एकाच निर्णयाशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींच्या इच्छा आणि हित बहुतेक वेळा परस्परविरोधी असल्यामुळे नैतिक संघर्ष निर्माण होतात. वैद्यकीय नीतिमीमांसेतले प्रश्न याला अपवाद नाहीत. कुणाच्या हिताला आणि कुठल्या कारणासाठी प्राधान्य द्यायचे, किती प्राधान्य द्यायचे हे ठरवण्यासाठी वैद्यकीय नीतिमीमांसेतील चार मार्गदर्शक तत्त्वांचा उपयोग केला जातो. व्यक्तीच्या स्वयंनिर्णयाचा आदर राखणे, रुग्णाचे हित करणे, रुग्णाचे अहित न करणे आणि न्याय ही ती तत्त्वे आहेत. याच तत्त्वांच्या चौकटीत या क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण विषयाचा; अवयव प्रत्यारोपणाचा विचार करावा लागतो. गेल्या काही दशकांमधे वैद्यकीय तंत्रज्ञानाने जी थक्क करणारी प्रगती केली आहे, त्यात अवयव प्रत्यारोपणाच्या तंत्राचा फार मोठा सहभाग आहे.
नेत्रदानाबद्दल काही प्रमाणात जागृती झाली आहे. हृदय, मूत्रपिंड, यकृत यासारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणाच्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. या तंत्रामुळे अनेकांचे जीव वाचतात, काहींच्या जीवनाच्या गुणवत्तेत मोठाच फरक पडतो. आज जेवढे जीव वाचतात किंवा जेवढ्यांचे जीवन सुधारते, त्यांपेक्षा कित्येक पटींनी जास्त लोकांचा फायदा करून देण्याची क्षमता या तंत्रज्ञानामधे आहे. ती पूर्णपणे वापरात येत नाही, कारण गरजू रुग्णांच्या संख्येला पुरेशा प्रमाणात अवयव उपलब्ध होत हीत. सर्वसामान्यांचे अज्ञान, भीती, गैरसमज यांप्रमाणेच धार्मिक समजुतींचा पगडा, अवयव दानाविषयीचे नैतिक संभ्रम यांसारखी अनेक कारणे यामागे आहेत.
कुठलाही नैतिक पेच सोडवताना आपल्या निर्णयाचे आता किंवा नंतर, कुणा-कुणावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहेत, हे पाहावे लागते. अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भात अवयव-दाता, ज्याला अवयव दिला जाणार आहे तो रुग्ण, दोघांचेही कुटुंबीय यांचा विचार करावा लागतो. अवयव-दाता स्वत: रुग्ण असू शकतो किंवा निरोगी असू शकतो. काही वेळा दाता रुग्णाच्या नात्यातला असतो, पण कधी-कधी अपरिचितही असतो. दात्याने स्वतःच्या मर्जीने आपला अवयव देण्याचा निर्णय घेतलेला असावा लागतो. कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा प्रलोभन यांना बळी पडून घेतलेला निर्णय स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाविरुद्ध असल्यामुळे अनैतिक असतो. पण जर एखाद्याने पैसे मिळवण्याच्या हेतूने मूत्रपिंड दान करायचे ठरवले, तर ते नीतीला धरून होईल का?
अवयवदात्यांना आर्थिक मोबदला दिला जावा का, हा प्रश्न इथे निर्माण होतो. असा मोबदला दिला गेला, तर दात्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन स्वत:चा लाभ करून घेणारे मध्यस्थ, डॉक्टर यांची अभद्र साखळी अस्तित्वात येते.
अभावग्रस्तांना आपले अवयव एखादी वस्तू असल्याप्रमाणे ‘बाजारात’ विकण्याची वेळ यावी आणि ज्यांना त्यांची किंमत मोजणे शक्य असते, त्यांनाच ते विकत घेता यावे, अशी परिस्थिती असणे समाजव्यवस्थेच्या दुरवस्थेचे लक्षण आहे.
माणसाला दोन मूत्रपिंडे असतात, त्यामुळे एक मूत्रपिंड गरजूला दिले, तरी दुसऱ्या मूत्रपिंडाचे कार्य चालू राहते आणि दात्याचे जीवन चालू राहते. हृदयासारख्या अवयवाच्या बाबतीत हे अर्थातच शक्य नसते. जिवंत माणसाचे हृदय काढून घेणे हे त्याला मारणे आहे. अशा परिस्थितीत प्रत्यारोपणासाठी निरोगी हृदय कसे मिळवायचे ही मोठीच समस्या असते. रुग्णालयात असेही रुग्ण असतात, जे केवळ शरीराला जोडलेल्या कृत्रिम यंत्रणांच्या आधारावर जगत असतात. त्यांच्या मेंदूचे कार्य थांबलेले असते. ‘मेंदूमृत’ असा शब्द अशा रुग्णांच्या संबंधात वापरला जातो. ते बरे होऊन सर्वसाधारण आयुष्य जगण्याची शक्यता जवळपास शून्य असते. त्यांना कुठल्याही संवेदना होत नसतात. सुखाची, वेदनांची जाणीव नसते. थोडक्यात अशा व्यक्तीचे माणूस म्हणून अस्तित्व नाममात्र असते. अशा रुग्णांच्या हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकते. असा रुग्ण स्वत: निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे त्यासंबंधीचा निर्णय जवळचे नातलग घेऊ शकतात.
निरोगी अवस्थेत असतानाच आपल्या बाबतीत अशी परिस्थिती उद्भवली, तर स्वतःचे अवयव दान केले जावेत, अशी इच्छा व्यक्तीने व्यक्त करणे अवयव दानासंबंधीच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अतिशय सहाय्यकारक ठरेल. आपल्या भावना, मृत्यूनंतर करण्याच्या विधींबाबतच्या समजुती यांपेक्षा मृत्यूनंतरही कुणाचे तरी जीवनमान सुधारावे, ही इच्छा अधिक उदात्त नाही का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.