किमया सकारात्मक विचारांची

गणेशोत्सव एक नवी ऊर्जा आणि सकारात्मक विचारांचा वाढता प्रभाव घेऊन येत आहे
 एक नवी ऊर्जा
एक नवी ऊर्जा sakal
Updated on

गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते, त्याचबरोबर विघ्नहर्ता म्हणूनही त्याची पूजा, उपासना केली जाते. कोविडमुळे गेली दोन वर्षे सगळेच सण, उत्सव झाकोळून गेले होते, यंदा त्यातून बाहेर पडून समाज नव्या जोमाने उभा रहात आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्याला यावर्षीच्या उत्सवात पहायला मिळत आहे. गणेशोत्सव साजरा करणारी सर्व लहानमोठी मंडळे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत. बाजारपेठा गजबजल्या आहेत, त्यातून अर्थव्यवहाराला चांगली चालना मिळते आहे. एकूण, यावर्षीचा गणेशोत्सव एक नवी ऊर्जा आणि सकारात्मक विचारांचा वाढता प्रभाव घेऊन येत आहे. त्याचा अनुभव आपण पंधरा दिवसांपूर्वी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना घेतला.

यावर्षी आपण स्वातंत्र्यप्राप्तीची ७५ वर्षे साजरी करत आहोत. हा उत्सव केवळ सरकारी पातळीवर राहू नये, सर्व समाज त्यात सहभागी झाला पाहिजे, या उद्देशाने पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा दिली आणि घराघरावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येकाने साजरा करावा, असे आवाहन केले.

आपण सर्वांनी त्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यातून संपूर्ण भारतात एक ‘तिरंगा लहर’ उसळलेली आपल्याला पहायला मिळाली. घराघरावर तिरंगा डौलाने फडकवला गेला, त्याचबरोबर पुढच्या २५ वर्षांमध्ये, जेव्हा स्वातंत्र्याची शतकपूर्ती होईल, त्यावेळेला भारत जागतिक महासत्ता बनलेला असेल, यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करण्याचा संकल्पदेखील आपण सर्वांनी या निमित्ताने केला. राष्ट्रनिर्मिती, राष्ट्राची उभारणी हे काही फक्त चार दोन नेत्यांचे किंवा केवळ राजकीय पक्षांचे काम नाही. त्यात सर्व समाज सहभागी असावा लागतो. संपूर्ण समाजाच्या सक्रिय सहभागातूनच राष्ट्रनिर्मिती, राष्ट्रउभारणी होत असते. समाजाचा असा सहभाग वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमातून मिळत असतो. राष्ट्राच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले सामूहिक मानस अशा उपक्रमांमधून तयार होते. ‘हर घर तिरंगा’ हा असाच एक सामूहिक उपक्रम होता. त्यापूर्वीदेखील, अशा सामुदायिक उपक्रमांचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर कशा प्रकारे होतो, त्याचा अनुभव आपण कोविडच्या काळात घेतला होता. घराघरातून एकाच वेळी घंटानाद करण्याचा साधा कार्यक्रम त्यावेळी आपण केला;तसेच दीपप्रज्वलन केले. त्या कार्यक्रमांवर काहींनी टीकाही केली; पण त्या साध्या कार्यक्रमातूनच समाजातील नैराश्य, वैफल्य दूर व्हायला मोठ्या प्रमाणावर मदत झाली व सर्वजण जागतिक महासाथीचा सामना करण्यासाठी एकदिलाने उभे राहिले.

अशा साध्या साध्या कार्यक्रमातून कोट्यवधी नागरिक एका पद्धतीने, एका दिशेने विचार व कृती करत आहेत, हे सर्वांना बघायला मिळते व हे दृश्य सर्वांचेच मनोबल वाढवणारे असते. हे कार्यक्रम प्रतीकात्मकच असतात. पण, त्याचबरोबर ते सामाजिक मानसशास्त्रीय परिणाम करणारेदेखील असतात. असे कार्यक्रम देत रहाणे व ते यशस्वी करणे ही काळाची गरज असते. अशा विविध कार्यक्रमांमधून भारतीय समाजाची एकजूट सर्वाना दिसून आली. या एकजुटीमुळेच त्या जागतिक संकटातून आपण लवकर सावरलो.

