सत्तेचा झुला कधी खाली येतो, तर कधी वर तरंगतो. वर असताना जमिनीचे भान तुटले की संपले. मतदारांनी दिलेले हे धडे महत्त्वाचे आहेत.
प्रत्येक निवडणूक काही ना काही धडे देत असते. प्रश्न असतो, तो त्यापासून शिकण्याचा. महाराष्ट्राच्या निवडणुकीतून सर्वसामान्य मतदारांनी दिलेल्या अशा धड्यांची त्यामुळेच चर्चा व्हायला हवी. सत्ता विनयेन शोभते, हा त्यापैकीच एक. जेव्हाजेव्हा राजकीय नेते आपल्याच नादात राहून मतदारांना गृहीत धरायला लागतात, तेव्हा त्यांना त्यांची जागा मतदार दाखवित असतात.