मुस्लिम समाज पुन्हा राजकीय प्रवाहाकडे!

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या नेत्रदिपक यशामुळे उपयोजिले नसून, त्याला सध्याच्या राजकीय घडामोडींचे संदर्भदेखील आहेत.
Shekhar Gupta writes about Muslim society again in political flow
Shekhar Gupta writes about Muslim society again in political flowsakal
Updated on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववाद्यांची बहुतांश उद्दिष्ट्ये आता साध्य झाली आहेत. त्यामुळे त्यांना आता २०२४ च्या मध्यापर्यंत तरी सामाजिक शांतता हवी आहे. त्यामुळेच सध्या एकप्रकारची सौहार्दता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या आठवड्याच्या लेखाचे शीर्षक हे केवळ शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या नेत्रदिपक यशामुळे उपयोजिले नसून, त्याला सध्याच्या राजकीय घडामोडींचे संदर्भदेखील आहेत. हे संदर्भ जोडण्याचा आपण प्रयत्न करू या.

सर्वप्रथम म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना चित्रपटावरून अनावश्यक बोलणे टाळण्याच्या दिलेल्या सूचनांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी थेट मुस्लिमांचा उल्लेख केलेला नसले तरी हिंदीत एक म्हण आहे की, ‘अकलमंद को इशारा काफी हैं’ त्याप्रमाणे ही त्यांची सूचना पुरेशी आहे.

दुसरा म्हणजे, त्यांनी भाजप नेत्यांना मुस्लिम समाजाच्या विविध गटापर्यंत, जसे की बोहरा आणि पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याची, त्यांच्याशी संपर्क साधायची गरज असल्याचे सांगितले आहे. बोहरा समाज हा गुजरातशी जोडला गेलेला आहे, तर पसमांदा हा मुस्लिम समाजातील मागासवर्गीय समजला जाणारा वर्ग असून त्यांची लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या जवळपास ८५ टक्के आहे.

संघाच्या आणि भाजपच्या नेतृत्वाची अशी धारणा आहे की मुस्लिमांमधील उच्चवर्गीय म्हणजे अश्रफ हे त्यांना विरोध करणारे आहेत. त्यामुळे पसमांदा आणि बोहरा यांसारख्या मुस्लिम समाजातील गटाला कुरवाळून मुस्लिमांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या आधारावर विभाजन करणे शक्य आहे. ज्याप्रमाणे धर्मनिरपेध पक्ष जातीच्या समीकरणांच्या आधारे हिंदूंमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करतात तसाच काहीसा हा प्रकार आहे.

सौहार्दतेचे प्रयत्न

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नेत्यांना ख्रिश्चनांशी संवाद वाढवायला सांगणे किंवा सुफी कार्यक्रमात सहभागी व्हायला सांगणे हा महत्त्वपूर्ण बदल आहे. वास्तविक हा संदेश तर ते कायमच देतात. मात्र यावेळी मोदींनी हा कानमंत्र दिल्यानंतर आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्पसंख्याक खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी अजमेर शरीफ येथील मौलवींकडे दर्ग्यावर वाहण्यासाठी शाल अर्पण केल्याचा फोटो देखील सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला.

आता तुम्ही म्हणाल, की हे सर्व राजकारण आहे. आणि तुमचे म्हणणे बरोबर देखील आहे. परंतु आपण राजकारणाबाबतच तर बोलत आहोत. नरेंद्र मोदींनी हिंदूंच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवली. त्यांना देशातील सुमारे २० कोटी मुस्लिमांची मते मिळवण्याची तितकी आवश्यकता भासलेली नाही.

त्यामुळे मोहन भागवत यांच्या मुस्लिमांबाबतच्या विधानांचा संदर्भ घेत तुम्ही या घटनांचे आकलन करण्याचा प्रयत्न केलात की तुम्हाला समजेल की, सौदार्हता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजासाठी अजून एक बदल राजकीय पटलावर घडवून आणला आहे आणि तो म्हणजे मोदींचे सर्वात मोठे राजकीय विरोधक राहुल गांधी यांनी.

‘आप’ची भूमिका गुलदस्तात

‘द प्रिंट’मधल्या एका लेखात योगेंद्र यादव यांनी असा दावा केला आहे की, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ज्या-ज्या मार्गावरून गेली तेथे शांतता आणि सामाजिक सलोखा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे आपण हे देखील नाकारू शकत नाही की, भारत जोडो यात्रेने मुस्लिमांना ‘सीएए’ विरोधी आंदोलनानंतर असा एक मंच दिला आहे की जेथे मुस्लिम अटक होण्याच्या भितीशिवाय रस्त्यावर उतरून राजकीय कार्यक्रमात सहभागी होऊ शकत आहेत.

