- गिरिराज सिंह
हातमाग क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचा उत्सव साजरा करत असताना संख्येपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा मनोदय आहे. ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आज (सात ऑगस्ट) साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त या धोरणाची आणि आनुषंगिक उपक्रमांची माहिती.
कोलकाता इथल्या टाऊन हॉलमध्ये सात ऑगस्ट १९०५ रोजी झालेल्या एका बैठकीत स्वदेशी आंदोलनाचा प्रारंभ झाला होता. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग असलेल्या या आंदोलनाचा उद्देश देशांतर्गत उत्पादने आणि उत्पादनप्रक्रियेचे पुनरुज्जीवन करणे, हे होते. या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी आणि आपली हातमागपरंपरा साजरी करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सात ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून घोषित केला. हा उपक्रम भारतातील हातमाग कामगारांचा सन्मान करणारा असून या क्षेत्राला चालना देणारा ठरेल.
हातमाग क्षेत्र ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण क्षेत्रातील उपजीविकेचा महत्त्वपूर्ण स्रोत असून ३५ लाखांहून अधिक व्यक्ती या क्षेत्राशी संबंधित आहेत. यापैकी २५ लाखांहून अधिक महिला आहेत. अशा प्रकारे, हे क्षेत्र महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. देशभरात हातमागक्षेत्राला चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
पंतप्रधानांनी २८ जुलै २०२४ रोजी ‘मन की बात’ मध्ये ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यातील हातमाग क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले होते. हातमाग उत्पादने आणि शाश्वत फॅशनला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या नव्या स्टार्टअप उद्योगांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
स्थानिक हातमाग उत्पादनांना प्रसिद्धी मिळवून देण्याचे आणि ही उत्पादने #MyProductMyPride या हॅशटॅगसह सोशल मीडियावर सामायिक करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे.
गेल्या काही वर्षात भारताचे हातमाग क्षेत्र शाश्वतता आणि ‘स्लो फॅशन’चे प्रतीक म्हणून उदयाला आले आहे. हातमाग क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचा उत्सव आपण साजरा करत असताना मला संख्येपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देणे महत्त्वाचे वाटते. हातमाग क्षेत्राची शाश्वत गती कायम राखण्याचे नागरिकांना आवाहन आहे. हातमागावरचे विणकाम ही परंपरेने चालत आलेली कला असून त्यात मूल्याधारित, शाश्वत आणि ‘स्लो फॅशन’ची तत्त्वे अंतर्भूत आहेत.
गेल्या दशकभरातील सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ‘फास्ट फॅशन’वरून स्थानिक पातळीवरील उत्पादनांकडे लोक वळत असल्याचे लक्षणीय परिवर्तन दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिमानाने भारतीय हातमाग वस्त्र परिधान करतात आणि जागतिक स्तरावर त्याचा प्रचार करतात. अधिकाधिक लोकांनी या चळवळीत सहभागी होण्याची वेळ आली आहे.
संस्था नि बचतगट
शाश्वततेला चालना देण्यासोबतच हातमाग क्षेत्र हे महिला व उपेक्षित समुदायांच्या सक्षमीकरणासाठी लक्षणीय संधी पुरवते, त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना देते आणि आपल्या कलाकौशल्याबद्दल त्यांच्या मनात अभिमान जागृत करते. या क्षेत्राच्या उन्नतीत सुतकताई, कापड /सुत यांचे रंगकाम आणि प्रत्यक्ष विणकर महिला बजावत असलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.
हातमाग क्षेत्र ज्यांच्यशिवाय उभे राहू शकत नाही, अशा पारंपरिक समुदायांच्या विशेषतः महिलांच्या योगदानाची मला पूर्ण जाणीव आहे. त्याचे हे कार्य आदरास पात्र आहे. हातमाग क्षेत्रात महिलाप्रणीत अनेक सहकारी संस्था आणि बचतगट उदयास आले आहेत. या संस्था प्रशिक्षण आणि संसाधने पुरवण्यासोबतच एकता आणि सामूहिक सौदेबाजीची क्षमता मजबूत करणारे सहायक नेटवर्कदेखील उपलब्ध करतात.
एकत्र येण्यामुळे, महिला बचत गट त्यांच्या उत्पादनांना चांगल्या दर मिळवून देण्यासाठी वाटाघाटी करू शकतात, मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करू शकतात आणि योग्य वेतन व काम करण्यासाठी सुयोग्य स्थितीकरीता आग्रही राहू शकतात.
विणकाम कौशल्य, डिझाइन नवकल्पना आणि उद्योजकीय क्षमता सुधारण्याच्या उद्देशाने शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रम महिलांना अधिक सक्षम करतात. नवीन तंत्रात प्रभुत्व मिळवून आणि आधुनिक डिझाइन्सचा शोध घेऊन, महिला विणकर उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार करू शकतात जी समकालीन बाजारपेठांना आकर्षित करतात, त्यांच्या कलाकुसरीचा टिकाऊपणा सुनिश्चित करतात.
