अग्रलेख : विमानतळावरील‘दशावतारी’ खेळ

कोकणातील विमानतळाच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फड रंगवणे हा एक औचित्यभंग ठरेल, याचेही भान नेत्यांना राहिले नाही. त्यामुळे विकासप्रकल्प आणि आनुषंगिक प्रश्नांना बगल दिली गेली.
uddhav thackeray narayan rane
uddhav thackeray narayan ranesakal News
Updated on

कोकणातील विमानतळाच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फड रंगवणे हा एक औचित्यभंग ठरेल, याचेही भान नेत्यांना राहिले नाही. त्यामुळे विकासप्रकल्प आणि आनुषंगिक प्रश्नांना बगल दिली गेली.

अखेर एकदाचे कोकणात कणकवलीजवळच्या चिपी गावात विमान उतरले आणि त्या निमित्ताने एक जंगी सोहळाही पार पडला; पण आपल्याला त्याचवेळी आणि त्याच विमानतळावर थेट दशावतारी खेळ बघायला मिळेल, याची कल्पना अगदी बेरक्यातल्या बेरक्या कोकणी माणसालाही आली नसणार! स्वातंत्र्यानंतर जेथे साधी धुरांच्या रेषा हवेत काढणारी आगीनगाडी यायलाच पाच-सहा दशकं उलटावी लागली, तेथे मग अधांतरी उडणारे विमान येऊन उतरायला लागणारा इतका विलंब होणे, साहजिकच म्हणावे लागणार.

मात्र, उद्‍घाटनाच्या या कार्यक्रमात थेट पारावरच्या गजाली रंगणे आणि सवालजवाबांचा कलगीतुरा झडणे, हे पूर्णपणे औचित्यभंग करणारे आहे, याचे भान उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोन आजी-माजी मुख्यमंत्र्यांनाही उरले नाही. ‘आपण या सोहळ्यात राजकारण आणू इच्छित नाही!’ असे सांगत या दोघांनीही हा एका मोठ्या प्रकल्पाविषयीचा आणि केंद्र सरकारने आयोजित केलेला कार्यक्रम आहे, हे विसरून थेट राजकीय भाषणे केली. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कसे टोकाचे वैमनस्य निर्माण झाले आहे, हेच अवघ्या महाराष्ट्राबरोबर देशाच्या राजधानीत बसून या सोहळ्यात सहभागी झालेले नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही बघावे लागले. एक मात्र खरे की कलगीतुऱ्याचा हा फड जिंकला तो उद्धव यांनीच! त्यामुळेच आता केंद्रीय मंत्री राणे यांनी एक धडा मात्र कायमचा लक्षात ठेवला असणार आणि तो म्हणजे आपल्यानंतर ज्या कोणाचे भाषण असेल, त्याची कुरापत कधीही काढू नये! अर्थात, उद्धव ठाकरे यांचाच शब्द वापरून सांगायचे झाले तर राणे यांनी जी काही ‘मळमळ’ व्यक्त केली, त्यास काही कारणे जरूर आहेत.

सिंधुदुर्ग आणि तळकोकणात वीज, पाणी, रस्ते अशा काही किमान पायाभूत सेवांच्या कामांना जो काही वेग आला, तो मुंबईच्या चेंबूर परिसरात काम करणाऱ्या राणे यांना १९९०मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी तेथून विधानसभेवर धाडल्यानंतरच. पुढे शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांची सत्ता आल्यावर राणे प्रथम महसूलमंत्री झाले आणि मग अल्प काळासाठी मुख्यमंत्रीही झाले. मात्र, शिवसेनेची सूत्रे दोन दशकांपूर्वीच पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यापासून, राणे यांना आपल्याला एक राजकीय प्रतिस्पर्धी आणि तोही शिवसेनेतच उभा राहिल्याचे सतत वाटत राहिले. त्याचीच परिणती मग राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी होण्यात झाली. तो सगळा विखार दोघांच्याही भाषणातून समोर आला आणि कार्यक्रमाला चांगलेच ठसठशीत म्हणता येईल, असे गालबोट लागले. खरे तर राणे यांचे भाषण सुरू होईपर्यंत हा कार्यक्रम अत्यंत सुटसुटीत तसेच छोटेखानी भाषणांनी रंगत गेला होता.

