कलाबहर : रंगुनि चित्रांत सारे...

drawing
drawing
Updated on

आपण सगळे चित्रं काढू शकतो! अगदी सगळे! हं आता आपल्यातल्या काहींची त्यात तीव्र भावनिक गुंतवणूक असते. मग पुढे जाऊन औपचारिक शिक्षण घेऊन ते चित्रकार म्हणून आपल्याला दिसतात. दृश्‍यकलेमध्ये मुख्यत्वे रेखाकला, रंगकला, शिल्पकला, मुद्राचित्रकला, सिरॅमिक्‍स, छायाचित्रकला, डिझाईन, हस्तकला, वास्तूकला असे प्रकार असतात. रेखाकला/ चित्रकला हे या सर्व प्रकारांचे मूळ आहे. रेषा, रंग, पोत, आकार, रचना, अवकाश, छायाप्रकाश अशा तत्त्वांना घेऊन चित्रकार विविध शैलीतील कलाकृती बनवतात. त्यातही अनेक शैली आहेत आणि काळानुसार अनेक ‘वाद’ आहेत. 

ढोबळपणाने विचार केला तर आपल्याला दोन प्रकार दिसतात - वास्तववादी आणि अवास्तववादी. वास्तववादी चित्र म्हणजे ज्यात आपल्याला वास्तवातील, आपल्या भवतालातील ओळखू येतील, असे आकार दिसतात. अवास्तववादी किंवा अमूर्तवादी चित्रांमध्ये असे ओळखू येणारे आकार दिसत नाहीत. त्यात चित्रकार आपल्या कल्पनेने आकार आणि रंगसंगती वापरून चित्रण करतात. दोन्ही प्रकार वेगळे असून त्यातून चित्रकाराची अभिव्यक्तीच घडत असते. आणखी खोलात जाऊन माहिती हवी असेल, तर आपण ते पटकन गुगलवर बघू शकतो. सगळं किती सोपं झालंय. पण मग असं केलं तर? घरातील सदस्यांनी एखादे वास्तववादी/ अवास्तववादी चित्र बघावे. इंटरनेटवर आणि मग चहाच्यावेळी किंवा रात्रीच्या एकत्र जेवण्याच्या वेळी, फोनवर खेळण्याऐवजी, त्या चित्रांबद्दल किंवा त्या शैलीबद्दल चर्चा करावी. कशी वाटली कल्पना? आता सध्या तर आपल्याला इंटरनेटशिवाय पर्यायच नाहीये. पण त्यावरील  चित्रकलेच्या विश्‍वातील माहितीबद्दल आपण घरात चर्चा नक्की करू शकतो. एकमेकांचे त्याबद्दलचे विचार ऐकू शकतो, दृष्टिकोन समजू शकतो. 

केवळ एखादा चित्रकार खूप प्रसिद्ध आहे, म्हणून त्याची कला आपल्याला तेवढीच प्रशंसनीय वाटली पाहिजे, असे अजिबात नाही. पण हा संवाद होणे गरजेचे आहे, असे वाटते मला. विविध चित्रकार, विविध शैली याबद्दल आपल्याला माहिती तर मिळेलच, पण आपण एक कुटुंब म्हणून, मित्र म्हणून, समाज म्हणून अधिक जवळ येऊ, नाही का? माझा स्वतःचा अनुभव आहे हा. एका कौटुंबिक सहलीच्यावेळी मी हा प्रयोग केला होता. सकाळी नाश्‍त्यानंतर सर्वजण एकत्र आलो. अगदी सर्व म्हणजे वय वर्ष पाच ते वय वर्ष ७० आणि याच्या मधलेही सर्व. एकूण १५जण असू आम्ही. चित्रकार असण्याचा फायदा हा होता, की मी सर्व साहित्य घेऊन गेले होते. त्यात होते कागद, पेन्सिल, चारकोल, कॅन्व्हास आणि ॲक्रिलिक रंग. सर्वांनी एकत्र येऊन एक चित्र बनवायचे, बास! येवढेच ठरते. मग कसेही रेषा ओढा, रंग ओता, फासा किंवा रितसर रंगवा. प्रत्येकाने एक नाही तर चक्क दोन चित्रे केली. आमचे तीन चार तास कसे गेले समजलेच नाही. लहानांनी तर फटाफट कॅन्व्हास रंगवले आणि मोठ्यांचे चित्र बघायला फिरू लागले. गम्मत म्हणजे, या प्रयोगात आम्ही सर्वजण वयाच्या एकाच पातळीवर आलो - मानसिक, भावनिक... सर्वच अर्थांनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.