इस्रायली सैन्य हे गुप्तचरांकडून मिळालेली माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणारा सैनिक यांच्यात समन्वय साधण्यात यशस्वी झालेले दिसते. एकूणच या युद्धात तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो आहे.
‘ह मास’ने इस्राईलवर दहशतवादी हल्ला चढविला आणि त्यानंतर संघर्ष भडकला. त्या घटनेला सात ऑक्टोबरला वर्ष पूर्ण होत आहे. पहिला हल्ला झाला, त्यावेळी इस्राईलच्या गुप्तचरांना हल्लेखोरांनी चकविल्याची चर्चा होती.
मात्र या युद्धाने वर्षभरात घेतलेली वळणे पाहता गुप्तचरांचे कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा चातुर्याने वापर या इस्रायली वैशिष्ट्यांचा प्रत्यय त्या देशाने चढविलेल्या लक्ष्याधारित हल्ल्यांवरून दिसून येतो. मंगळवारी (ता.एक ऑक्टोबर) इराणने जवळजवळ दीडशे क्षेपणास्त्रांचा इस्राईलवर मारा केला. ती इस्रायली ‘क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणे’ने मध्येच अडवली.
पण जेव्हा अशारीतीने एकाचवेळी अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला जातो, तेव्हा संरक्षण यंत्रणेवर ताण येऊन एखादे क्षेपणास्त्र नागरी वस्तीत पटून जीवित, वित्तहानी होऊ शकते. तसे झाल्यास हे युद्ध आणखी चिघळेल आणि पसरेल. हा धोका जगासाठीच गंभीर स्वरूपाचा आहे.
एकूणच या युद्धात तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरला आहे. ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी मागील वर्षी सात ऑक्टोबर रोजी इस्राईलच्या भूभागात घुसून केलेल्या हल्ल्यानंतर, इस्राईलला मोठा धक्का बसला होता. या हल्ल्यानंतर इस्राईलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते.
जगातील सर्वांत अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला देश म्हणून इस्राईलकडे पाहिले जात असताना त्या तुलनेत तंत्रसज्जेतेमध्ये मागे असलेल्या ‘हमास’ने इस्राईलवर हल्ला करण्यात यश मिळविल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
वास्तविक पाहता हे तंत्रज्ञानाचे अपयश नव्हते तर, इस्राईलमधील राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या अतिआत्मविश्वासाचे हे फळ होते. याचे कारण पॅलेस्टाईन इस्राईल सीमेवरील यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होती,
मात्र इस्राईलच्या भूभागात घुसून ‘हमास’चे दहशतवादी हल्ला करू शकत नाहीत, या इस्राईली नेतृत्वाच्या अति आत्मविश्वासामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळालेल्या गुप्तवार्तांकडे दुर्लक्ष केल्याने ‘हमास’चा हल्ला यशस्वी झाल्याचे मानले जाते.
मागील वर्षभरापासून हमास बरोबर युद्ध सुरू असतानाच, २७ सप्टेंबर रोजी इस्राईलने हवाई हल्ला करत हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हसन नसरल्ला याला ठार केले. या हल्ल्यामध्ये गुप्तचरांकडून मिळालेली माहिती आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर दिसला. इस्रायली लष्कराने बैरुतवर केलेल्या हल्ल्यात हवाई हल्ल्यात वापरलेले मार्क-८४ हे बॉम्ब हे लक्ष्याचा अचूक वेध घेणारे होते. सुमारे ९०० किलो वजनाचे हे बॉम्ब अमेरिकी बनावटीचे होते.
सामान्यतः बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी हे बॉम्ब वापरले जातात. हे बॉम्ब अत्यंत अभेद्य सुरक्षा कवच भेदून शत्रूला ठार करण्यास सक्षम असतात. त्याचप्रमाणे या बॉम्बमध्ये ‘जीपीएस प्रणाली’ बसविण्यात आली असल्याने ते लक्ष्याचा अचूक वेध घेतात.
त्यामुळेच हिजबुल्लाचे अभेद्य सुरक्षा कवच भेदून इस्राईलच्या सैन्याने केलेला हवाईहल्ला यशस्वी ठरला. नसरल्लाचा खातमा केल्यानंतर इस्रायली सैन्याने हिज्बुल्लाविरोधात मोहीम हाती घेतली असून, मागील आठवडाभरात या दहशतवादी संघटनेच्या किमान सात प्रमुख दहशतवाद्यांना इस्रायली सैन्याने ठार केले आहे.
लेबनॉनवर १९८२मध्ये इस्राईलने केलेल्या हल्ल्यानंतर त्याला प्रतिकार करण्यासाठी हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली. १९९२ पासून या संघटनेचे नेतृत्व नसरल्ला याच्याकडे होते. हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेला अधिक सामर्थ्यवान बनवण्यात नसरल्लाचा मोठा वाटा आहे. त्यानेच लांब पल्ल्याच्या रॉकेटचा समावेश हिज्बुल्लाकडे असलेल्या शस्त्रास्त्रांत करून घेतला होता.
