अग्रलेख
स्त्रियांचे सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समता यासारख्या गोष्टींचा उच्चार करण्यात राजकीय नेते आघाडीवर असतात. त्या दिशेने त्यांनी खरोखर प्रयत्न केले, तर हवेच आहेत. परंतु या मूल्यांचा नेमका अर्थ आणि महत्त्व याबाबतच त्यांच्या मनात वैचारिक गोंधळ असेल तर काळजी करावी, अशी स्थिती निर्माण होते. उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या एका शिफारशीमुळे ही भीती गडद झाली आहे. पुरुष टेलरनी कपडे शिवण्यासाठी स्त्रियांची मापे घेऊ नयेत, अशा प्रकारचा निर्बंध आणण्याची सूचना या आयोगाने केली आहे. ही सूचना ऐकल्यावर कोणालाही अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारने दीड वर्षांपूर्वी काढलेल्या आदेशाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.