हौस ऑफ बांबू : मराठी व्याकरणाचे मधुघट...!

नअस्कार! व्याकरण म्हटलं की आजही मला कपाळाच्या मधोमध दुखू लागतं. चष्मा काढून दोन मिनिटं भिवयांच्यामध्ये चिमटीनं दाबावं लागतं.
hous of bamboo
hous of bamboosakal
Updated on

नअस्कार! व्याकरण म्हटलं की आजही मला कपाळाच्या मधोमध दुखू लागतं. चष्मा काढून दोन मिनिटं भिवयांच्यामध्ये चिमटीनं दाबावं लागतं. एक-दोन सुस्कारे सोडावे लागतात. मग कुठं मनातल्या मनात व्याकरण ऑप्शनला टाकता येतं. साहजिकच मी पहिल्यापासूनच बोलीभाषेचा उघड पुरस्कार सुरु केला.

शुद्ध-अशुद्ध काही नसतं, व्याकरणाचे नियम कुणी ठरवले? प्रमाणभाषा म्हणजे नेमकी कुठली भाषा? ती ठरवण्याचा अधिकार कुणाचा? असले प्रश्न तोंडावर फेकून उजळ माथ्यानं फिरायला लागले. बोलीभाषेत लिहिलं की व्याकरणाला थेट गोळी मारायची सोय होते…

मराठी भाषेसाठी वयाची पंचाहत्तर वर्षं देणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांचा २१ जून हा वाढदिवस. वर्षातला सर्वात मोठा वाढदिवस तो हाच!! यंदा त्यांनी शंभरीत पदार्पण केलं. यास्मिनबाई मराठी व्याकरण शिकवताहेत, हे चित्र तेव्हाही अनेकांना आश्चर्यचकित करायचं. या शुभ्र चांदण्यासारख्या शीतल व्यक्तिमत्त्वाचं व्याकरणासारख्या रुक्ष आणि कंटाळवाण्या क्षेत्रात काय काम? असं अनेकांना वाटायचं.

अशा सुंदर, ऋजु बाईंनी फार्फार तर फ्रेंच किंवा इंग्लिश लिटरेचर शिकवावं, अशी सर्वसाधारण धारणा असे. पण बाई चक्क व्याकरणवाल्या निघाल्या...आणि तेही मराठी!! हे म्हंजे कुठल्यातरी छानदार कादंबरीत दादोबा पांडुरंग तर्खडकरांचं व्याकरण दडवून वाचण्यापैकी झालं!!

मुंबईत शीवच्या एसआयइस महाविद्यालयात त्यांनी अठ्ठावीस वर्ष शिकवलं. निवृत्तीनंतरही व्याकरणाचा हात सोडला नाही. मौज अशी की, त्यांचे

विभागप्रमुख होते श्री.पु.भागवत. त्यांचं मौलिक मार्गदर्शन त्यांना लाभलं. त्याआधी पुण्याच्या स. प. महाविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पुण्यात माटेमास्तरांसारखा गुरु लाभल्यानं पुढला मार्ग स्वच्छ दिसला. यास्मिनबाई भाषेच्या वापराबद्दल फार जागरुक. वैचारिक, ललित किंवा प्रसार माध्यमांमध्ये प्रमाण भाषेचाच वापर व्हायला हवा.

बोलीभाषेचा आग्रह तिथं भाषिक अनागोंदी माजवणारा ठरेल, असं स्पष्ट मत त्या नोंदवतात. त्यांचं हे मत काही पुणेकरांना बव्हंशी मान्य असलं तरी काही पुणेकरांनाच आपापत: पटण्यासारखं नाही. कारण पुणेकरांमध्ये एकमत होणं तसं कठीणच असतं.

इंग्लिश किंवा अन्य परकीय भाषेतून शब्दांची उसनवारी करायला हरकत नाही; पण आपलीच मराठी वाक्यरचना अन्य भाषेसारखी होऊ लागते, तेव्हा अध:पतन होतं, असं मत त्या मांडतात. ते मात्र सगळ्यांनाच पटावं. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ असे दोन मौलिक संदर्भग्रंथ त्यांनी मराठी भाषेला बहाल केले आहेत. ‘अंतर्नाद’ या भानू काळे यांच्या मासिकावर ‘व्याकरण सल्लागार : प्रा. यास्मिन शेख’ असा उल्लेख असायचा.

एखाद्या मासिकानं व्याकरण सल्लागार नेमण्याची ही मराठीतली तरी पहिलीच वेळ असावी.

…तर अशा या यास्मिनबाई म्हणजे मराठी भाषेचे मधुघटच. तेही काठोकाठ भरलेले. पण ते खरंच कुणाला हवे आहेत का? व्याकरणातही काव्य शोधणाऱ्या यास्मिनबाईंचा हा प्रवास एकांडाच म्हणायला हवा. भाषेच्या सौष्ठवासाठी हयात घालवणाऱ्या या बाईंवर आपण सगळे मिळून मराठीचं जे काही भजं करतो आहे, ते बघायची वेळ आली!! याला काय म्हणावं? आपलीही धन्य आहे!

यास्मिन शेख समोर उभ्या असतानाही आपण आपल्याच मराठीचं मन:पूत वाटोळं करत असतो. यास्मिनबाईंच्या दोन्ही सुविद्य मुलींनी पुण्यात कामायनी मुनोत हॉलमध्ये शुक्रवारी कार्यक्रम ठेवला होता. आटोपशीर, आणि हृद्य सोहळा झाला. काव्यवाचनानंतर जेवणही होतं!! जेवणाच्या वेळी खूप सेल्फ्या नि फोटो झाले!! यास्मिनबाई शतायु झाल्या. त्यांना शत शत शुभेच्छा!! मराठीचे हे मधुघट अक्षय आकंठ, ओतप्रोत भरलेले राहोत, हीच प्रार्थना…त्यांना उत्तम आयुरारोग्य मिळो, जेणेकरुन आमच्या मराठी भाषेचंही भलं होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.