विशेष म्हणजे, या यात्रेत राहुल गांधी जे बोलत आहेत त्याचा प्रभाव एका मोठ्या वर्गावर पडत आहे. जरी राहुल यांच्या भाषणातून देशातील मुस्लिमांना ओवेसी यांच्या भाषणातून मिळतो तितका आनंद मिळत नसला तरी, मुस्लिमांना देशातील राजकारणातील मूळ प्रवाहात अद्यापही स्थान आहे, असे आश्वासन नक्कीच मिळत आहे. मोदींना सक्षम पर्याय म्हणून पुढे येऊ पाहणाऱ्या आणि राष्ट्रीय पक्ष बनण्याचे वेध लागलेल्या ‘आप’कडून मात्र अद्याप मुस्लिम समाजाला असे आश्वासक सूर ऐकू आलेले नाहीत.

शाहरुख खानचे धाडस

तिसरा संदर्भ म्हणजे शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचे यश आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे लोकांनी त्याचा साजरा केलेला उत्सव. शहरी भागातील प्रेक्षकांप्रमाणेच ग्रामीण भागातील प्रेक्षकही या चित्रपटाच्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेक्षक या चित्रपटाच्या निमित्ताने एका अप्रसिद्ध मुस्लिम वीरांचे कौतुक करताना त्याचा जयजयकार करताना दिसत आहेत.

याबाबत असा प्रश्न देखील निर्माण होतो की, भारतीय मुस्लिम नायकाऐवजी शाहरुख खानने ‘राज’ किंवा ‘राहुल’ अशी भूमिका रंगवली असती तर काही फरक पडला असता काय? किंवा एखादा अप्रामाणिक इक्बाल किंवा रेहानची भूमिका रंगवली असती तर काय फरक पडला असता? पण तरीही शाहरुख खानने चित्रपटात मुस्लिम नायक रंगविण्याचे धाडस केले आहे.

मत न फुटण्याची खात्री

एकीकडे ‘भारत जोडो’तून राहुल गांधी यांनी दिलेला राजकीय संदेश तर दुसरीकडे शाहरुख खानच्या चित्रपटाला मिळालेले यश हे संदर्भ समजावून घ्यायला हवे. त्याचप्रमाणे मोदी आणि भागवत यांनी त्यांच्या अनुयायांना दिलेला संकेत देखील महत्त्वाचा आहे. भाजप आणि संघाच्या मते राजकीयदृष्ट्या त्यांनी आपला जनाधार मजबूत केला आहे.

हिंदू मतांचे आता विभाजन होणार नाही. किमान २०२४ पर्यंत तर नाहीच नाही अशी त्यांना खात्री आहे. त्यांची बहुतांश उद्दिष्ट्ये देखील साध्य झाली आहेत. सर्व महत्वाच्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि तेथील परिसराचा विकास झाला आहे, किमान असा दावा तरी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. अगदी प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांत देखील विविध राज्यांच्या मंदिरांचे आणि तेथील देवी-देवतांचे देखावे दाखविण्यात आले होते. अगदी जम्मू-काश्मीरच्या चित्ररथात देखील अमरनाथ मंदिर दाखविण्यात आले.

भारताकडे जी-२०चे अध्यक्षपद आलेले असताना आणि त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी त्याद्वारे आपली राजकीय प्रतिमा जागतिक नेता अशी करण्याचा प्रयत्न करत असताना मुस्लिमांना सातत्याने टार्गेट करून आता कोणता लाभ मिळणार आहे?

उलट त्यामुळे होणारे नुकसान, जागतिक धर्मनिरपेक्ष राजकीय विश्लेषकांना उगाच टीकेची संधी देण्याऐवजी आणि दहशतवादी हल्ल्यांना आणि अस्थिरतेला प्रोत्साहन देण्याऐवजी मोदी आणि त्यांच्या पक्षाला सामाजिक शांततेची आणि सौहार्दतेची अधिक गरज आहे. हे अत्यल्प काळासाठीही असू शकेल परंतु हे या बदलाचे तार्किक विश्लेषण म्हणता येईल. या निमित्ताने मुस्लिम समाज हा पुन्हा मुख्य राजकीय प्रवाहाकडे येत आहे, हे मात्र निश्चितच स्वागतार्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.