पाताळयंत्री हालचाली करून झालेले हल्ले बदलत्या युद्धतंत्राची जाणीव करून देणारे आहेत.
शत्रूला मूर्ख ठरवण्यात यश आले, तर त्या खटाटोपात आपणही नकळत त्याच पातळीला उतरतो, अशा आशयाचा एक संवाद प्रख्यात गुप्तहेर कथालेखक जॉन ल कार यांनी त्यांच्या गाजलेल्या कादंबरीत एका पात्राच्या तोंडी योजिला होता. त्याची आठवण प्रकर्षाने झाली ती तीन दिवसांपूर्वी दुपारी साडेतीनच्या सुमारास लेबनॉनमधील शेकडो नागरिकांच्या खिशात अचानक पेजरबॉम्ब फुटल्याच्या घटनेने.
त्यात कानाला लावलेल्या वॉकीटॉकीचे स्फोट झाले. हिज्बुल्ला संघटनेचे अनेक दहशतवादी ठार झाले, आणि नागरिकदेखील. याचे कारण मोटारीत, दुकानात, कार्यालयात कुठेही हे स्फोट झाले. त्यात अनेकांचे कान फुटले, तर शेकडो जण अंध झाले. तासाभरात हे हजारो छोटे छोटे स्फोट झाले; पण त्यांचा आवाज जगभर दुमदुमला. हे अर्थातच त्यांच्या शत्रूने म्हणजे इस्राईलने घडवून आणल्याची चर्चा जगात सुरू आहे.
एकीकडे ‘हमास’शी सुरू असलेले पारंपरिक युद्ध आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्याच पद्धतीचे हल्ले चढवणे अशा दोन्ही आघाड्यांवर इस्राईल संघर्ष करताना दिसतो आहे. पाताळयंत्री हालचाली, काटेकोर नियोजन आणि लक्ष्य निश्चित करून जास्तीत जास्त परिणाम साधायचा, ही जी दहशतवाद्यांची रणनीती असते, तीच इस्राईलने या हल्ल्यात वापरलेली दिसते. हे सगळे नाट्यमय, थरारक वाटत असले तरी सध्याचे बदलते युद्धतंत्र नागरी जीवनावर असुरक्षिततेचे सावट निर्माण करीत आहे, हे वास्तव चिंतेचे आहे.
महायुद्धोत्तर मांडामांड करताना बड्या राष्ट्रांनी १९४८मध्ये इस्राईलची ‘पवित्र भूमी’ यहुद्यांना दिली. शत्रुराष्ट्रांनी घेरलेला मुलुख यहुद्यांना मिळाला. पूर्वेकडे मृतसमुद्र आणि जॉर्डन. पश्चिमेला भूमध्य समुद्र. उत्तरेला लेबनॉन आणि सीरिया, आणि नैऋत्येला गाझा पट्टी आणि इजिप्त. पलिकडला इराणही या देशाला पाण्यात पाहणारा. या चक्रव्यूहात अस्तित्व राखण्यासाठी इस्रायली सतत संघर्षरत असतात.
गेल्या वर्षी ‘हमास’ या कट्टर दहशतवादी संघटनेने इस्राईलवर हल्ला करुन काही नागरिकांचा बळी घेतला, आणि शेकडो जणांना पळवून नेले. हे युद्ध आजही पेटलेलेच आहे. लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेनेही युद्धात उडी घेतली आहे. इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांशीही झुंज चालूच आहे.
अशा युद्धजन्य परिस्थितीत इस्रायली गुप्तचरांनी केवळ हॉलिवूडच्या थरारपटात शोभावा, असा हिज्बुल्ला संघटनेच्या दहशतवाद्यांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घाव घातला. खरोखर पेजरचे स्फोट झाले का? माणसे मृत्युमुखी पडली का? हा हल्लाच होता की अपघात? या साऱ्यांची उत्तरे ‘हो’ अशीच आहेत. बदलत्या युद्धतंत्राची जाणीव करून देणारे हे हल्ले आहेत.
