‘कलिंगल पॅटर्न’चा गौरव

देशात पारंपरिक शेतीला अवकळा आली आहे. झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण, वातावरणबदलाचा फटका आणि रासायनिक खतांमुळे नापिकी यांसारख्या संकटांनी शेती धोक्यात आली आहे.
‘कलिंगल पॅटर्न’चा गौरव
‘कलिंगल पॅटर्न’चा गौरवsakal
Updated on

नाममुद्रा

स्वप्नील पेडणेकर

देशात पारंपरिक शेतीला अवकळा आली आहे. झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण, वातावरणबदलाचा फटका आणि रासायनिक खतांमुळे नापिकी यांसारख्या संकटांनी शेती धोक्यात आली आहे. महामार्ग आणि औद्योगिकीकरणामुळे शेतजमिनीचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी शाश्‍वत पद्धतींची निकड निर्माण झाली आहे. शाश्‍वत आणि त्याचबरोबर फायदेशीर शेतीचा अवलंबच या संकटातून तारू शकणार आहे. केरळ राज्यातील त्रिशूर येथील कृषी उद्योजक सोपना कलिंगल यांनी ‘कलिंगल प्लांटेशन’च्या माध्यमातून मसाले पिकांच्या मिश्रशेतीचा शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. एकात्मिक पीक व्यवस्थापनातून मसालाआधारित पीक प्रणाली त्यांनी विकसित केली आहे. ‘आयसीएआर-मसाला संशोधन संस्थे’ने नुकताच त्यांच्या या नावीन्यपूर्ण उद्यमशीलतेचा पुरस्कार देऊन गौरव केला.

भारत हा जगभरात वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. ही खाद्यसंस्कृती विकसित करण्यात मसाल्यांच्या पदार्थांचा सर्वात मोठा वाटा आहे. मसाल्यांचे नैसर्गिक स्वाद आणि सुगंधामुळे खाद्यपदार्थांची चव वाढते. भारतीय खाद्यपदार्थांच्या या चवीने आता परदेशातील खवय्यांनाही प्रेमात पाडले आहे. अमेरिका, बांगलादेश, संयुक्त अरब आमिराती, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रिटन आणि श्रीलंका या देशांत मसाल्यांना मोठी मागणी आहे. आरोग्याच्या दृष्‍टीनेही मसाल्यांचे महत्त्व अधोरेखित झाल्याने परदेशात मसाल्यांना पसंती मिळत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक, निर्यातदार आणि ग्राहकही आहे. आंतरराष्‍ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत विविध प्रकारच्या मसाल्यांची गेल्या काही वर्षांत झपाट्याने मागणी वाढते आहे.

२०२२-२३ मध्ये देशात ११.१४ दशलक्ष टन मसाल्यांचे उत्पादन घेण्यात आले; तर ३.७३ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ)मध्ये नोंद असलेल्या १०९ मसाल्यांमध्ये भारतातील ७५ प्रकारांचा समावेश आहे. मिरची, जिरे, हळद, आले आणि धणे यांचा एकूण उत्पादनात ७६ टक्के वाटा आहे. परदेशांतही मसाल्यांची मागणी वाढल्यामुळे येत्या काळात ही बाजारपेठ झपाट्याने विकसित होणार आहे. सरकारने २०२७ पर्यंत १० अब्ज डॉलरच्या मसाला निर्यातीचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मसाल्याची मोठी बाजारपेठ खुणावते आहे.

विशेष म्हणजे, मसाल्यांचे पीक घेत असताना आंतरपिकाला मोठा वाव आहे. त्रिशूर येथील ‘कलिंगल प्लांटेशन’ हे त्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. या प्रकल्पात प्राधान्य पीक हे जायफळ आहे. आंतरपीक पद्धतीने जायफळाची झाडे, नारळ, सुपारी आणि काळ्या मिरीची वेल यांची एकत्रित लागवड करण्यात आली आहे. जागेचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादकता वाढवण्याचा हा वेगळा प्रयत्न यशस्वी करण्यात सोपना कलिंगल यांना यश आले आहे. याशिवाय मारवाडी घोडे, देशी गायी, शोभेचे मासे, कबुतरे, ससे, कोंबड्या आणि बकऱ्यांसारखे पशुधनही जोपासण्यात आले आहे. ‘कलिंगल प्लांटेशन’ हे शाश्‍वत शेतीचा एक आदर्श उदाहरण आहे. पशुधन पालन आणि मसाले पिकांची लागवड यामुळे जैवविविधता वाढून पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते. शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि शाश्‍वत शेतीचा मार्ग मिळू शकतो.

शेतकऱ्यांनी अशा नावीन्यपूर्ण कल्पनांचा आपल्या शेतात वापर केल्यास निश्‍चितच कृषी अर्थव्‍यवस्थेची दीर्घकालीन वाढ होऊ शकेल. सोपना कलिंगल यांच्या शेतीमधील आधुनिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांसाठी शाश्‍वत शेतीचा आदर्श मार्ग खुला झाला आहे. शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला नवीन, पर्यावरणपूरक शेती पद्धती वापरण्यासाठी ‘कलिंगल पॅटर्न’ निश्‍चितच फायदेशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.