Box Office Battle : स्वातंत्र्यदिनी कोण होणार सुपरहिट?

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात विविध प्रकारे योगदान देणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात वीरांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी भारतीय मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करतात.
Four Big Bollywood Movies Clash at the Box Office in August 2024
Four Big Bollywood Movies Clash at the Box Office in August 2024Sakal

- गिरीश वानखेडे

येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी चार मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट २०२३ची यशाची परंपरा पुढे कायम ठेवणार का, याविषयी उत्सुकता आहे. जानेवारीपासून आतापर्यंत चित्रपटसृष्टीला एकही सुपरहिट चित्रपट मिळालेला नाही. त्यामुळे या चार चित्रपटांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात विविध प्रकारे योगदान देणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात वीरांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी भारतीय मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करतात. हा महिना सणांचा आणि उत्सवाचा असल्याने लोक मनोरंजनासाठी चित्रपट पाहणे पसंत करतात. आपला चित्रपट प्रदर्शित करण्याची अनेक निर्मात्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. ही रस्सीखेच आपल्याला यावर्षीदेखील स्वातंत्र्यदिनाच्या आसपास पाहायला मिळणार आहे.

सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट ‘पुष्पा-२’ आणि ‘सिंघम अगेन’ हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार असल्याचे वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करण्यात आले होते; पण जून महिना उजाडला, तरीही प्रेक्षकांची प्रतीक्षा काही संपलेली नाही.

जानेवारीपासून जूनपर्यंत प्रदर्शित झालेल्या कोणत्याही चित्रपटाला मागच्या वर्षाच्या तुलनेत घवघवीत यश मिळालेले नाही. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढणारे चित्रपट ॲनिमल, गदर-२, ओ माय गॉड-२, ड्रिम गर्ल-२ प्रदर्शित झाले होते. म्हणजेच काय, तर मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये चित्रपटसृष्टीला पाच ते सात सुपरहिट चित्रपट मिळाले होते.

या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सुपरहिट म्हणावेत, असे फक्त दोनच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ते म्हणजे शैतान आणि क्रु. नुकताच प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ हा चित्रपट ठिकठाक कमाई करत आहे. यावरून मागच्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत या वर्षी चित्रपट व्यवसायाने फार काही कमाई केली आहे, असे म्हणता येत नाही.

त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा-२’ आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांकडे लागले होते. ‘पुष्पा-२’चा टीझर, पोस्टर आणि गाणे प्रदर्शित झाले आहे. या सर्वांची लोकप्रियता पाहता या वर्षाच्या सुरुवातीपासून यशाचा आणि कमाईच्या आकडेवारीचा जो दुष्काळ पडला आहे तो हा चित्रपट भरून काढेल, अशी सर्वांची अपेक्षा होती.

मात्र याही महिन्यात हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘सिंघम अगेन’ने तर पुष्पासोबत टक्कर टाळण्यासाठी सोबत प्रदर्शन केले जाणार नाही, असे यापूर्वीच सांगितले होते. ‘सिंघम अगेन’ आता दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित केला जाणार आहे.

त्यामुळे सर्वांना असे वाटत होते की आता पुष्पाला टक्कर देण्यासाठी कोणताही चित्रपट मैदानात नाही; पण आता तर ‘पुष्पा’नेदेखील आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची बातमी आली आणि यावर्षीचा ऑगस्ट महिना मनोरंजनाविना जाणार, अशी शंका निर्माण झाली होती.

मात्र या दोन मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले जात आहे हे समजताच, या संधीचा फायदा घेत चार इतर मोठे चित्रपट प्रदर्शित केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि प्रेक्षकांना ऑगस्ट महिना मनोरंजनाविना घालवावा लागणार नाही, हे निश्चित झाले.

आता जरा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीतला पहिला चित्रपट आहे अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’. या चित्रपटात अक्षयच्या सोबतीने आपल्याला वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान दिसणार आहेत.

हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. १५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट आहे ‘स्त्री-२’. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा हा पुढचा भाग आहे. या नव्या भागातही आपल्याला श्रद्धा कपूर, राजकुमार राव ही मंडळी दिसणार आहेत.

