अग्रलेख : एका समृद्ध वारशाचे जळीत

एका मोठ्या इतिहासाची साक्षीदार असलेली, सांस्कृतिक ओळख बनलेली, अभिरुचिसंपन्न पिढ्या घडविणारी वास्तू जेव्हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडते, तेव्हा होणारे नुकसान केवळ पैशात मोजता येत नाही.
keshavrao bhosale theater fire
keshavrao bhosale theater firesakal
Updated on

एका मोठ्या इतिहासाची साक्षीदार असलेली, सांस्कृतिक ओळख बनलेली, अभिरुचिसंपन्न पिढ्या घडविणारी वास्तू जेव्हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडते, तेव्हा होणारे नुकसान केवळ पैशात मोजता येत नाही.

इमारतींना आगी लागण्याच्या घटना देशात कितीतरी घडतात. त्या प्रत्येक घटनेत सर्व प्रकारची हानी आणि दुःखही होते; परंतु समाजात सर्वदूर आणि आबालवृद्धांपर्यंत त्या दुःखाची झळ पोहोचतेच असे नाही. याचे कारण त्या इमारतींना स्वतःचा चेहरा लाभलेला नसतो.

समाजातील सर्व घटकांशी त्यांचे आतड्याचे नाते निर्माण झालेले नसते. त्यांना अगदी चकचकीत रंग दिलेले असले तरी त्याने माणसांच्या अंतरंगाचा ताबा कधी घेतलेला नसतो. पण जेव्हा हे सगळे असते, तेव्हा मनाला कसा चटका बसतो आणि हृदये विदीर्ण होतात, याचा जळजळीत प्रत्यय कोल्हापूरच्या ‘केशवराव भोसले नाट्यगृहा’ला लागलेल्या भीषण आगीमुळे आला आहे.

सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या समृद्ध परंपरेतील ऐतिहासिक वारसा लाभलेले कोल्हापुरातील ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ आगीमुळे बेचिराख झाले. जागतिक दर्जाच्या या नाट्यगृहाने नाट्यपरंपरा जपत केवळ मनोरंजनच केले नाही, तर समाजाच्या विविध सामूहिक स्मृतींना एकत्रित आणून त्यांचे जतनही केले. कोल्हापूरची कलासक्त शहर किंवा कलापूर म्हणून ओळख जगात करून देण्यामध्ये या नाट्यगृहाचा मोठा वाटा होता.

एका मोठ्या इतिहासाची साक्षीदार असलेली, सांस्कृतिक ओळख बनलेली, अभिरुचिसंपन्न पिढ्या घडविणारी वास्तू जेव्हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडते, तेव्हा होणारे नुकसान केवळ पैशात मोजता येत नाही. शहरीकरणाच्या, आधुनिकीकरणाच्या जबरदस्त रेट्यांत अनेक शहरे आणि गावे आपल्या वैभवशाली खुणा गमावत चालल्या आहेत. एक प्रकारचे सपाटीकरण सर्वत्र अनुभवाला येत आहे. अशावेळी घडलेल्या या घटनेने मराठी रसिकमन सुन्न झाले असले तर नवल नाही.

सांस्कृतिक मूल्यव्यवस्था उभी करण्यापासून ती रुजवणे आणि वाढवणे यासाठी राजाश्रय लागतो. तो राजाश्रय राजर्षी शाहूंनी या नाट्यगृहासाठी दिला होता. रोममधील कुस्ती मैदान व नाट्यगृह पाहिल्यानंतर १९०२ मध्ये राजर्षी शाहूंनी कोल्हापुरातही अशाच पद्धतीचे मैदान आणि नाट्यगृह हवे, असा ध्यास घेतला आणि तो पूर्णत्वाकडे नेला. श्रीमंत पिराजीराव घाटगे यांच्या हुकमतीखाली याचे काम झाले.