या हल्ल्यामागे ‘मोसाद’ नव्हे तर ‘युनिट ८२००’ नावाची इस्राईलची आणखी एक गुप्तचर संघटना आहे, असाही दावा काही माध्यमे करीत आहेत, तर काही माध्यमे या कृत्यामागे ‘सीआयए’ असल्याचे सांगत आहेत. हल्ला होण्यापूर्वी इस्राईलच्या एका लष्करी अधिकाऱ्याने मात्र, ‘आमचे शत्रू यापुढे पाणी पिताना, आणि अन्न गिळतानाही घाबरलेले असतील’ असा इशारा दिला होता.
पेजरचे स्फोट होणे, ही या हल्ल्यातली अभिनव चीज म्हणावी लागेल. पेजर नावाचे हे छोटे डबीसदृश यंत्र अजूनही कुठेतरी वापरात आहे, हे अनेकांना पहिल्यांदाच कळले. मोबाइल फोनचा दुरुपयोग इस्रायली करतील, या भीतीने हिज्बुल्लाच्या म्होरक्याने ‘पेजर वापरा’ असा हुकूम गेल्याच वर्षी आपल्या सशस्त्र पाईकांना दिला होता. त्यानुसार एका तैवानी कंपनीकडे पाच हजार पेजरची ऑर्डर हिजबुल्ला संघटनेने दिली.
या पेजरच्या रचनेत सर्किटची गडबड करुन इस्राईलच्या गुप्तचरांनी तीन ते पाच ग्रॅम स्फोटक पेरले. पेजरमधली लिथियम बॅटरीदेखील संहारक स्फोटक ठरली. हेच पेजर हिज्बुल्लाच्या दहशतवाद्यांपर्यंत पोचतील, अशीही व्यवस्था इस्रायली गुप्तचरांनी केली.
परंतु, पेजरमध्ये घातपाताची कुणकूण लेबनॉनमधील काही अधिकाऱ्यांना लागल्याने भीषण युद्धापूर्वीच इस्राईलला आपले पेजरास्त्र वापरण्याची पाळी आली, असेही सांगितले जाते. अर्थात, या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी. हेच तथ्य असेल, असा छातीठोक पुरावा एकही उपलब्ध नाही.
एक मात्र खरे, या कारस्थानामागे खूप महिन्यांची मेहनत, चिकाटी आणि धाडस असले पाहिजे. ‘हिज्बुल्ला’सदस्यांच्या खिशातल्या पेजरपर्यंत ‘मोसाद’वाले पोचलेच कसे, याबद्दल सर्वत्र नवल व्यक्त करण्यात येत आहे. इस्रायली ‘मोसाद’ ही संघटना धाडसाने आपल्या कामगिऱ्या पार पाडते, असा तिचा लौकिक आहे.
युगांडातून आपले विमान प्रवाशांसकट सहीसलामत सोडवून आणणारे ‘ऑपरेशन एंटिबी’ असो, किंवा ऑलिम्पिकमध्ये इस्रायली पथकाचे शिरकाण करणाऱ्या दहशतवाद्यांना निवडून निवडून यमसदनास पाठवणारे ‘ऑपरेशन म्युनिच’ असो, दुसऱ्या महायुद्धातील नाझी गुन्हेगारांना जगाच्या पाठीवरुन कुठूनही हुडकून न्यायासनासमोर उभे करण्याची कामगिरी असो, ‘मोसाद’ने आपली मारकक्षमता दाखवून दिली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे लष्करी उपयुक्ततेचे आविष्कार, असीम धाडस आणि अचूक योजना यांच्या जोरावर इस्रायली गुप्तचर जगभर आपला दबदबा राखून आहेत. इस्राईली कारनाम्यांचे कौतुक करताना युद्धतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि माध्यमेही कधी थकत नाहीत. ‘आय फॉर ॲन आय’ हे तत्त्व या देशाने अस्तित्वासाठी स्वीकारले आहे; पण अंतिमत: तो संहारच, हे वास्तव नाकारावे कसे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.