देशाच्या राजकारणात महाराष्ट्र बंडखोर म्हणून ओळखला जातो. मात्र ही बंडखोरी विचारांची, तत्त्वांची आणि अस्मितेसाठीची होती. याच बंडखोरीनं आता सत्ता, पद आणि पैसा यांच्या लालसेचं रूप घेतले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रानं अनेक राजकीय भूकंप जवळून अनुभवले आहेत. उद्धव ठाकरे यांनी युतीतून बाहेर पडून मांडलेली वेगळी चूल असो किंवा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेली बंडखोरी...यंदाच्या निवडणुकीत प्रायोजित बंडखोरीलाही ऊत आला आहे. लोकशाहीत हे गृहितच आहे. आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी काही जण लढाऊपणाचा मार्ग अवलंबतात.