नाट्यगृहाच्या छताचे बांधकाम करताना परदेशातील नाट्यगृहांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी परदेशातून लोखंडी गर्डर्स मागविले. माईक, स्पीकरसारखी व्यवस्था नसताना शेवटपर्यंत आवाज पोहोचेल, अशी रचना केली. आवाज घुमणार नाही म्हणून अंतर्भागात लाकडाचे पृष्ठ, रंगमंचाच्या खाली पाण्याचा हौद, त्यावर लाकडाचा पृष्ठभाग अशी रचना केली.

१९१३ मध्ये नाट्यगृहाचे बांधकाम सुरू झाले आणि १९१५ मध्ये दोन वर्षांत हे पॅलेस थिएटर म्हणून आकाराला आले. दसऱ्याच्या मुहूर्तावर किर्लोस्कर कंपनीचे ‘मानापमान’ पहिल्यांदा सादर झाले. यावेळी राम गणेश गडकरी, चिंतामणराव कोल्हटकर अशी मंडळीही होतीच. नाट्यगृहामध्ये काळानुसार बदल होत गेले. त्यानंतर ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ असे याचे नामकरण झाले.

संगीत नाटकांच्या सुवर्णकाळापासून बालगंधर्वांपर्यंत, ते आता नव्या पिढीतील भारतातील अनेक दिग्गज कलाकारांनी या रंचमंचावर कला सादर केली. कलामहर्षी बाबूराव पेंटरांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना येथे केली. छत्रपती राजाराम महाराजांना मानपत्र याच ठिकाणी दिले गेले. अशा अनेकांच्या असंख्य आठवणी या नाट्यगृहाशी जोडल्या गेल्या आहेत.

प्रत्येक रंगकर्मी जगाच्या रंगभूमीवर गाजला तरी कोल्हापुरात आला की, पहिल्यांदा या नाट्यगृहाला नमन करतो. कला आणि क्रीडा अशी परंपरा एकत्र या ठिकाणी नांदत होती. येथील कुस्तीच्या मैदानात नामवंत मल्लांनी कुस्ती गाजवली. अशा कुस्तीच्या मैदानातील व्यासपीठ आणि नाट्यगृह आगीत गुरुवारी रात्री भस्मसात झाले.

प्रत्येक कलासक्त व्यक्तींच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला, तर अनेकांच्या मनात याच्यासंबंधी अनेक आठवणींचे नुसते काहूर मनात माजले. संस्थान विलिनीकरणानंतर सरकारने हे नाट्यगृह विक्रीस काढले गेले. त्या धोरणाविरुद्ध ‘करवीर नाट्य मंडळा’ने तसेच ना. सी. फडके, चिंतामणराव कोल्हटकर, मामा वरेरकर, बाबूराव जोशी अशा अनेकांनी आवाज उठवला. त्याला यश आले.

१९७९ पर्यंत हे नाट्यगृह शासनाच्या ताब्यात होते. त्यानंतर ते महापालिकेकडे आले. वास्तविक आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यातच पाण्याची टाकी बांधण्याचे ठरविले होते, परंतु ती टाकी अस्तित्वात आली नाही. ती असती तर रात्री आग आटोक्यात आणताना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली नसती आणि लवकर नियंत्रण मिळवता आले असते.

लोकांच्या इच्छेचा तत्काळ आदर करण्याची येथील प्रशासकीय यंत्रणेला सवय नाही. आपला नष्ट झालेला मूल्यवान वारसा नव्याने उभा केला पाहिजे. सध्या राजर्षी शाहूंचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यांच्या नावाचा आदर्श घेऊन काम करणाऱ्या धोरणकर्त्यांनी आता तरी आपले गट-तट, हेवेदावे, मतभेद बाजूला फेकून देऊन हा वारसा पुन्हा उभा करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजनाची गरज आहे. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ, शालिनी पॅलेस इतिहासजमा झाले. त्यांच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत. तसे होऊ न देण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.