दमलेल्या क्रिकेटची कहाणी!

Virat Kohli Lead Team India
Virat Kohli Lead Team IndiaT20 World Cup
Updated on

भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे संघाची कामगिरी, त्याची चिकित्सा सुरू झाली आहे. खेळाडूंची निवड आणि कामगिरी, मार्गदर्शकांचे योगदान, ते सलग खेळत राहिल्याने आलेला थकवा अशा अनेक बाजूंनी विचार होत आहे.

जागतिक विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडपुढेही भारताने ज्या पद्धतीने शरणागती पत्करली, ती बघता या देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची दिवाळी कोरोनाचे सावट कमी झाल्यावरही अंधारातच जाणार, असे दिसू लागले आहे. खरे तर गेल्या रविवारी पाकिस्तानपुढे केवळ आपल्या विक्रमवीर फलंदाजांनीच नव्हे तर गोलंदाजांनीही ज्या पद्धतीने नांगी टाकली होती, ते बघितल्यावरच ही ‘दमलेल्या क्रिकेटची कहाणी’ तर नाही ना, असा प्रश्न सर्वांच्या मनात आला होता. गेले चार महिने भारताचा हा जागतिक क्रमवारीत सातत्याने अव्वल ठरणारा संघ मैदानात आहे. इंग्लंडच्या दौऱ्यातील शेवटची कसोटी कोरोनाची ढाल पुढे करून खेळण्यास या संघाने नकार दिला; मात्र नंतरच्या आठवडाभरात ‘आयपीएल’ नामक क्रिकेट स्पर्धेचे उर्वरित सामने जोषात सुरू झाले. त्यानंतर लगेचच विश्वकरंडकाचे आव्हान सामोरे आले. त्यामुळे अतिक्रिकेटमुळे आलेल्या थकव्यापोटी तर ही हार पदरी आली नाही ना, अशीही चर्चा सुरू झ्राली. अर्थात, त्यामुळेच खेळ म्हटले की हार-जीत असा मामला असणार, असे फुकाचे समाधान करून घेणेही सुरू झाले. मात्र, पाकिस्तानविरुद्ध पदरी आलेला पराभव हा साधासुधा नव्हता. विराट कोहली वगळता आपल्या सर्वच फलंदाजांनी पाक गोलंदाजांपुढे हार मानली होती. मग आपण ठेवलेले अल्प-स्वल्प लक्ष्य पाक फलंदाजांनी एकही गडी बाद होऊ न देता सर केले! त्यामुळे अंतिम चार अव्वल संघात प्रवेश मिळवण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यास न भूतो न भविष्यती असे महत्त्व आले होते. मात्र गेल्या रविवारी जे घडले, त्याचीच पुनरावृत्ती या रविवारीही झाली. दिवाळीपूर्वीच भारतीय क्रिकेटच्या कामगिरीचे निघालेले दिवाळे बघणे क्रिकेटप्रेमींच्या नशिबी तर आलेच; शिवाय कर्णधार विराट, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि खास या स्पर्धेसाठी मुक्रर केलेला मेन्टॉर महेंद्रसिंह धोनी यांच्या डावपेचांबाबत शंका येऊ लागली. अर्थात, अजूनही आपले या स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे संपलेले नाही. कदाचित आपण अंतिम चार संघांत जाऊ शकतो. पण त्यासाठी अफगाणिस्तानला न्यूझीलंडला पराभूत करण्याचे कर्तृत्व दाखवावे लागणार आहे. शिवाय आपल्याला आपले उर्वरित सामने हे फार मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तान तसेच न्यूझीलंड विरोधातील आपली कामगिरी बघता, हे आता केवळ अशक्यप्राय दिसते.

मात्र, ही खरोखरच दमलेल्या क्रिकेटची कहाणी आहे काय? तर या प्रश्नाचे उत्तर होय आणि नाही, असे दोन्हीही पद्धतीने द्यावे लागेल. भारतीय संघ गेले चार-सहा महिने सतत मैदानात आहे, हे वास्तव असले तरी त्यांना आपल्या घरीही मिळणार नाहीत अशा पंचातारांकित सुविधा मिळालेल्या आहेत. त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहेत. त्यांना मिळणारे मानधनही कोटींच्या घरात आहे. मग हे क्रिकेटपटू खरंच दमलेले आहेत की आपले डावपेचच चुकत गेले आहेत? पाकने मैदान दाखवल्यानंतर न्यूझीलंडविरोधातील सामना हाच एका अर्थाने आपल्यासाठी अंतिम सामना होता. मात्र, आपण त्यात आपली जमलेली रोहित शर्मा तसेच के. एल. राहुल ही हुकमी आघाडीची जोडी फोडली. हार्दिक पंड्यासारखा खेळाडू पाकविरोधात अयशस्वी ठरल्यावरही त्यास पुन्हा एकदा संधी दिली आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे वरुण चक्रवर्तीस संघात तर ठेवलेच; शिवाय त्यास पहिली मोलाची षटके मनमुराद टाकू दिली. मग हे नेतृत्वाचे अपयश म्हणायचे का? की, विराट, शास्त्री आणि धोनी असे तीन नेते झाल्यामुळे हा विसंवाद निर्माण झाला? की, गेले चार महिने कोरोनामुळे ‘बबल’मध्ये राहावे लागल्याने हा सारा गुंता उभा ठाकला? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आता कोण देणार आणि याचा जाब तरी कोणास विचारणार? विराट या स्पर्धेनंतर कर्णधारपदाची धुरा आपल्या खांद्यावरून खाली ठेवणार आहे; तर शास्त्रींची प्रशिक्षकपदाची मुदतही संपली आहे. त्यामुळेच तर ही निर्नायकी अवस्था झाली नाही ना? प्रश्न अनेक आहेत आणि त्यांची उत्तरे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शोधून काढावी लागतील आणि नव्या दमाने पुढील क्रिकेट हंगामासाठी सज्ज व्हावे लागेल.

त्यातच पाकविरोधात पदरी आलेल्या पराभवानंतर काही कुपमंडूक वृत्तीच्या नेटकऱ्यांनी महमद शमी या आपल्या गोलंदाजास लक्ष्य केले होते. सुदैवाने विराटने ठामपणे त्याची बाजू घेतली आणि संपूर्ण संघ शमीच्या बाजूने उभा असल्याची ग्वाही सध्या काही हितसंबंधी लोक निर्माण करू पाहत असलेल्या विखारी वातावरणातही दिली. त्याबद्दल विराटचे अभिनंदनच करायला हवे. या मैदानाबाहेरील वातावरणाचाही मग या दमलेल्या क्रिकेटपटूंची मनस्थिती बिघडण्यास परिणाम होऊ शकतो. पण, क्षुद्र राजकारणापोटी त्याची पर्वा आहे कोणाला? या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटचा आवाज बुलंद राखायचा असेल तर क्रिकेट नियामक मंडळातील धुरीणांना अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. या दोन पराभवांमुळे दमलेल्या आणि खचलेल्या वीरांना धीर देणे, ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. त्यांची खिल्ली उडवत राहणे, हे भारतीय क्रिकेटला अधिकच गर्तेत घेऊन जाऊ शकते. आपले क्रिकेटपटू असे अनेक पराभव पचवून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.