अग्रलेख : धोक्याची ‘नीट’ घंटा...

‘नीट’सारख्या परीक्षा गैरप्रकारातून विद्यार्थी वैद्यकीय पदवी मिळवतीलही; मात्र ते भविष्यात आपली जबाबदारी नीट पार पाडू शकतील का?
NEET EXAM
NEET EXAMesakal
Updated on

‘नीट’सारख्या परीक्षा गैरप्रकारातून विद्यार्थी वैद्यकीय पदवी मिळवतीलही; मात्र ते भविष्यात आपली जबाबदारी नीट पार पाडू शकतील का? एका भ्रष्ट प्रकारातून पुढे भ्रष्टाचाराची साखळी निर्माण होण्याचा धोकाही संभवतो.

प्रवेश परीक्षा गुणवत्तेला संधी देण्यासाठी की शिक्षणाच्या बाजारात प्रवेश मिळवून देण्यासाठी घेतल्या जातात, याची चिंता वाटावी अशी सध्याची स्थिती आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील (नीट) गैरप्रकाराने ही चिंता आणखी वाढवली आहे. अशा प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा हा केवळ शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित विषय राहिलेला नाही, तर तो सामाजिक स्वास्थ्याशी निगडित बनला आहे.

विद्यार्थी, त्यांचे पालक, कुटुंबीय, नातेवाईक अशा अनेकांच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. इतक्या महत्त्वाच्या परीक्षेतील गैरप्रकारामुळे शैक्षणिक गुणवत्ता मिळविण्यासाठी रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित घटकाच्या भावनांशी खेळ केला जातो. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांना वाढीव (ग्रेस) गुण दिल्याचा आरोप करण्यात आला.

अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले, याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता सारवासारव म्हणून केंद्रीय शिक्षण विभागाने वाढीव गुणांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. मात्र या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, हे खरे.

‘नीट’ हा वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धात्मक मार्ग आहे. त्यात विद्यार्थ्यांचे ज्ञान, बौद्धिक क्षमता आदी गुण जोखले जातात. त्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. देशभरात महत्त्वाच्या मानलेल्या या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा प्रकार परीक्षेच्या पारदर्शकतेला धक्का देणारा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला तडा देणारा ठरू शकतो.

वाढीव गुण देण्याचे मुख्य कारण परीक्षेतील काही तांत्रिक त्रुटी, प्रश्नांची काठिण्य पातळी किंवा उत्तरपत्रिकेतील चुका असू शकतात. परंतु, याचा अर्थ असा नाही, की विद्यार्थ्यांना या त्रुटींचा लाभ मिळावा. या बाबी अभ्यासासाठी परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरतात. जे विद्यार्थी कठोर परिश्रम करून उच्च गुण मिळवतात, त्यांची मेहनत यामुळे निष्फळ ठरू शकते. त्यांना निराशेच्या गर्तेतही लोटू शकते.

परीक्षेत गैरप्रकार करून प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची क्षमता आणि ज्ञानावर विश्वास ठेवायचा कसा? या गैरप्रकारातून विद्यार्थी वैद्यकीय पदवी मिळवतीलही. मात्र, ते भविष्यात आपली जबाबदारी नीट पार पाडू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. एका भ्रष्ट प्रकारातून पुढे भ्रष्टाचाराची साखळी निर्माण होण्याचा धोकाही संभवतो.

तमिळनाडू आणि बिहारसारख्या राज्यांत या प्रश्नावर मोठी विद्यार्थी आंदोलने झाली आणि महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही त्याचे लोण पसरले. याची दखल घेत ‘नीट’ परीक्षा पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले.

यावर उपाय म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि उच्च गुणवत्ता राखणे ही आताच्या काळाची गरज आहे. यासाठी परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा गरजेची आहे. परीक्षेत तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच प्रश्नपत्रिकांची काळजीपूर्वक रचना आणि उत्तरपत्रिकांचे काटेकोरपणे मूल्यांकन करावे लागेल. खरेतर शिक्षणाच्या बाजारात हे मोठे आव्हानच आहे.

परंतु त्याला मात द्यावीच लागेल. त्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत, तर लोकांचा या परीक्षा व्यवस्थेवरील विश्‍वास उडून जाईल. शिक्षण व्यवस्थेत अशा अपप्रवृत्ती फोफावणार असतील आणि अर्धवट ज्ञान असलेले डॉक्टर, इंजिनिअर तयार होणार असतील, तर यातून मोठे सामाजिक प्रश्न निर्माण होतील. रुग्णसेवेत समस्या निर्माण होतील. त्यातून लोकांचा वैद्यकीय क्षेत्रावरील विश्‍वास कमी होऊ शकतो.

जगात भारतातील शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होऊ शकते. आजही आपल्याकडील वैद्यकीय शिक्षण महाग असल्याने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च गुणवत्ता राखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. एखादा कायदा करून या गोष्टी सुधारणार नाहीत. कायद्याबरोबर पळवाटाही येतात. त्याला पायबंद घालणारी व्यवस्थाही निर्माण करावी लागेल.

हे गैरप्रकार का घडतात, ते पालक आणि विद्यार्थ्यांना का करावेसे वाटतात, याचे विवेचन तज्ज्ञांनी करावे आणि सरकारला सूचना कराव्यात. या प्रकारामुळे प्रकाशझोतात आलेली आणखी एक बाब म्हणजे शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर चालणारी समांतर शिक्षण व्यवस्था. देशभरात तिची हजारो कोटी रुपयांची समांतर अर्थव्यवस्थाही निर्माण झाली आहे.

ती जगवण्यासाठी सरकारी यंत्रणा हातभार लावत असतील, तर सामान्य माणसांचे योग्य उपचाराअभावी मरण अटळ आहे. म्हणूनच ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार ही धोक्याची घंटा आहे. तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला लागलेल्या काट्याचा नायटा व्हायला वेळ लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.