समाजाच्या सर्वंकष विकासासाठी शिक्षक धडपडत असतात. सभोवताली अनेक शिक्षक आपल्या शिक्षणक्षेत्रात कृती संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून विविधांगी उपक्रम राबवत असतात. त्यातील एक मळगावचे (ता. बागलाण) भूमिपुत्र व कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगगड येथील शिक्षक संजय ठोके. दिवंगत मातोश्री कासुबाई ठोके यांच्या नावाने सुरू केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांतील शेतकऱ्यांत जाऊन ‘बांध वाचवा, पर्यावरण वाचवा’ संदर्भात जनजागृती करीत आहेत.
योगेश सोनवणे,
पिंपळगाव (वा.) जि. नाशिक
संस्काराचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आई. पाल्यांसाठी पालक कष्ट घेतात आणि त्याची जाणीव लेकराला असावी, असे प्रत्येकांना वाटते. समाजातील चटके झेलणाऱ्यांच्या मदतीला जावे, अशी शिकवण आईकडून मिळाली आणि वंचितांचा आधार होता आलं तर त्याच्यासारखे दुसरे समाधान ते कसले, या विचारांनी प्रेरित झालेले मळगाव येथील संजय ठोके यांनी ज्ञानदानाबरोबरच पर्यावरण वाचविण्याचा वसा घेतला आहे.
वडिलांचा शेती व्यवसाय. घरात कुणीही उच्चशिक्षित नव्हते. अशा परिस्थितीत संजय ठोके यांनी मळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून शिक्षणाला सुरवात केली. त्यानंतर माध्यमिक शिक्षण व्ही पी एन विद्यालय, सटाणा येथून केले. ११ वी ते बी. एपर्यंतचे शिक्षण सटाणा महाविद्यालयातून केले. पुढे बीएडचे शिक्षण प्रवरानगर येथील बाभळेश्वर महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर काही वर्षे विनाअनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून काम केले.
२००१ मध्ये ते शिक्षणसेवक म्हणून रुजू झाले. सध्या ते सप्तश्रृंगगड येथील परम पूज्य ओम गुरुदेव आश्रमशाळेत कार्यरत आहेत. मातोश्री स्व. कासुबाई ठोके यांच्या नावाने त्यांनी फाउंडेशन स्थापन केले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून ते समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहेत. त्यात ग्रामीण व आदिवासी भागातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अंध-अपंग, गोरगरीब, वंचित यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, व्याख्यानमाला, कार्यशाळा, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करणे आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. हे काम ते आपल्या नोकरीच्या दैनंदिन वेळेव्यतिरिक्त करत आहेत.
सध्या ठोके हे बांध वाचवा, बांध वाढवा यासंदर्भात गावोगावी जाऊन शेतकऱ्यांत जनजागृती करत आहेत. शेतीचा बांध हा शेतकरी बांधवांसाठी दीर्घकालीन गुंतवणूक आहे, असे संजय ठोके यांचे मत आहे. जास्तीत जास्त जमीन लागवडीखालील आणण्याच्या प्रयत्नांत डोंगर, टेकड्या, माळरान, बांध मानवाने शिल्लक ठेवले नाहीत. टेकडीफोड करत असल्याने बांध नष्ट होत आहेत. त्यामुळे अनेक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समस्या निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या व त्याच्या कुटुंबावर विपरीत परिणाम होत आहे, असे ठोके म्हणतात.
शेतीचा बांध कोरण्यावरून तसेच झाड तोडण्यावरुन शेतकऱ्यांमध्ये वाद होतात व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ, पैसा, श्रम वाया जातो. प्रगतीत अडथळे निर्माण होतात व पोलिसांवर ताण पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच कमी कालावधीत मुसळधार, ढगफुटीसारखा पाऊस पडत असल्यामुळे शेतातील सुपीक माती, खत तसेच पाणी वाहून जाते, बंधारे व धरणे गाळाणे भरल्यामुळे जलाशयाची साठवण क्षमता कमी झाली. भूमिगत पाण्याचा साठा कमी होऊन पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. दिवसेंदिवस गवत व चाऱ्याची समस्या निर्माण होत असल्यामुळे शेतकरी पूरक पशुपालनाचा व्यवसाय करू शकत नाहीत आणि परिणामी उत्पन्न कमी झाले आहे. मोठी धरणे बांधण्यासाठी मर्यादा येतात. भविष्याचा विचार करता माती, पाणी वनस्पती ही नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. यासाठी ‘बांध वाचवा, बांध वाढवा’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संजय ठोके यांनी जास्तीत जास्त गावांमध्ये जनजागृती केली आणि करत आहेत. कुठल्याही गावात जनजागृती करण्यासाठी जाताना ठोके संबंधित गावातील ग्रामपंचायतीला भेट देतात त्यांच्या सहकार्यातून मोहीम राबवतात.
शेतीचा बांध वाचविण्याचे फायदे
झाडांचे, वनस्पतीचे संवर्धन होते.
झाडापासून शुद्ध हवा, सावली मिळते.
झाडांच्या पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार होते.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जनावराची संख्या वाढून दुग्ध उत्पादन, खत, शेतीच्या कामासाठी प्राणी उपलब्ध होऊ शकतात
शुद्ध, सात्त्विक, सेंद्रिय वस्तू घरात उपलब्ध होत असतात.
झाडांवर अनेक पशू-पक्षांचे आश्रयस्थान असल्यामुळे, अन्नसाखळी तयार होते.
जमिनीतील (भूजल) पाण्याचे प्रमाण वाढते.
शेतातील सुपीक माती, महागडी खते पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाणार नाही.
धरणे, बंधारे आदी जलाशयात गाळाचे प्रमाण कमी होऊन पाणी साठ्यात वाढ होईल.
औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
वातावरणातील कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.