मागील किती काळापासून इस्रायली गुप्तचर संघटना त्याच्या मागावर होती आणि अखेर महिन्यात नसरल्ला याला ठार करण्यात इस्राईलला यश आले. इतकेच नव्हे तर त्याने उभी केलेली संघटना खिळखिळी करण्यातही इस्रायली सैन्याला यश आले आहे. ज्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला होता, त्यावरून तरी गेल्या किती एक दिवसांपासून इस्रायली सैन्य संधीच्या शोधात होते असे दिसते.
इस्रायली सैन्याचा इतिहास पाहता त्यांनी कायमच दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना लक्ष्य केले आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी, इस्राईलने ‘हमास’चा संस्थापक शेख अहमद इस्माईल हसन यासीन याला २२ मार्च २००४रोजी ठार केले होते.
व्हिलचेअरवर खिळून असलेल्या या दहशतवाद्याला ठार करण्यासाठी इस्राईलच्या सैन्याने क्षेपणास्त्राचा मार करू शकणारे ‘एएच-६४ अपाचे’ या हेलिकॉप्टरचा वापर केला होता. या हल्ल्यात यासीनसह त्याचे अंगरक्षक जागीच ठार झाले होते.
इस्रायली सैन्याच्या गुप्तचरांनी त्याच्यावर पाळत ठेऊन तो प्रार्थनेसाठी प्रार्थनास्थळावर कधी जातो कसा जातो याची माहिती सैन्याला पुरवली असल्याचे बोलले जाते. या माहितीच्या आधारेच यासीन जेव्हा प्रार्थनेसाठी निघाला होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यासीन हल्ल्यात ठार झाल्यानंतर ‘हमास’ने अब्देल अजीझ अल रंतिसीस याल त्यांचा म्होरक्या घोषित केले.
त्यानंतर अवघ्या महिनाभरातच इस्राईलने त्याच्यावरही हल्ला केला. ‘हमास’चा म्होरक्या ठार करून या दहशतवादी संघटनेवर विशेष परिणाम होत नसल्याचे इस्राईलच्या लक्षात आले असले, तरीही इस्राईलचे ‘हमास’बाबतचे विशेषतः त्यांच्या म्होरक्याबाबतचे धोरण हे अत्यंत आक्रमक आहे.
हिज्बुल्ला संघटनेबाबत पाहायचे झाल्यास या संघटनेची ताकद बऱ्यापैकी असल्याने इस्राईलला लेबनॉनमध्ये घुसून जमिनीवरून कारवाई करायची असल्यास पुरेशी तयारी करणे आवश्यक आहे, अन्यथा ते इस्राईलसाठी आत्मघातकी ठरू शकेल. त्यामुळेच हिज्बुल्लाच्या ठिकाणांवर हवाईहल्ले करून त्यांच्याकडे असलेली पायाभूत सुविधा खिळखिळी करण्याचा इस्राईलचा प्रयत्न दिसतो, ज्यायोगे इस्राईलला भविष्यात येथे जमिनीवरील कारवाई करणे अधिक सोपे जाणार आहे.
लेबनॉनमध्ये नुकतेच जे पेजरस्फोट झाले, त्यामागेदेखील ‘मोसाद’च आहे. मोबाईलच्या साहाय्याने हल्ला घडवून आणण्याचे तंत्रज्ञान आणि हल्ल्याची पद्धत ‘मोसाद’चीच आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. २००६ मध्येदेखील इस्राईलने नसरल्ला याला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. तेव्हापासूनच इस्रायली सैन्याच्या गुप्तचर विभाच्या वतीने हिज्बुल्लाची आणि त्या संघटनेच्या म्होरक्याची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
काळाच्या ओघात इस्राईलचे सैन्य अधिक तंत्रसज्ज होत गेले. त्यांच्याकडून नसरल्लाच्या हालचाली टीपण्यासाठी विविध गॅजेटचा वापर करण्यात आला. हिजबुल्लाची संपर्क यंत्रणा देखील हॅक करण्यात आल्याचे मानले जाते. इतकेच नव्हे तर नसरल्लाच्या बायकोच्या आणि मुलांच्या फोनवरूनही त्यांच्या हालचाली टिपल्या जात होत्या.
त्याचप्रमाणे सीसीटीव्ही यंत्रणा हॅक करून त्या माध्यमातून या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यासह प्रमुख नेत्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यात आल्याचे मानले जाते. या सर्व माहितीच्या आधारे नसरल्लचा ठावठिकाणा आणि त्याला मारण्यासाठी जमिनीखाली ६० ते ७० फूट खोल मारा करणाऱ्या बॉम्बची आवश्यकता असल्याचे इस्राईलच्या लक्षात आले.
नसरल्ला याला ठार करण्यात इस्राईलला आलेल्या यशामुळे, इस्रायली सैन्य हे गुप्तचरांकडून मिळालेली माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणारा सैनिक यांच्यात समन्वय साधण्यात यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. गुप्तचरयंत्रणेकडून मिळालेली माहिती कारवाई करणाऱ्या सैन्याला प्रत्यक्ष कारवाई सुरू असताना देण्यास इस्राईल यशस्वी झाला असल्याचे नसरल्लावरील कारवाईने स्पष्ट झाले आहे. इस्राईलला मिळालेले यश हे तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने नव्हे तर तंत्रज्ञानाचा चातुर्याने वापर केल्याने मिळाले आहे.
( अनुवादः रोहित वाळिंबे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.