या भागात वरुण धवन आपल्याला पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय याच दिवशी जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असलेला आणि निखिल अडवाणीने दिग्दर्शित केलेला ‘वेडा’ हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

या जोडीचा १५ ऑगस्टच्या दिवशी प्रदर्शित झालेला सत्यमेव जयते, तर निखिल अडवाणीचा बाटला हाऊस हे चित्रपट यशस्वी ठरले होते. त्यामुळे ‘वेडा’ चित्रपटदेखील सुपरहिट ठरेल, असे भाकीत केले जात आहे. या ॲक्शनपटात जॉनबरोबर शर्वरी वाघ स्क्रीन शेअर करणार आहे.

या तीन हिंदी चित्रपटांच्या जोडीने १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर दक्षिण भारतीय भाषांमधील तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील पहिला चित्रपट आहे तमिळ भाषेतील पा रंजीत यांचा ‘थंगलान’. मोठ्या बजेटच्या या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत विक्रम दिसणार आहे.

हा चित्रपट तमिळबरोबरच तेलुगू, हिंदी आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. दुसरा चित्रपट आहे कन्नड भाषेतील शिव राजकुमार अभिनित ‘बैराथी रणगन’. मोठ्या बजेटचा हा चित्रपटदेखील कन्नड भाषेबरोबरच तमिळ, हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

तिसरा चित्रपट आहे राम पोथिनेनी आणि संजय दत्त यांच्या अभिनयाने सजलेला तेलुगू चित्रपट ‘डबल इस्मार्ट’. हा चित्रपटदेखील इतर दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘इस्मार्ट शंकर’ चित्रपटाचा हा पुढचा भाग आहे.

Four Big Bollywood Movies Clash at the Box Office in August 2024
Surya Double Role: साऊथ सुपरस्टार सूर्या साकारणार डबल रोल, पोस्टरची होतेय चर्चा

१५ ऑगस्टला या सहा चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. मागच्या वर्षी एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या ‘गदर-२’ आणि ‘ओ माय गॉड-२’ या दोन्ही चित्रपटांनी सुपरहिटचा शिक्का मिळवला होता. या वर्षी चार चित्रपटांपैकी कोणते चित्रपट हे बिरूद कमावतात, यावर प्रेक्षकांची नजर असणार आहे.

इतिहासात डोकावून पाहिले तर ज्या वर्षी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणजेच १९४७ च्या ऑगस्टमध्ये पी. एल. संतोषी (राजकुमार संतोषी यांचे वडील) द्वारा दिग्दर्शित ‘शहनाई’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सर्वसाधारण कमाई केली होती.

या चित्रपटाचा नायक होता किशोर कुमार आणि नायिका होती इंदुमती. त्यानंतर १९७५च्या ऑगस्टमध्ये ‘शोले’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. विक्रमी छप्पर फाड कमाई करणारा हा चित्रपट आजची पिढीदेखील आवर्जून पाहते.

पाश्चिमात्य पद्धतीची ॲक्शन दृश्य आणि भारतीय भावनिकतेचे मिश्रण असलेला हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला होता. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया बच्चन, अमजद खान, संजीव कुमार अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट आजही विस्मरणात गेलेला नाही. एवढेच नाही, तर भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाला अढळपद लाभलेले आहे.

Four Big Bollywood Movies Clash at the Box Office in August 2024
Maharaj Movie Court Case : 'महाराज' सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगिती कायम ; कोर्ट आज फैसला सुनावणार ?

एकंदरीतच १५ ऑगस्टच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा इतिहास फारच मनोरंजक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आसपास प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा २००१ पासूनचा मागोवा घेतला, तर यावर्षी प्रदर्शित झालेला ‘दिल चाहता है’ हा फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेला आणि आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट सुपरहिट झाला होता.

या चित्रपटाने तरुण पिढीचा मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. २००२ मध्ये प्रदर्शित ‘मुझ से दोस्ती करोगे’ हा ऋतिक रोशन, करिना कपूर आणि राणी मुखर्जीचा चित्रपट मात्र खास कमाल दाखवू शकला नव्हता.

