अग्रलेख : घबराट निर्देशांक!

लोभ, मोह, भीती अशा भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या भांडवली बाजारच्या निर्देशांकातील बदलांची प्रत्येकवेळी गांभीर्याने दखल घ्यायलाच पाहिजे, असे नसते.
Share Market
Share Marketsakal
Updated on

आपण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करीत असू, तर काही आकस्मिक घडामोडींमुळे हडबडून जाण्याचे कारण नाही.

लोभ, मोह, भीती अशा भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या भांडवली बाजारच्या निर्देशांकातील बदलांची प्रत्येकवेळी गांभीर्याने दखल घ्यायलाच पाहिजे, असे नसते. याचे कारण तो झोका जसा खाली जातो, तेवढ्याच चटकन वरही जातो. परंतु गेल्या तीन-चार दिवसांत विविध देशांच्या शेअर बाजारात जे काही कमी-जास्त रिश्टर स्केलचे धरणीकंप जाणवले, त्याची नोंद घ्यावी लागेल.

परिस्थितीला योग्य प्रतिसाद दिला जात असेल तर काळजी करण्याचे कारण नसते; परंतु अवाजवी प्रतिक्रिया नुकसानास कारणीभूत ठरते. आपल्याकडे नव्याने मध्यमवर्गातील अनेक व्यक्ती बचत, गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गांकडून शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा तुलनेने जोखमीच्या क्षेत्राकडे वळत आहेत. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार डि-मॅट खाते उघडलेल्या खातेदारांची संख्या सोळा कोटींहून अधिक झाली आहे. या स्थित्यंतराच्या काळात त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, हे पाहायला हवे.

जागतिकीकरणामुळे सर्वच अर्थव्यवस्था कमी-अधिक प्रमाणात एकमेकांशी जोडल्या गेल्या असल्याने एका ठिकाणच्या घटनेचा संसर्ग जगभर पसरायला वेळ लागत नाही. त्यातही केंद्रबिंदू अमेरिकेसारख्या देशात असेल तर हा परिणाम आणखी गडद होतो. गेले काही दिवस अमेरिकेत मंदीची चर्चा सुरू आहे. त्यातच तिथल्या नोकरभरतीविषयी अमेरिकी सरकारच्या जुलैच्या आकडेवारीने खळबळ माजवली.

जूनमध्ये अमेरिकेतील बेरोजगारीचा दर ४.१ टक्के होता, तो वाढून ४.३ टक्क्यांवर पोचला. पुढच्या काळातील अरिष्टाची ही चिन्हे असल्याच्या चर्चेने तेथील शेअर बाजाराला हादरा बसला. त्यातच तेथे निवडणुकीचे वातावरण तापू लागले असल्याने त्या धगीची भर पडली.

मग काळजीचे भयात रूपांतर झाले. त्यातच जपानने व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत येनचे मूल्य वाढले. इतके दिवस जपानमध्ये व्याजदर शून्य होता. तेथील मध्यवर्ती बॅंकेच्या निर्णयामुळे आधीची सगळी गणिते बदलली.

जपान, कोरिया आणि तैवान येथील शेअर बाजारांचे निर्देशांक धडाधड आपटी खाऊ लागले. हा घटनाक्रम आणि पश्चिम आशियातील इस्राईल आणि इराण यांच्यातील तीव्र होत चाललेला संघर्ष या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपल्या शेअर बाजार निर्देशांकालाही फटका बसला. दोन हजारांहून अधिक अंकांनी तो कोसळला. प्रसारमाध्यमांनी ‘दहा लाख कोटी बुडाले’ या पद्धतीच्या बातम्या द्यायला सुरुवात केल्याने घाईघाईने आणखी विक्री झाली.

झाडाचे एक पान अंगावर पडल्याने सशाला वाटले आकाशच पडले. तो पळू लागला. मग त्याचे पाहून इतरही पळू लागले. बऱ्याचदा शेअर बाजारातील प्रतिक्रिया ही ‘आकाश पडले, पळा पळा’ या गोष्टीतल्यासारखी असते. त्याचा अर्थव्यवस्थेच्या पायाभूत घटकांशी संबंध असतोच असे नाही. त्यामुळेच ज्या घटनाक्रमामुळे हा सगळा परिणाम आपल्याकडे झाला तो दुर्लक्षणीय नसला तरी घबराट माजण्याइतकाही नाही, याचे भान ठेवले पहिजे.

भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा निकष असायला हवा. दोन हजार अंकांनी शेअर बाजार कोसळला ही बातमी निर्देशांक वीस हजार असताना घबराट माजवणारी ठरली तर समजू शकते. आता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ऐंशी हजारावर गेला असल्याने ही घसरण दोन टक्के आहे. त्यामुळे ती संख्या टक्केवारीतच लक्षात घ्यायला हवी. पश्चिम आशियातील स्थिती तणावपूर्ण आहे यात शंका नाही.

परंतु शेअर बाजार तेजीत असतानाही ‘हमास’च्या घातपाती कारवाया सुरूच होत्या, इस्राईलचे पंतप्रधान नेत्यानाहू कधीच शांतिपाठ म्हणत नव्हते आणि अरब जगतातील खदखद शमलेली नव्हती. पण जेव्हा वेगवेगळ्या जागतिक घटनांचा परिणाम एकत्रित विचारात घेतला जातो, तेव्हा भीतीचा गुणाकार होतो. तसे ते झाले आहे.

या सगळ्या विवेचनाचा अर्थ सावधगिरी बाळगू नये, असा अजिबात नाही. पण जर आपण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करीत असू, तर अशा बातम्यांमुळे एकदम हडबडून, गडबडून जायचे नसते, हा धडा यानिमित्ताने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी घ्यायला हवा. तेजीच्या ज्या टप्प्यावर इथला मुंबई शेअर बाजार (८० हजार) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (२५ हजार) आहे, त्या टप्प्यावर ‘करेक्शन’ होणे स्वाभाविकच होते आणि आवश्यकही.

ते पुढचाही काही काळ चालू राहू शकते. तरीही धक्का बसायला नको. एका लांबच्या मुक्कामापर्यंत जाताना वाटेत येणारे अडथळे हेही प्रवासाचा अटळ भाग असतात. या दृष्टिकोनातून या पडझडीकडे पाहणेच श्रेयस्कर. अखेर महत्त्वाची असते ती अर्थव्यवस्था. ती कशी जास्तीत जास्त सुदृढ बनेल, यावर लक्ष केंद्रित करणे हे देशासाठी आणि सर्वच नागरिकांसाठीही महत्त्वाचे असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.