वनस्पतींच्या विविधतेवर परिणाम

हवामानबदल, तापमानवाढ असे शब्द ऐकले की त्याचा संबंध आपण तीव्र उन्हाळा, अवकाळी पाऊस, पीक उत्पादनावर परिणाम, त्यांचे अर्थव्यवस्थेवर पडसाद यांच्याशी जोडतो. पण हे झाले थेट आणि दृश्य परिणाम.
वनस्पतींच्या विविधतेवर परिणाम
वनस्पतींच्या विविधतेवर परिणाम sakal
Updated on

हवामानबदल, तापमानवाढ असे शब्द ऐकले की त्याचा संबंध आपण तीव्र उन्हाळा, अवकाळी पाऊस, पीक उत्पादनावर परिणाम, त्यांचे अर्थव्यवस्थेवर पडसाद यांच्याशी जोडतो. पण हे झाले थेट आणि दृश्य परिणाम. या व्यतिरिक्त झपाट्याने बदलणाऱ्या हवामानाचा नैसर्गिक परिसंस्थांवर मोठा आघात होत असतो. या लेखमालेतून नैसर्गिक परिसंस्थांवर  होणाऱ्या परिणामांचा आपण  आढावा घेणार आहोत.  

हवामानबदल पृथ्वीला नवीन नाही. साडेचार अब्ज वर्षांच्या इतिहासात अनेक वेळा  हवामानात मोठे बदल झाले आहेत.  मग आज त्याची चर्चा का होत आहे?  आज होत असलेले बदल गेल्या तीनशे वर्षांचे आहेत, तर पृथ्वीच्या इतिहासात झालेले बदल काही कोटी वर्षांच्या कालावधीत होऊन गेले आहेत. एवढ्या मोठ्या कालावधीत सजीवांना  या बदलाशी अनुकूलन करून घेण्याची संधी असते. ज्या प्रजातींना हे जमत नाही, त्या लुप्त होतात. माणूस यात अपवाद म्हणता येईल, कारण सरासरी तापमान १.५ अंश सेल्सियसने वाढले असले तरी तंत्रज्ञानाच्या आधाराने आपल्या प्रजातीला बदलत्या वातावरणात तग धरता येतो. 

गेल्या दशकात हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची वारंवारता आणि तीव्रता वाढत चाललेली आहे. चक्रीवादळ, ढगफुटी, भूस्खलन, कोरडे दुष्काळ अशा अनेक आपत्ती देशभर आणि जगाच्या कानाकोपऱ्यांत हजेरी लावत आहेत. यांचा आघात अर्थव्यवस्थेवर तर होतोच होतो, पण निसर्गावर सुद्धा होतो आहे. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये दोन प्रकारचे घटक असतात - अचेतन किंवा भौतिक घटक आणि सजीव घटक. या दोन्हीत ऊर्जा आणि द्रव्यांची सतत देवाण-घेवाण चालू असते. या विनिमयातून सजीवसृष्टीला पर्यावरणीय सेवा उपलब्ध होतात.

वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण राखणे, भूरुपात कार्बन शोषून ठेवणे, जलचक्राची निर्मिती, भूजल पुनर्भरणा, रोगराईवर नियंत्रण, पूरनियंत्रण, मृदानिर्मिती, परागीभवन, बिया रुजवणे अशा अनेक सेवा सशक्त परिसंस्थेतून सतत मिळत असतात. यातूनच शेतमालाचे उत्पादन होते, समुद्रातून गोडे पाणी मिळते, हवेत प्राणवायूचे  प्रमाण स्थिर राहते. या सेवांमुळे पृथ्वीला सजीवसृष्टी पोसण्याची क्षमता प्राप्त होते, आणि मानवी अर्थव्यवस्था शक्य होते. हवामानबदलाचा तात्काळ परिणाम पर्यावरणीय सेवांच्या घट होण्यामध्ये दिसून येतो.  पण या व्यतिरिक्त पर्यावरणावर अनेक प्रहार होत असतात.

उष्णता वाढली की, मातीतील सूक्ष्मजीवांच्या समुदायांवर त्याचा परिणाम होतो. काही प्रजाती नामशेष होतात, तर काहींची संख्या वाढते. याचा परिणाम मातीच्या सुपीकतेवर आणि वनस्पतींच्या वाढीवर होतो. सूक्ष्मजीवांच्या क्रियाकलापांमध्ये बदल झाला की, मातीची रचना आणि रासायनिक घटक बदलतात आणि कार्बन शोषण, नायट्रोजन, फॉस्फरसचक्रावरही परिणाम होतो.तीव्र उष्णता किंवा अवकाळी पावसाचा कीटकांवर परिणाम होतो. तापमानवाढीमुळे अनेक कीटकांच्या प्रजातींचे जीवनचक्र  बदलले असल्याचे आढळले आहे. काही कीटकांचे प्रजननऋतू लवकर सुरू होत आहेत; तर काहींच्या जीवनचक्राच्या टप्प्यांमध्ये बदल झाले आहेत. यामुळे वनस्पती आणि कीटक यांच्यातील नैसर्गिक संतुलन बिघडत आहे. काही कीटकप्रजाती नवीन क्षेत्रांमध्ये पसरत आहेत, ज्यामुळे स्थानिक वनस्पतींना नवीन किडींचा सामना करावा लागत आहे. 

बिघडणारे संतुलन

तापमानवाढीचे परिणाम वनस्पतींच्या प्रसारावर आणि विविधतेवर दिसू लागले आहेत.  वाढत्या उष्णतेमुळे  काही प्रजाती उंच भागांकडे स्थलांतर करत आहेत. काही प्रजाती नवीन हवामानाशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरत आहेत आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही ‘तगड्या’ म्हणजे स्थानिक नसलेल्या प्रजाती नवीन क्षेत्रांमध्ये आक्रमकपणे पसरत आहेत. या जैविक आक्रमणामुळे स्थानिक प्रजातींना धोका निर्माण होतो आणि अन्न सखळीत बदल होत असतात. यामुळे संपूर्ण जंगल परिसंस्थेचे संतुलन बिघडते. तापमान वाढीचे नैसर्गिक परिसंस्थेवरील परिणाम व्यापक आणि गुंतागुंतीचे आहेत. यांचे पडसाद मानवी आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर आज जरी दिसत नसले तरी येणाऱ्या काळात ते स्पष्टपणे दिसायला लागतील, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.