणूकपर्याय अनिष्ट आहेत, असे मानण्याचे कारण नाही. पण ते नुसतेच मोहाचे सापळे ठरू नयेत, असे वाटत असेल तर नव्या युगाचे नवे मंत्र-तंत्र आत्मसात करावे लागतील. त्यादृष्टीने वित्तीय साक्षरताही आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.