तो प्रवास सुंदर आहे...

तो प्रवास सुंदर आहे...
Updated on

‘चित्रकले’चा आनंद घेण्याकरिता प्रत्येकाने एक उत्तम चित्रकारच झाले पाहिजे, असे कुठंय? पण, या नैसर्गिक देणगीचा अनुभव घ्यायचा नाही, असेही नाही. आपल्या प्रत्येकाची ती कुठेतरी एक गरज आहे. आपण कसे व्यक्त होतो हे जेव्हा समजू लागेल, कदाचित तेव्हा आपोआपच इतरांची अभिव्यक्ती समजून घेता येईल, त्याचा आस्वाद घेता येईल. पण म्हणजे नक्की काय? त्यासाठी कुठलीही कलाकृती निरखून पाहणे, समजून घेणे, तसा प्रयत्न करणे एवढं केलं तरी खूप आहे. प्रत्येक कलाकृती फक्त एक सौंदर्याचं रेखाटन किंवा चित्रीकरणच असलं पाहिजे, हा हट्ट बाजूला ठेवून.

आपण सगळे काही चित्रकार होणार नाही; पण कलाकृतीचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतो. त्यासाठी स्वतः त्या कलेच्या संपर्कात राहणे किंवा त्याचा अनुभव घेणे आवश्‍यक असते. शालेय शिक्षण संपले, की चित्रकलेचा नि आपला संबंध संपला, हा विचार बदलूया. ‘चित्रकार’ होणं ही एक निवड आहे आणि त्यासाठी पद्धतशीर शिक्षण घ्यावे लागते. काही जण त्या मार्गाने जातात. पण म्हणून बाकीच्यांनी चित्र काढणे पूर्णपणे विसरून जावे किंवा सोडून द्यावे असे नाही. आपण चित्रे काढावी ती ‘आपल्यासाठी’. या नैसर्गिक देणगीला आपलंसं करून बघूया तरी!

खरे तर चित्र काढणे ही प्रक्रियाच चित्रापेक्षाही आनंद देणारी. ती प्रक्रिया महत्त्वाची, रिझल्टपेक्षाही. आता ही प्रक्रिया म्हणजे दुसरे काही नाही, व्यक्त होणे हेच आहे. व्यक्त होण्याचे हे माध्यम किती सुरक्षित आणि खासगी आहे, नाही का? एखादी शांत,अबोल व्यक्तीसुद्धा इथे अगदी मुक्तपणे व्यक्त होऊ शकते. कशाचीही लाज न बाळगता. या प्रक्रियेत आपण नकळतच गुंतलो जातो, जगाचे भान हरपून. स्वतः एक चित्रकार असल्यामुळे मी हे अगदी ठामपणे सांगू शकते, की यातून जो अनुभव येतो, त्याने आपली मानसिक अवस्था नक्की बदलते... अगदी सकारात्मकरीत्या.ताण कमी होतो.  चित्र काढताना कधी कधी आपण स्वतःशीच झगडत असतो, तर कधी कधी खेळत असतो जणू... किंबहुना ते चित्रंच आपल्याला खेळवत असतं. हा खेळच मजेदार आहे. 

ही कृती आपल्यासाठी एक थेरपीच असते. गिरगिटणे, छापील चित्र रंगवणे, रंग शिंपडणे किंवा अगदी कागदावर रंग फासणे हे सर्व म्हणजे एक दैनंदिनी लिहिण्यासारखेच आहे. कला म्हणजे केवळ एक तांत्रिक शिक्षण किंवा आपल्याला न झेपणारे किंवा न समजणारे असे करिअर नसून त्याचा थेट मनाशी संबंध आहे. ते एक अभिव्यक्तीचे साधन आहे... एक थेरपी आहे. आपण जेव्हा याचा अनुभव स्वतः घेऊ तेव्हा आपल्याला दुसऱ्याची अभिव्यक्ती जास्त समजून घेता येईल. आपण जितकी जास्त चित्र बघू तितकी आपली नजरही तयार होईल आणि आपल्याला त्याची मजाही घेता येईल.

आता चित्र बघायची मजा येते ती कलादालनात. अगदी तसंच जसं सिनेमा बघायची मजा येते सिनेमा थिएटरमध्ये. आता या नवीन वर्षात हळूहळू सगळं सुरळीत सुरू झालं की आपल्याला ती मजा घेता येईल. तिथली ती भव्य जागा, प्रकाशयोजना, वातावरण, त्या भिंती यावर चित्रे कशी उठून दिसतात. एखाद्या चित्रकाराची जर अनेक चित्रे प्रदर्शित केली असतील तर आणखी मजा येते. अक्षरशः त्या चित्रकाराचा प्रवासच आपल्या डोळ्यांसमोर मांडलेला दिसतो. त्याची व्यक्त होण्याची शैली दिसते. कधी कधी विविध चित्रकारांचे ग्रुप एक्‍झिबिशनही असतात. तिथे तर विविध शैली बघून अचंबित होतो आपण. व्यक्ती तितक्‍या प्रकृती याचाच तो अनुभव. या अनुभवाने आपल्या मनात एक कुतूहल निर्माण होते आणि ते एक जिवंतपणाचेच लक्षण आहे, नाही का? चित्र काढताना  एक प्रकारचा आश्‍चर्यमिश्रित आनंदाचा अनुभव येतो, अगदी लहान मुलांसारखा. ही भावनाच जगण्यासाठी आवश्‍यक आहे. नाही तर या जगण्याच्या धबडग्यात हा भाव आपण विसरूनच गेलो आहोत, नाही का? म्हणून संवेदनक्षमतेच्या कक्षा वाढवूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.