कोविडच्या साथीमुळे जगातील अनेक देशांवर अत्यंत वाईट परिणाम झाला, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीला आल्या. त्या तुलनेत आपली परिस्थिती चांगली राहिली. आज आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था आहे असे जागतिक बँक म्हणत आहे. संकटांमुळे हादरून न जाता, त्या संकटाचे रुपांतर संधीत करण्यासाठी आपण सर्वजण मिळून संघटित प्रयत्न करायला लागलो, त्याचे हे परिणाम.

नव्या कल्पना, नवी ऊर्जा

काही वर्षांपूर्वी समाज म्हणून आपण कमालीच्या नकारात्मक पद्धतीने विचार करत होतो. ‘कोणी आलं तरी काही फरक पडणार नाही, हे असंच चालणार, आपल्या परिस्थितीत काहीही सुधारणा होऊ शकत नाही’ असे गृहीत धरून आपण चालत होतो. कारण, समाज, राष्ट्र घडवण्याच्या कामात आपलाही काही वाटा आहे, सहभाग आहे, असायला हवा ही जाणीव जागी होत नव्हती. ‘जे काही करायचे ते सरकारने करावे, त्यांची जबाबदारी आहे, आपला त्यात काही संबंध नाही’ अशी आपली सगळ्यांचीच मानसिकता होती. गेल्या सात आठ वर्षांमध्ये ह्या मानसिकतेत बदल होत गेला. ‘आपण सर्वांनी मिळून ठरवलं व त्या दिशेने सामूहिक प्रयत्न केले तर बदल निश्चित करू शकतो’ हा विश्वास आपल्याला येत गेला. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही त्याची सुरुवात होती. कोविड काळात कोट्यवधी कुटुंबांना अन्नसुरक्षा, स्वदेशी कोविड प्रतिबंधक लशींचे यशस्वी उत्पादन व वापर, गंगेचे पुनरुज्जीवन, शेती उत्पादनातील वाढ, लघु, मध्यम व ग्रामीण उद्योगांना चालना, स्वयंरोजगार देणाऱ्या विविध योजना, अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून हा विश्वास वाढत गेला. मुख्यत: आपल्याला हवे असलेले बदल घडवण्यात आपलाही वाटा आहे आणि आपण त्यादृष्टीने खूप काही करू शकतो हा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनात जागा होऊ लागला आहे. हा विश्वास नवी ऊर्जा निर्माण करत असतो. आज तशी ऊर्जा निर्माण होण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत.

शेती व उद्योगांच्या क्षेत्रामध्ये अनेक नवे तरूण नव्या कल्पना घेऊन येताना पहायला मिळत आहेत. विशेषत: कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांकडे ग्रामीण भागातला तरुण उत्साहाने वळायला लागला आहे. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रात संधीचे दरवाजे थोडे उघडले गेल्याबरोबर लहान कारखानदारीला चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या शेती क्षेत्रासाठी एक मोठी घटना याच काळात घडली आहे. येणारे २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी ‘जागतिक भरड धान्य वर्ष’ (International Millet Year) म्हणून जाहीर केले आहे. भरड धान्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण व संवर्धन, त्यांची शेती आणि त्यांच्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याला चालना असे विविध उपक्रम ह्या वर्षात राबवले जातील.

भारतासाठी हे International Millet Year महत्वाचे अशासाठी आहे की, भारताइतकी विविध प्रकारची आणि भरपूर पोषणमूल्य असलेली भरड धान्ये जगात अन्य कोणत्याही देशात पिकत नाहीत. आपण ह्या धान्यांचे हवे तेवढे उत्पादन करून निर्यात करू शकतो, त्यांच्यावर प्रक्रिया करून अत्यंत दर्जेदार, अधिक पोषणमूल्य असलेले, आरोग्यदायी खाद्यपदार्थ बाजारात आणू शकतो, त्यांची निर्यात करु शकतो.

आजवर आपण ह्या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे दुर्लक्ष करत आलो. पण, आता संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडील कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय वरदान ठरणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचे दरवाजे त्याच्यासाठी खुले होणार आहेत. फक्त त्या निर्णयाचा योग्य फायदा घेण्यासाठी सर्व संबंधितांना स्वत: पुढे येऊन प्रयत्न सुरु करावे लागतील. असे प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू, याबद्दल मला काही शंका नाही.

भारतात सकारात्मक बदल घडवण्यात आपलाही वाटा आहे आणि आपण त्या बाबतीत खूप काही करू शकतो, हा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनात जागा होऊ लागला आहे. ‘सगळे सरकारने करावे, या अपेक्षेपेक्षा ही जाणीव आपल्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच आश्वासक आहे.

(लेखक महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.)

madhav.bhandari@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()