भाष्य : अण्वस्त्र क्षेपणास्त्राची सुसज्जता

भारताने ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानाद्वारे घेतलेले क्षेपणास्त्र चाचणी प्रगतीचे पाऊल मोठे आहे. आपला आण्विक कार्यक्रम शांततेसाठी असला तरी आव्हानांना तोंड देण्यासाठी शस्त्रसज्जता पाहिजेच.
nuclear missile
nuclear missilesakal
Updated on

भारताने ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानाद्वारे घेतलेले क्षेपणास्त्र चाचणी प्रगतीचे पाऊल मोठे आहे. आपला आण्विक कार्यक्रम शांततेसाठी असला तरी आव्हानांना तोंड देण्यासाठी शस्त्रसज्जता पाहिजेच. त्याबरोबरच चिनी हायपरसोनिकसह येणारी आव्हाने लक्षात घेऊन आणखी नवनवे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी -५’ या क्षेपणास्त्रामध्ये पहिल्यांदाच मल्टिपल इंडिपेंंडन्टली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) या तंत्रज्ञानाचा वापर करत घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ मार्च रोजी दिली. ‘डीआरडीओ’ला मिळालेल्या या यशामुळे भारताच्या अण्वस्त्रसज्जतेला आणि अण्वस्त्र प्रक्षेपक त्रिकूट (न्युक्लिअर त्रायड) यांना अधिक बळ मिळाले आहे.

भारताने सर्वप्रथम १९७४ मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेत आण्विक क्षमता सिद्ध केली. कमालीची गोपनीयता बाळगून घेण्यात आलेल्या या चाचणीला ‘स्मायलिंग बुद्ध’ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर १९९८मध्ये भारताने पाच आण्विक चाचण्या (पोखरण-२) घेतल्या.

मात्र अण्वस्त्रसज्ज देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची विश्वासार्हता वाढविण्यासाठी भारताला अण्वस्त्रनिर्मिती आणि अण्वस्त्रांच्या वापरासाठी विविध अत्याधुनिक प्रणालींची निर्मिती करण्यात प्रावीण्य प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानाचा वापर करत घेण्यात आलेली चाचणी महत्त्वाची. त्यामुळे देशाची अण्वस्त्रप्रतिरोधक (डिटरंट) क्षमताही सिद्ध झाली आहे.

आण्विक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अण्वस्त्रनिर्मितीची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. या प्रक्रियेत कोणत्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करायची आहे, त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची संरचना म्हणजे डिझाईन कसे असायला हवे, त्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे, याबाबतच्या चाचपणीसह अनेक टप्पे असतात. अण्वस्त्रनिर्मिती करत असताना लक्ष्याचा अचूक वेध घेणारी शस्त्रास्त्रयंत्रणा तयार करणे आवश्यक असते.

अण्वस्त्रप्रक्षेपक त्रिकूट

अलीकडील काळातील शस्त्रास्त्रे आकाराने लहान असल्यामुळे त्यांच्या प्रक्षेपणासाठी अथवा वापरासाठी विविध प्रणालींचे पर्याय उपलब्ध होत आहेत. मात्र मुळात अशा प्रकारची शस्त्रास्त्रे ही जमिनीवरून, हवेतून अथवा पाणबुड्यांच्या माध्यमातून प्रक्षेपित करता येतात. यालाच ‘न्यूक्लियर ट्रायड’ किंवा ‘अण्वस्त्र प्रक्षेपक त्रिकूट’ असे म्हणतात.

या तीनही प्रकारांतून अण्वस्त्र प्रक्षेपणाची सज्जता सिद्ध करण्यासाठी प्रमुख तीन गोष्टींची आवश्यकता आहे - स्ट्रॅटेजिक बॉम्बर, लांब पल्ल्याची आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि पाणबुड्यांच्या सहाय्याने प्रक्षेपित करता येणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे. ‘एमआरआयव्ही’ तंत्रज्ञान हे जमिनीवरून मारा करता येणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीशी निगडित असणारे तंत्रज्ञान आहे.

त्याच्या माध्यमातून एकाच क्षेपणास्त्राच्या माध्यमातून एकाचवेळी विविध लक्ष्यांवर शस्त्रांचा मारा करणे शक्य होते. तसे पाहायला गेल्यास हे तंत्रज्ञान सुमारे सहा दशकांपूर्वीचे आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वात पहिल्यांदा वापर अमेरिकेने ‘मिनीटमन-३’ क्षेपणास्त्रात केला होता. यातून पुढे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रप्रणालीमध्ये क्रांती घडली आणि सैन्यदलांचे शस्त्रास्त्रसामर्थ्य व युद्धसज्जता वाढली.

