editorial-articles
अग्रलेख : काठावरचे ‘गणित’
गणित आणि विज्ञानासारख्या अत्यंत मूलभूत आणि खरेतर जीवनावश्यक विषयांची गोडी लागावी यासाठी शैक्षणिक धोरणात प्रयत्न हवेत.
गणित आणि विज्ञानासारख्या अत्यंत मूलभूत आणि खरेतर जीवनावश्यक विषयांची गोडी लागावी यासाठी शैक्षणिक धोरणात प्रयत्न हवेत.
गणित हा विषय अवघड आणि धास्ती निर्माण करणारा असल्याचा समज घट्टपणे अनेकांच्या मनात रुतून बसला आहे. तो दूर करणे ही खरे तर काळाची हाक असताना आपले ‘मायबाप सरकार’ वेगळ्याच दिशेने चालले आहे. गणित म्हटले की ‘सीदन्ती मम गात्राणि’ अशी कुणाची हतबल अवस्था होत असेल तर त्याला प्रयत्नवादी बनवायचे की पळवाटा शोधून देण्याचे काम करायचे? ‘राज्य शैक्षणिक संशोधन आणि परीक्षण परिषदे’ने तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यातील एक तरतूद वाचल्यानंतर कुणाच्याही मनात हे प्रश्न येतीलच. दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञानात ३५ नव्हे तर अगदी २० गुण मिळाले, तरीही अकरावीत प्रवेश घेता येईल, असा बदल आराखड्यात सुचवण्यात आला आहे.