तंत्रज्ञानाचा विकास-विस्तार झाला की व्यवहारसुलभता वाढते, सोईसुविधांचा परीघ रुंदावतो, हे जसे खरे आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारांचेही फावते, याचा प्रत्यय सध्या प्रकर्षाने येत आहे. ‘डिजिटल अटक’ ही नवी संज्ञा सध्या चर्चेत आहे. वास्तविक डिजिटल अटक नावाची कुठलीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पोलिसी कारवाई अस्तित्वातच नाही. सायबर गुन्हेगारांनी हा काल्पनिक प्रकार ‘व्यवहारा’त आणला आहे. अशा गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर लोकांचा नव्या व्यवस्थांवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका आहे.