लंबीचवडी भाषणे करणारे नेते यावेळी अवघ्या दोन-पाच मिनिटांत कोकणवासीयांना शुभेच्छा देऊन माईक दुसऱ्याकडे सोपवत होते. मात्र, राणे यांनी गेल्या दोन-अडीच दशकांचा इतिहास उगाळायला सुरुवात केली आणि कोकणातील नाणार असो की जैतापूर असो की चिपी विमानतळ असो; या विकास प्रकल्पांना विरोध करणारेच या व्यासपीठावर आहेत, असे सांगत कुरापती काढायला आरंभ केला. कोकणात आणि विशेषत: सिंधुदुर्ग परिसरात जे काही घडले, त्या सर्वांचे श्रेय आपले एकट्याचेच आहे, असा राणे सूर राणे यांनी लावला तेव्हाच उद्धव ठाकरे त्यांना सणसणीत प्रत्युत्तर देणार, याची कल्पना सर्वांनाच आली होती. या परिसरात अनेक विकास कामांचे श्रेय राणे हे स्वत:कडेच असल्याचे सांगत असतील, तर मग या चिपी विमानतळासाठी जमिनी देणाऱ्यांना जो काही कवडीमोल भाव देण्यात आला, त्याचेही ‘श्रेय’ त्यांचेच आहे, असे म्हणावे लागते. त्यासंदर्भात वेळोवेळी आंदोलने होऊनही राणे यांनी त्याबाबत कधी काही आवाज उठवल्याचे दिसत नाही. शिवसेनेने त्यासाठी आंदोलनही केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात काही बोलायला हरकत नव्हती. शिवाय राजकीय सभ्यता, शिष्टाचाराच्या बाबतीत आपली उंची दाखविण्याची संधी ठाकरे यांना होती, पण त्यांनी ती साधली नाही. त्याऐवजी तेही सवाल-जवाबाच्या खेळातच रंगून गेले.

एक मात्र खरे! सारे ‘श्रेय’ फक्त आपलेच, असे तुणतुणे लावणाऱ्या राणे यांना उद्धव ठाकरे यांनी लगावलेला टोला सणसणीत म्हणावा असा होता. ‘सिंधुदुर्ग किल्ला हा माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शिवरायांनी बांधला होता... नाही तर कोणी म्हणेल की तोही मीच बांधला!’ हा त्यांचा षटकार राणे यांची ‘मळमळ’ थेट ‘रनवे’च्या पलीकडे फेकून देणारा होता. मात्र, या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात मग सारेच प्रश्न मागे पडले. केवळ विमानतळ सुरू करून नेमके काय साध्य होणार, विमानतळापासून मालवण, वेंगुर्ला, तारकर्लीसारख्या भागात जायला उत्तम रस्ते तसेच योग्य वाहतूक सेवा कशी उपलब्ध होणार, आदी महत्त्वाच्या बाबींना मग कोणीच स्पर्श केला नाही.

अगदी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही. तेही पार इतिहासातील गोष्टींची आठवण काढण्यात रमलेले दिसले. त्यामुळे कोकणात विमान जरूर उतरले आणि आता गोव्यात एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असतानाही, तेथून हाकेच्या अंतरावरील चिपी हाही आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला पाहिजे, या पलीकडे मुख्यमंत्र्यांचेही भाषण गेले नाही. ‘विकासा’च्या राजकारणापेक्षा आपल्या राजकारणाच्या ‘विकासा’तच जास्त स्वारस्य असल्याचे नेत्यांनी दाखवून दिले. अर्थात, कार्यक्रमात जे काही झाले ते सारे कोकणी माणसाच्या वितंडवादाला शोभेसेच झाले आणि जनतेची घटकाभर का होईना करमणूकही झाली, एवढेच काय ते या सोहळ्याचे फलित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.