अग्रलेख : निमित्तापुरता यजमान!

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० इतिहासजमा झाले आणि त्याबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘भारत-पाकिस्तान’ असा सलगतेने उल्लेख करणारे संयोगचिन्हही गळून पडले.
Jammu Kashmir Election
Jammu Kashmir Electionsakal
Updated on

दोन शेजारी देशांतील चर्चेची दारे बंद होणे ही चांगली गोष्टी नाही; परंतु कोंडी फुटण्यासाठी पाकिस्तानला बदलावे लागेल.

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० इतिहासजमा झाले आणि त्याबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘भारत-पाकिस्तान’ असा सलगतेने उल्लेख करणारे संयोगचिन्हही गळून पडले. संयुक्त राष्ट्रांत काश्मीर आमचेच असल्याचे पाकिस्तानने कितीही तुणतुणे वाजवले तरी त्याची आता कोणी गंभीरपणे दखल घेत नाही.

बदललेल्या वातावरण जम्मू-काश्मीरमधील निवडणुका उधळून लावण्यासाठी पाकिस्तानने सीमेपलीकडून मोठ्या संख्येने दहशतवादी घुसविले. तोही प्रयत्न फसला. विधानसभा निवडणुकीत जनतेने विक्रमी मतदान करून पाकिस्तानला आणि फुटीरवाद्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.

अर्थकारण, परराष्ट्रधोरण, कूटनीती अशा सर्व आघाड्यांवर मागे टाकून भारताने पाकिस्तानला पार संदर्भहीन करून टाकले आहे. भारताच्या दृष्टीने ‘शेजारचा कुरापतखोर देश’ एवढेच पाकिस्तानचे स्थान उरले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानला झटकून टाकत त्याची जागा दाखवून देण्याचे कर्तव्य पार पाडल्यानंतर इस्लामाबादमध्ये होऊ घातलेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर जाणार आहेत.

उभय देशांतील संबंध नऊ वर्षांपासून दुरावलेलेच आहेत. पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला पाहणीसाठी दिलेले निमंत्रण आणि इस्लामाबादमध्ये नवाझ शरीफ यांच्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला दिलेल्या आकस्मिक भेटीनंतरही पाकिस्तानचे वर्तन तिरकेच राहिले. मग भारताने कठोर राजनैतिक पवित्रा घेतला.

पाकिस्तानात जाऊन द्विपक्षीय चर्चेला प्राधान्य न देण्याची भूमिका भारताकडून घेण्यात आली, ती या पार्श्वभूमीवर. जयशंकर यांच्या मते भारत आणि पाकिस्तानमधील सर्वात महत्त्वाचा ठरलेला काश्मीरचा विषय आता निकाली निघाला आहे. अन्य प्रलंबित मुद्दे द्विपक्षीय वाटाघाटी करून तातडीने तोडगा काढावे इतके महत्त्वाचे नाहीत.

सहसा अशाप्रकारच्या शिखर परिषदांदरम्यान संबंधित देशांच्या नेत्यांची अनौपचारिकरीत्या का होईना चर्चा होते. पण ती शक्यता भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. चीन, रशिया, पाकिस्तानसह कझाकस्तान, किर्गिजिस्तान, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान या ऊर्जासंपन्न देशांसोबत आर्थिक सहकार्य, व्यापार, गुंतवणूक तसेच सांंस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ‘शांघाय सहकार्य संघटने’तील भारताचा सहभाग अनिवार्य आहे.

या परिषदेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, हा मुद्दा त्यापुढे गौण आहे. गेल्या वर्षी गोव्यातील ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या परिषदेसाठी पाकिस्तानचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी आले होते. या संघटनेत सामील होण्यासाठी इराणही इच्छुक आहे. पश्चिम आशियात इस्राईलशी भिडणाऱ्या इराणविषयी चीन आणि रशिया तसेच यजमान पाकिस्तानसह भारताचीही भूमिका महत्त्वाची ठरेल.

‘शांघाय सहकार्य संघटने’तील सदस्यदेशांमध्येच अनेक मुद्यांवरून मतभेद आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी हे व्यासपीठ कितपत उपयुक्त ठरेल, हा वादाचा मुद्दा आहे. कलम ३७० मोडीत काढल्यापासून पाकिस्तानच्या भारताशी असलेल्या संबंधांत आणखी कटुता निर्माण झाली. संबंध सुरळीत करायचे असतील तर दहशतमुक्त वातावरणनिर्मितीसाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा, अशी पूर्वअट भारताने घातली आहे.

पाकिस्तानातील विचारवंतांच्या मते भारताविरुद्ध अनेक दशकांपासून पुकारलेल्या लष्करी आणि वैचारिक संघर्षामुळे पाकिस्तानचे काहीही भले होणार नाही. अर्थकारणासाठी पाकिस्तानने भारताशी संबंध सुधारण्याची गरज आहे. उभय देशांतील व्यापारसंबंध पूर्वपदावर आल्यास त्याचा फायदा पाकिस्तानलाच होईल. त्यात हवे तर चीननेही सामील होऊन तिन्ही देशांची आर्थिक शक्ती वाढवावी, असा पाकिस्तानातील एक मतप्रवाह आहे.

परंतु पाकिस्तानला भारताच्या अटी आणि शर्तींवर वाटाघाटीसाठी बाध्य करण्यासाठी तूर्त द्विपक्षीय चर्चेला महत्त्व न देण्याचे धोरण भारताच्या जगातील वाढत्या दबदब्याशी सुसंगतच आहे. दोन शेजारी देशातील चर्चेची दारे बंद होणे ही काही चांगली गोष्टी नाही; परंतु ही कोंडी फोडण्यासाठी पाकिस्तानला दहशतवादाला चिथावणी देणे थांबवायला हवे.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या शिखर परिषदेचे आयोजन करणाऱ्या इस्लामाबादच्या रस्त्यांवर त्यांच्या पक्षाच्या समर्थकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलकांना जयशंकर यांनी संबोधित करावे, असे आवाहन इम्रानच्या पक्षातील नेत्यांनी केले आहे. भारताने अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एकंदरीतच तेथील अंतर्कलह विकोपाला गेला आहे.

दिवाळखोरी, वाढती धर्मांधता, राजकीय अस्थैर्य अशी त्या देशाची अवस्था व्हायला तिथली व्यवस्थाच कारणीभूत आहे. जोवर तिथला राजकीय वर्ग याविषयी आत्मपरीक्षण करीत नाहीत, तोवर त्या देशाची घसरण सुरू राहील. शांघाय सहकार्य संघटनेचा ‘एक चांगला सदस्य’ या नात्याने आपण या शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी जात असल्याचे विधान जयशंकर यांनी केले; त्याचबरोबर सर्व बाबतीत भारताशी बरोबरी करण्याचा अट्टहास करणाऱ्या पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.