सर्च-रिसर्च : निद्रामाहात्म्य

Sleep
Sleep
Updated on

‘धीरे से आ जा रे अँखियन में धीरे से आ जा...’ ‘अलबेला’ चित्रपटातील या गीतात झोप आणि तिचे माहात्म्य सांगितले आहे. चांदोमामाला साक्षी ठेवून झोपेची आळवणी करणाऱ्या अंगाईगीतांनी अनेकांचे बालपण समृद्ध झाले आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगात अंगाई ऐकणे मागे पडत असले, तरी झोप आणि तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे निर्विवाद. झोपेपासून वंचित राहण्याने आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यही झोपेचे तास आणि तिचा दर्जा, यांवर अवलंबून आहे, असे डॉक्‍टर आणि शास्त्रज्ञ सांगतात. पण, ऐकतो कोण? वडीलधारे टीव्हीसमोर रात्र जागवतात, तर तरुण पार्टीत किंवा रात्रपाळीच्या कामात.

साहजिकच वेळेवर झोप, पुरेशी झोप याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, अनेक अरिष्टांना सामोरे जावे लागते. साखरझोपेच्या वेळी आलेल्या डुलकीने अपघाताला आमंत्रण मिळते, तर सातत्याने झोपेपासून वंचित राहिल्यास पोटाचे आणि मनाचे आरोग्य बिघडते. वर्षभर अभ्यासाकडे पाठ फिरवणारे विद्यार्थी नंतर रात्रीचा दिवस करीत कसातरी अभ्यास करून परीक्षांना सामोरे जातात. त्यातून बऱ्याचदा निकालानंतर त्यांना धक्का बसतो. अनेकदा शिक्षक, पालक कानीकपाळी ओरडून सांगतात, ‘थोडी शिस्त बाळगा. चांगले, सकस खा, पुरेसे पाणी प्या, झोपेच्या वेळा निश्‍चित करा. सगळे सुरळीत होईल,’ पण त्याकडे काणाडोळा केला जातो.

खरेतर या गोष्टींचे पालन केल्यास, विशेषतः झोपेबाबतची शिस्त पाळल्यास परीक्षेतील कामगिरी सुधारू शकते. एवढेच नव्हे, तर २०-२५ टक्‍क्‍यांपर्यंत गुण वाढू शकतात, असे तज्ज्ञांना प्रयोगांती लक्षात आले आहे. केंब्रिजमधील मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये जेफ्री ग्रॉसमन हे शास्त्रज्ञ आहेत. झोप आणि कामगिरी यांचा अन्योन्य संबंध आहे काय, हे त्यांना तपासायचे होते. त्याकरिता त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगच्या शंभर विद्यार्थ्यांवर प्रयोग केला. पूर्ण सेमिस्टरभर त्यांनी विद्यार्थ्यांना ‘फिटबीट’ वापरायला दिले. ज्यावर त्यांची झोप आणि इतर बाबींची नोंद झाली. परीक्षा व स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग, तसेच झोप, तिच्या वेळा, किती तास झोप घेतली, कधी घेतली, तिचे स्वरूप अशा सगळ्या बाबींची नोंद केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी आणि त्याआधी त्यांनी घेतलेली झोप, त्यातील सातत्य यांचा अभ्यास केला, ‘फिटबीट’वरील नोंदींचे विश्‍लेषण केले, त्यात झोपेचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित झाले. जे रात्रभर जागतात त्यांची कामगिरी यथातथा आढळली.

मात्र, महिनोन्‌ महिने झोपेत सातत्य राखणारे परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतात, असे दिसून आले. जो एक दिवस साडेसात तास आणि एक दिवस सहा-साडेसहा तास झोपतो, त्याच्यापेक्षा झोपेच्या बाबतीत सातत्य राखणारा चांगली कामगिरी करू शकतो, असे त्यांचे म्हणणे. ते सांगतात, की झोपेचा कालावधी, झोपेची गुणवत्ता आणि त्यातील सातत्य यांचा एकूण कामगिरीवर २४.४ टक्‍क्‍यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. त्यातही मुलींपेक्षा मुलांनी त्याची जास्त काटेकोर कार्यवाही करणे गरजेचे आहे.

अर्थात, हे संशोधन आणि त्यातील निष्कर्ष अंतिम म्हणता येत नाही. तथापि, पुरेशी विश्रांती मिळाल्याशिवाय ताजेतवाने होता येत नाही. चांगल्या झोपेमुळे शीण दूर होऊन गुणवत्तापूर्ण कामगिरी होऊ शकते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहिले, तर कामात एकाग्रता येते. तेव्हा परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होण्यासाठी झोपेची गुणवत्ता अनिवार्य आहे, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.