एम्ब्रॉयडरी अर्थात भरतकाम आणि प्रिंटिंग अर्थात छपाई यांसारख्या मूल्यवर्धनाद्वारे हातमाग वस्त्रे अधिक उत्तम होऊन पारंपरिक वस्त्रोद्योगात नवे प्राण फुंकता येतील. भरतकामासारख्या कलाकुसरीमुळे हातमाग वस्त्रे वैशिष्ट्यपूर्ण होतात. जरदोसी, कांथा किंवा चिकनकारी यांसारख्या विविध तंत्रांचा समावेश करून, कारागीर साध्या हातमाग वस्त्राचे वैशिष्टयपूर्ण, खास वस्त्रात रूपांतर करू शकतो.
यामुळे कपड्यांच्या सौंदर्यात वाढ होऊन ते आकर्षक होण्यासोबतच उत्पादनाचे बाजारमूल्य वाढते आणि कारागिरांना अधिक चांगल्या आर्थिक संधी उपलब्ध होतात. हातमाग वस्त्रांना या मूल्यवर्धनाची जोड देऊन पारंपारिक आणि समकालीन बाजारपेठांना आकर्षित करणारी उत्पादने तयार होतात. हा मेळ पारंपरिक कलेचे संवर्धन पुनरुज्जीवन करण्यासोबतच हस्तनिर्मित, पर्यावरणपूरक कापडाच्या वापरास प्रोत्साहन देऊन शाश्वत फॅशनला चालना देतो.
हातमाग उद्योगाला तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची जोड, विणकरांचे कष्ट कमी करणारी, उत्पादकता वाढवणारी आणि पारंपरिक कलेच्या जतनात मोठी आश्वासक आहे. आधुनिक प्रगती, हातमाग विणकामाशी संबंधित शारीरिक ताण लक्षणीयरीत्या कमी करू शकते.
प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि कमी श्रम-केंद्रित करू शकते. याव्यतिरिक्त कॉम्प्युटर-एडेड डिझाइन (CAD) सॉफ्टवेअर विणकरांना विणकाम सुरू करण्यापूर्वी क्लिष्ट नमुने आणि रंग संयोजनांसह प्रयोग करण्यास सक्षम करते. यामुळे केवळ वेळेची बचत होत नाही तर त्रुटींचा धोकाही कमी होतो. यामुळे उच्च गुणवत्ता साध्य करता येऊ शकते.
याबरोबरच विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट्स विणकरांना व्यापक बाजारपेठा पुरवतात, त्यांना थेट ग्राहकांशी जोडतात आणि मध्यस्थांवर त्यांचे अवलंबित्व कमी करतात. हातमाग उद्योगात गुणवत्ता, सातत्य आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. नवोन्मेषी सामग्री आणि प्रक्रिया यातून हातमाग विणकाम अधिक आकर्षक बनू शकते.
प्रत्येकाने प्रादेशिक कारागीर आणि पारंपारिक विणकाम करणाऱ्या समुदायांना पाठबळ दिले पाहिजे. कपडे खरेदी करताना त्याचा आपल्यावर होणारा परिणाम, ते तयार करणाऱ्या लोकांवर आणि पृथ्वीवर होणारा परिणाम याविषयी सजग राहिले पाहिजे. हातमागाच्या वस्तू, योग्य व्यापार, प्रादेशिक उत्पादन, शाश्वतता आणि कारागिरी या पैलूंवर लक्ष केंद्रित केल्याने या चळवळीचा प्रचार होण्यास मदत होईल आणि हातमाग विणकरांना त्यांचे न्याय्य हक्क मिळतील.
हातमाग उद्योगाला पाठबळ पुरवून आपण आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करतो. तसेच महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव विषयक समानतेचा पुरस्कार करतो आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टे २०३० पैकी अनेक उद्दिष्टे साध्य करू शकतो.
लोकांनो, प्रतिज्ञा करा
यावर्षी ‘राष्ट्रीय हातमाग दिना’चे औचित्य साधून मी सर्वांना आज दोन प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करतो. हातमाग उत्पादनात सेल्फी घेणे आणि सोशल मीडियावर शेअर करणे; दुसरे म्हणजे आपल्या वॉर्डरोबमध्ये आणि दैनंदिन जीवनात हातमाग उत्पादने समाविष्ट करणे. प्रत्येक हातमाग वस्त्र वैशिष्टयपूर्ण असते.
अतिशय काळजीपूर्वक आणि बारकाईने लक्ष पुरवून ते विणलेले असते. त्यातून त्या कलाकाराची कारागिरी आणि समर्पण प्रतिबिंबित होत असते. हातमाग उत्पादनांची निवड करून, आपण केवळ पारंपारिक कापडाचे सौंदर्य साजरे करत नाही, तर कारागिरांच्या उपजीविकेतही योगदान देतो.
(लेखक केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.