उपलब्ध माहितीनुसार, अमेरिका, ब्रिटन, चीन आणि रशिया हे देश क्षेपणास्त्रामध्ये ‘एमआयआरव्ही’ हे तंत्रज्ञान वापरत आहेत. पाकिस्ताननेही २०१७ मध्ये हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला होता. ‘डीआरडीओ’ने १९ एप्रिल २०१२ रोजी पहिल्यांदा अग्नी-५ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

सुमारे पाच हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. तसेच हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून, त्यामुळे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील कोणत्याही लक्ष्यावर मारा करण्यास ते सक्षम आहे. नुकतीच ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानाचा वापर करत घेण्यात आलेली अग्नी-५ ची चाचणी ही त्याचाच पुढचा टप्पा आहे.

दिव्यास्त्र या प्रकल्पांतर्गत ही चाचणी घेण्यात आली. ‘एमआयआरव्ही’ हे तंत्रज्ञान केवळ एकच अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पारंपरिक क्षेपणास्त्रांऐवजी एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा भेद घेण्यास सक्षम असल्याने शत्रूचा अधिक विनाश करू शकणारे आहे. अग्नी-५ मधील ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानात भारतीय बनावटीची एव्हीओनिक्स प्रणाली आणि सर्वाधिक अचूकता असणारे सेन्सर बसविण्यात आलेले आहेत.

‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राच्या वापरातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे, विविध शस्त्रास्त्र असणाऱ्या सामग्रीचे (पेलोड) पृथ्वीच्या कक्षेत परतणे आणि सर्वाधिक अचूकता दाखवत विविध लक्ष्यांवर शस्त्रांचा अचूक मारा करणे.

कोणावरही आपणहून पहिला हल्ला न करणे हे भारताचे अण्वस्त्रधोरण आहे. त्यामुळे भारत कधीच अणुयुद्ध सुरू करणार नाही. परंतु कोणताही अण्वस्त्र हल्ला परतवून लावण्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी ही चाचणी घेणे आवश्यक होते आणि त्यादृष्टीने विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणेही तितकेच आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. भारताचे हवाई दल हे कोणताही अण्वस्त्र हल्ला परतवून लावण्यासाठी आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आज सुसज्ज आहे. भारताकडे असणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही भारताची अण्वस्त्रसज्जता दर्शवत आहेत.

त्याचप्रमाणे २०१८ पासून सातत्याने तंत्रज्ञान विकसित करून भारताने पाणबुडीच्या सहाय्याने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची क्षमताही सिद्ध केली आहे. ‘आयएनएस अरिहंत‘ने आपली अण्वस्त्रविरोधी क्षमता सिद्ध केलेली आहे. बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रतिरोधकयंत्रणा एस-४००च्या माध्यमातून कोणत्याही अण्वस्त्र हल्ल्याला परतवून लावण्याचे सामर्थ्य भारताने प्राप्त केले आहे.

असे असले तरीदेखील चीनकडून विकसित केल्या जात असलेल्या हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांबाबत भारताने सावध राहणे आवश्यक आहे. कारण या शस्त्रास्त्रांपुढे भारताकडे सध्या असणारी पारंपरिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा प्रभावहीन ठरण्याची भीती आहे. उपलब्ध झालेल्या काही अहवालांच्या आधारे हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये चीन आण्विक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची भीती व्यक्त केली आहे.

आपल्याकडे असणारी अण्वस्त्रांची संख्या आणि त्याच्या उत्पादनाबाबत कोणताही देश तंतोतंत खरी माहिती उघड करत नाही. त्यामुळे भारताने घेतलेल्या ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीनंतर एक निष्कर्ष नक्कीच काढता येईल की, भारत अण्वस्त्रनिर्मितीत अत्याधुनिक आणि सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहे. भारतही व्यूहरचनात्मक आण्विक शस्त्रांची (टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन) निर्मिती करण्यास इच्छुक आहे का?

याबाबत मात्र कोणताही निष्कर्ष आताच काढता येणार नाही. तथापि भारताने पाकिस्तानच्या व्यूहरचनात्मक आण्विक शस्त्रांच्या निर्मितीवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः चीनकडून त्यांना देण्यात येत असलेले ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान पाकिस्तानला विशेष फायद्याचे ठरत असून त्यांची अण्वस्त्र प्रतिरोधी क्षमता वाढविण्यास सहाय्यभूत ठरत आहे. त्यामुळेच भारताने स्वतःचे ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान तातडीने विकसित करणे आणि क्षेपणास्त्रामध्ये त्याचा अंतर्भाव करणे अत्यंत आवश्यक आहे.

(अनुवादः रोहित वाळिंबे)

(लेखक संरक्षणविषयक घडामोडींचे अभ्यासक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.