अग्रलेख : चौसष्ट चौकड्यांचे राजे

बुद्धिबळाच्या खेळात पटावरचे प्यादे आठव्या आणि शेवटच्या घरात गेले की त्याचे रूपांतर सामर्थ्यशाली वजीरात होते. मात्र, तिथपर्यंत जाताना त्या प्याद्याला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते.
sakal
chess competitionchess competition
Updated on

बारमाही क्रिकेटज्वर अंगी मुरलेल्या भारतीयांनी बुद्धिबळातील दिग्विजयामधून काही शिकले पाहिजे. क्रिकेट विश्‍वकरंडकाइतकेच देदिप्यमान यश भारतीय बुद्धिबळपटूंनी मिळवले आहे.

आकार, क्षेत्रफळ, लोकसंख्या यांपेक्षा देशाचे मोठेपण हे विविध क्षेत्रातील त्याच्या कर्तृत्वावरून ठरते. मग ते विज्ञान संशोधन असो, कलेचा प्रांत असो वा क्रीडाक्षेत्राचे मैदान. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये लक्षणीय कामगिरी करण्यात अपयश आल्याने भारतीयांच्या मनावर काहीसे दाटलेले निराशेचे मळभ बुद्धिबळपटूंच्या ताज्या कामगिरीने नक्कीच दूर झाले असेल. पुरुष व महिला संघांनी बुद्धिबळ अलिंपियाडमध्ये सुवर्णपदके पटकावली.

बुद्धिबळाच्या खेळात पटावरचे प्यादे आठव्या आणि शेवटच्या घरात गेले की त्याचे रूपांतर सामर्थ्यशाली वजीरात होते. मात्र, तिथपर्यंत जाताना त्या प्याद्याला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. पण विचलित न होता, मार्ग काढत पुढे गेल्यास यश मिळतेच मिळते. भारतीय बुद्धिबळपटूंनी गेल्या काही वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून संपादन केलेल्या यशाचे वर्णन करायचे तर ही उपमा सार्थ ठरेल.

‘विश्वनाथन आनंद’ हीच सुरुवातीला भारतीय बुद्धिबळ क्षेत्राची ओळख होती. पण त्याने वैयक्तिकरीत्या यशाची शिखरे गाठतानाच पुढच्या पिढीला उदाहरण तर घालून दिलेच, परंतु प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही दिले. त्याने निर्माण केलेल्या पिढीतील खेळाडू १९-२० या वयातच चमकू लागले आहेत.

बुडापेस्ट येथील बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सुवर्णपदक पटकावले, हे यश खरोखर आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पिढी घडली की क्रांती कशाप्रकारे होते, याचे हे उत्तम उदाहरण. भारताच्या डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरीगेसी, विदित गुजराथी, तर महिलांमध्ये दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, आर. वैशाली आणि हरिका अशा आठ जणांनी स्वतःसह देशाचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.

बुद्धिबळ हा तसा वैयक्तिक खेळ; पण आपापल्या पटावर बुद्धिमत्ता दाखवण्यापुरती ही ऑलिंपियाड स्पर्धा नव्हती. याचे कारण येथे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून संघभावनाही या स्पर्धेत तेवढीच महत्त्वाची होती. भारताच्या खेळाडूंनी ती या स्पर्धेत दाखवून दिली.

मुळात क्रिकेटप्रधान असलेल्या आपल्या देशात क्रिकेटचाहत्यांना आणि इतरांनाही कदाचित या यशाची कल्पना येणार नाही; पण या आठ बुद्धिबळपटूंनी मिळविलेले यश हे रोहित शर्माच्या संघाने मिळवलेले ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील विजयाइतकेच महत्त्वाचे आहे. एकाच वेळी पुरुष आणि महिला संघ बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये विजेते होण्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

ज्या देशात आधी बुद्धिबळाचे फारसे महत्त्व नव्हते, पण तिथे एक खेळाडू जिद्दीने विश्वविजतेपदापर्यंत मजल मारतो, एवढेच नाही तर बुद्धिबळपटूंची नवी पिढी तयार करतो, हे यश सामान्य नाही. अमेरिकेच्या नामवंत बुद्धिबळपटूनेदेखील हीच भावना व्यक्त केली आहे. या स्पर्धेत पुरुषांमध्ये एकूण ४४ सामने झाले, त्यात २७ विजय आणि एक पराभव. उर्वरित अनिर्णित सामने.

हे कमी म्हणूनच की काय तर पुरुषांनी अंतिम फेरी शिल्लक असतानाच विजेतेपद निश्चित केले. एकापेक्षा एक महान प्रतिस्पर्धी असलेल्या संघांना आपल्या जवळपासही फिरकू न देणे इतके प्रबळ वर्चस्व आणि मक्तेदारी कधीकाळी कास्पारोव, कार्पोव यांच्या तेव्हाच्या सोव्हिएत संघराज्याने मिळवलेली असेल; पण आताच्या आधुनिक युगात एवढा दरारा कोणालाही दाखवता आलेला नाही, तो आपल्या भारतीयांनी दाखवला.

म्हणूनच त्यांचे हे यश इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असणारे आहे. बुद्धिबळ म्हणजे भारत असे समीकरणच जणू काही तयार होत आहे. पिछाडीवर पडल्यानंतर किंवा एखादा सामना हरल्यानंतरही कसे पुनरागमन करायचे ही जिद्द आणि आत्मविश्वास महिला संघाने दाखवून दिला.

प्रतिस्पर्ध्यांच्या मनात भीती निर्माण करणारा खेळ भारतीयांनी केला. जगज्जेता चीनचा डिन लिरेन या स्पर्धेत खेळत होता; पण भारत आणि चीन आमनेसामने आले तेव्हा डी. गुकेशसमोर लिरेनला खेळवण्यातच आले नाही, याचे कारण या दोघांमध्ये आता विश्वअजिंक्यपदाची लढत होणार आहे.

या लढतीपूर्वी आपल्या खेळाडूचा आत्मविश्वास खच्ची होऊ नये, म्हणून चीनने माघार घेतली. एवढा दरारा आणि दबदबा आपल्या या बुद्धिबळ संघाने निर्माण केला आहे. आता नुसताच विजयोत्सव साजरा करण्यात मग्न न राहता या खेळासाठी जास्तीत जास्त प्रशिक्षणसुविधा कशा पुरवता येतील, शालेय पातळीपासून खेळाडूंना कशा रीतीने प्रोत्साहन देता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

चौसष्ट घरांच्या या पटावर भारतीय खेळाडूंकडून अपेक्षित आहे ते म्हणजे विश्वविजेतेपद! केवळ १८ वर्षे वय असलेला डी. गुकेश बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील या यशाचा आत्मविश्वास घेऊन सर्वात अनुभवी लिरेन याच्याशी खेळण्यास सज्ज होणार आहे. आता भारतीयांचे लक्ष लागले आहे, ते या यशाकडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.