मात्र याच्यासोबतच प्रदर्शित झालेल्या रजनीकांतचा ‘बाबा’ हा चित्रपट हिट ठरला होता. २००३ मध्ये आला होता सलमानचा सुपरहिट ‘तेरे नाम’. याबरोबर प्रदर्शित झालेला विक्रम भटचा ‘फूटपाथ’ मात्र फूटपाथवरच राहिला. २००४ मध्ये प्रदर्शित क्युं, हो गया ना!, फिर मिलेंगे हे दोन्ही चित्रपट बासनात गेले.

Four Big Bollywood Movies Clash at the Box Office in August 2024
Vedaa And Pushpa 2: 'वेदा' आणि 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर; जॉन अब्राहम की अल्लू अर्जुन, कोण मारणार बाजी?

२००५चा ऑगस्ट ‘मंगल पांडे’ घेऊन आला, मात्र हा चित्रपटही फ्लॉप ठरला. २००६ च्या ऑगस्टमधला ‘कभी अलविदा ना कहना’ ठीकठाक चालला. ऑगस्ट २००७ मध्ये आलेल्या ‘चक दे’ या चित्रपटाने इतिहास रचला होता.

देशभक्तीने भारावून टाकणाऱ्या या चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना मोहित केले होते. २००८मध्ये बचना ऐ हसीनो, गॉड तुसी ग्रेट हो या दोन चित्रपटांमध्ये टक्कर झाली आणि बचना ऐ हसीनो या चित्रपटाने बाजी मारली होती. २००९ मध्ये ‘कमीने’ (शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा), २०१० मध्ये हटके असा ‘पिपली लाईव्ह’, २०११ मध्ये ‘आरक्षण’ या चित्रपटांनी चांगली कमाई केली होती.

२०१२ मध्ये ‘एक था टायगर’ या सलमान खानच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपटाचा पाया घालणाऱ्या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. २०१३मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रदर्शित होणारे चित्रपट हिट ठरतात ही बाब अधोरेखित केली. २०१४ मध्ये यशाची पुनरावृत्ती करत ‘सिंघम रिटर्न्स’ प्रदर्शित झाला आणि हिट झाला.

Four Big Bollywood Movies Clash at the Box Office in August 2024
Hollywood Movie News : हॉलीवूडमध्येही महिला दिग्दर्शकांचे प्रमाण का होतयं कमी? 100 सर्वोत्तम चित्रपटांमध्ये फक्त...

२०१५ मध्ये प्रदर्शित अक्षयकुमारचा गदर्स चित्रपट लोकांना आवडला नव्हता. २०१६ मध्ये अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ आणि ऋतिक रोशनचा ‘मोहेंजोदारो’ यांची टक्कर झाली आणि रुस्तम हिट झाला. २०१७ मध्ये अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’ चालला, २०१८ मध्ये त्याचाच ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ एकत्र प्रदर्शित झाले आणि चाललेदेखील.

२०१९ मध्ये जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ आणि अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ या दोन चित्रपटांची टक्कर झाली. दोन्ही चित्रपटांनी सर्वसाधारण कमाई केली. २०२० मध्ये ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ आणि ‘खुदा हाफिज’ प्रदर्शित झाले. मात्र दोन्हीही चित्रपट खास कामगिरी करू शकले नाहीत.

२०२१ हे वर्षदेखील असे तसेच गेले. या वर्षात ‘शेर शाह’ आणि ‘भूज’ हे चित्रपट प्रदर्शित झाले; मात्र आले तसेच निघूनही गेले. २०२२चा ऑगस्ट मात्र आणखीनच थंडावलेला होता. या वर्षी आमिर खानचा ‘लालसिंग चढ्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ प्रदर्शित झाले.

प्रेक्षकांच्या या दोन्ही चित्रपटांकडून खूप अपेक्षा होत्या; मात्र या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केली. २०२३ या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यांनी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढत एकाच वेळी गदर -२ आणि ओ माय गॉड -२ असे दोन सुपर डुपर हिट चित्रपट दिले. आता यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला कोणता चित्रपट हिट ठरतो, यावर सर्वांचीच नजर आहे.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com